16 हजार शिक्षकांपैकी फक्त 600 शिक्षकांनीच दिली परीक्षा
बीड (रिपोर्टर): शिक्षण विभागाने मोठा गाजावाजा करत शिक्षकाचे ज्ञान अद्यावत आहे की कसे हे तपासण्यासाठी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आयोजन आज केले होते. बीड जिल्ह्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक असा जवळपास 16 हजार शिक्षक असताना या परीक्षेसाठी फक्त 50 टकक्के म्हणजे 7 हजार 717 शिक्षकांनी नोंदणी केली होती.
नोंदणी केलेल्यांपैकी फक्त 604 शिक्षकांनी ही परीक्षा दिली असून टक्केवारीच्या प्रमाणात 7 टक्के शिक्षकांनी ही परीक्षा दिली. शिक्षक या परीक्षेला घाबरले की, प्रशासनाच्या या परीक्षेसंदर्भात शिक्षकांवरचा धाक संपला हे मात्र समजून येत नाही.
मराठवाड्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शाळांची तपासणी केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या ज्ञानासोबत शिक्षक किती हुशार आहेत यासाठी काही शिक्षकांना प्रश्न उत्तरे विचारली होती. मात्र शिक्षकांना काहीच येत नसल्याने त्यांनी शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारनेही त्यांच्या या सूचनेला हिरवा कंदील दाखवत शिक्षकांसाठी आज आणि प्रेरणा परीक्षा आयोजीत केली आहे. शिक्षकांमुळेच विद्यार्थी हा मोठमोठ्या पदांपयर्ंत पोहचतो मात्र अलिकडच्या काळात काही शिक्षकांच्या ज्ञानाबद्दल शंका उपस्थित होऊ लागल्याने शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आज आणि उद्या आयोजन केले होते. उद्यासाठी तर या परीक्षेसाठी शिक्षकांना चक्क सुट्टी दिलेली आहे मात्र ही परीक्षा ऐच्छिक असल्यामुळे बीड जिल्ह्यातील 16 हजार शिक्षकांपैकी 7717 शिक्षकांनी परीक्षा देण्यासाठी नोंदणी केली होती.
नोंदणी केलेल्या शिक्षकांपैकी आज प्रत्यक्षात फक्त 604 शिक्षकांनी बीड जिल्ह्यातील 26 परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये आपण अनुत्तरीत झालो तर सरकार आपल्यावर काही कारवाई करेल का? ही भीतीही काही शिक्षकांमध्ये होती तर आपण पंधरा-वीस वर्षांपुर्वीच अभ्यासाच्या प्रवाहातून बाहेर पडल्यामुळे या परीक्षेत पास होऊ की नापास होऊ हीही भीती होती. त्यामुळे हा शिक्षक या परीक्षेसाठी घाबरला की परीक्षा घेणार्यांचा धाक कमी झाला हे मात्र दिसून येत नाही. काही शिक्षक हे आमच्याच परीक्षा कशाला घेता, सरकारच्या प्रत्येक कामाला आम्हालाच कशाला जुंपता, आमच्यासोबत प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि राजकारणातील आमदार, खासदार, मंत्री यांच्याही परीक्षा घ्या, मग आम्हीही परीक्षा देऊ, असे म्हणून यातून पळवाट काढू लागले होते.