मुंबई (रिपोर्टर): राज्य सरकारची महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही आता अधिक व्यापक करण्यात आली असून राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक व अधिवास प्रमाणपत्रधारक नागरिकांना लागू करण्यात आली आहे. राज्यातील एकूण अंगीकृत रुग्णालयांची संख्या 1,350 झाली असून सर्व लाभार्थी नागरिकांचे आरोग्य कवचही दीड लाख रुपयांऐवजी आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेप्रमाणे पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. मागील महिन्यात 28 जून रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवार, 28 जुलै रोजी सुधारित योजनेचा शासन निर्णय तपशीलवार जाहीर केला. केंद्र सरकारच्या योजनेसोबत सुधारित स्वरूपात राज्याची जनआरोग्य योजना राबवण्यात येणार असल्याने अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणार्या नागरिकांनाच फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत होता. आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र प्राप्त नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच. फुले योजना याआधीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात लागू करून सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यांत 140 आणि कर्नाटक राज्यातील दहा अतिरिक्त रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. याव्यतिरिक्त दोनशे रूग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आल्याने अंगीकृत रुग्णालयांची संख्या एक हजार 350. सर्व शासकीय रुग्णालये अंगीकृत करण्यात आली असून यापुढे मागास भागात नव्याने सुरू होणारी सर्व रुग्णालयेही त्यांची इच्छा असल्यास एकत्रित योजनेत अंगीकृत केली जाणार. मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी फुले जनआरोग्य योजनेतील उपचार खर्च मर्यादा अडीच लाख रुपयांवरून वाढवून साडेचार लाख रुपये. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा फुले जनआरोग्य योजनेत समावेश; तसेच रस्ते अपघाताबाबतच्या उपचारांची संख्या 74वरून 184 करण्यात आली. उपचाराच्या खर्च मर्यादेतही प्रतिरुग्ण 30 हजार रुपयांवरून एक लाख रुपये, अशी वाढ. यात राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघातांत जखमी झालेल्या, राज्यातील व देशातील रुग्णांचा समावेश होणार.