जिल्हा पोलीस अधिक्षकांनी तडजोड करणार्यांची चौकशी करुन दोषी विरोधात कारवाई करावी
बसस्थानकात चोर्या होतात आणि चोरटे पैसे पोलीसांकडे आणुनही देतात?
बीड(रिपोर्टर)ः- शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे काही अधिकारी व कर्मचारी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. बसस्थानकामध्ये सतत चोर्या होतात मात्र याठिकाणी चक्क तडजोडी होत असल्याचे यापुर्वीही निर्देशनास आले होते. त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. ठरावीक पोलीस कर्मचारी यात सहभागी असतात. इतरही काही प्रकरणात पोलीसांनी सरळ सरळ तडजोडी करुन स्वतःचे खिसे भरले आहे. या सर्व तडजोडीला पि.आय.राठोड जबाबदार असल्याचे सांगितले जाते. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी याची दखल घेवून राठोड सह तडजोड करणार्या कर्मचार्यांच्या इतर ठिकाणी बदल्या करण्याची मागणी केली जावू लागली.
बीड बसस्थानकामधून नेहमीच प्रवाशांचे पैसे व दागिने चोरीला जातात. याठिकाणी सरळ सरळ तडजोडी होत असल्याचे यापूर्वी समोर आले आहे. दरम्यान विष्णु चव्हाण, मच्छिंद्र कप्पे यांच्या बाबत नेहमीच संशयास्पद चर्चा होते. या दोघांना पाठीशी घालण्याचे काम पि.आय.राठोड करतात. राठोड यांना का पाठीशी घालतात हे कळायला मार्ग नाही. दरम्यान सात आठ दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आहे. त्या घडामोडीत पोलीसांनी वेगवेगळ्या कलाटण्या घेतलेल्या आहे. 20/07/2023 रोजी गेवराई येथील एका प्रवाशांचे 40 हजार रुपये चोरीला गेले होते. यामध्ये कप्पे नामक कर्मचार्यांने चोरट्याकडून 30 हजार रुपये आणुन दिले. मग हे पैसे कसे आणून दिले, उरलेल्या दहा हजार रुपयांचा काय झालं? हा ही प्रश्नच आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल का झाला नाही. कुर्ला येथील जावेद नामक व्यक्तीला गुटखा बाळगतांना दोन महिन्यापूर्वी कप्पे यांनी पकडले होते.
त्यात त्यावेळी तडजोड झाली होती. दि. 22/07/2023 रोजी मच्छिंद्र कप्पे, दिलीप राठोड, सचिन आगलावे यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्याची हद्द नसतांना बीड ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत माळापूरी येथे जावेद नामक व्यक्तीस पकडले. मात्र यात तडजोड झाली नसल्याने गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास ए.पी.आय.अमोल गुर्ले हे करत आहे. पोलीसांनी या सोबतच असलेल्या अन्य एकास का सोडून दिले. जावेद ज्यांना माल देतो त्यांना पोलीस बोलावून नंतर सोडून का देत आहे? दि. 23/07/2023 रोजी शहरातील टेकवाणी बंधू हे बसस्थानकातून पुण्याला जातांना त्यांच्या खिशातील 50 हजार रुपये चोरीला गेले होते. या प्रकरणी त्यांनी पोलीसांना फोन लावला असता दिलीप राठोड नामक पोलीसाने टेकवाणी यांचे चोरटयाकडून 30 हजार रुपये घेवून दिले. टेकवाणी यांच्या उर्वरीत 20 हजार रुपयाचे काय झाले? पोलीस चोरटयाकडून असे पैसे कसे मिळवून देवू शकतात. याबाबत काही गुन्हा दाखल होवू शकत नाही. दरम्यान या प्रकरणी अमोल गुर्ले, विष्णु चव्हाण, मच्छ्रिंद कप्पे, दिलीप राठोड यांना तक्रार न करण्याचे सुचवले असल्याचे बोलले जात आहे. दि.02/07/2023 रोजी गेवराई येथील महिला पोलीस काटे नामक हिच्या मुलाला तलवार किंवा काही तरी धारदार शस्त्रांने मारहाण झाली होती. ए.पी.आय. अमोल गुर्ले, मोहसीन शेख, ज्ञानेश्वर मराडे यांनी चुकीचा एम.एल.सी जवाब नोंद केला. ए.पी.आय गुर्ले यांनी आरोपीचे नातेवाईक पोलीस यांच्या सोबत संगनमत करुन गुन्ह्याचे कलम कमी लावले आहे असे महिला पोलीसांचे म्हणणे आहे. सदरील महिला एस.पी.ठाकूर यांची भेट घेवून तक्रार करणार असल्याचे समजते. दरम्यान हे सर्व प्रकरणे किती संशयास्पद आणि तडजोडीचे आहे हे दिसून येत आहे. या प्रकरणी पि.आय.राठोड हे जबाबदार नाहीत का? जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी या सर्व कर्मचार्यांची चौकशी करुन त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.