तिघांवर बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): गुटख्याचा टेम्पो शनिवारी (दि.29) रात्रीच्या सुमारास पाली परिसरात पोलिसांनी अडवला, मात्र पळून जाण्यासाठी चालकाने पोलीस कर्मचार्याच्या दुचाकीवर टेम्पो घालण्याचा प्रयत्न करून भरधाव वेगाने टेम्पो गेवराईच्या दिशेने पळवला, पाडळशिंगी टोलनाक्यावरील पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सदरील टेम्पो पकडला. त्यामधे 31 लाख रुपयांचा गुटखा, टेम्पो, मोबाईल असा 46 लाख 28 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी चालक सामेनाथ जालिंदर मळेकर (वय 23 रा.मळेकरवाडी ता.पाटोदा), टेम्पो मालक ज्ञानेश्वर भिमराव साळुंके (रा. निगडी पुणे), व गुटखा मालक महारुद्र मुळे (रा. घोडका राजुरी ता.बीड)यांच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
29 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास बीड ते मांजरसुंबा हायवे रोडवर रोहीटे यांचे पेटोलपंपाजवळ रोडवर सामेनाथ जालिंदर मळेकर हा आयशर टेम्पो (एमएच. 14, जेएल 863) घेवून उभा होता. यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत माल गोवा कंपनीचा गुटखा साठा आणि विक्री करण्यास प्रतिबंधीत केलेला माल होता. कारवाई करण्यासाठी पोलीस असल्याची ओळख कर्मचार्यांनी करून देताच टेम्पो चालकाने गाडी लॉक करुन गेवराईच्या दिशेने पळवली. पोलीस अंमलदार गणेश नवले यांच्या दुचाकीवर टेम्पो घातला. यामध्ये दुचाक (क्र. एमएच.14, एक्यु. 4891) नुकसान झाले आहे. टेम्पो गेवराईच्या दिशेने पळविल्याची माहिती पाडळशिंगी टोलनाक्यावर महामार्ग पोलिसांना पोलिस अमदलदार गणेश नवले यांनी दिली तेथे काकडे, गडदे, परजने यांनी टेम्पो पकडला. सदरील टेम्पो व चालक बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आला.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गणेश नवले (माजलगाव) यांच्या फिर्यादीवरून कलम 307, 353, 328, 272, 273, 188, 427, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय. पवार, पो.ह. अशोक नामदास, पोना.गणेश नवले, संतराम थापडे, तुकाराम कानतोडे, युवराज चव्हाण, काकडे, गिरी, गडदे यांनी केली.










