परळी (रिपोर्टर):- दैनिक मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार प्रशांत प्रभाकरराव जोशी यांचे उपचारा दरम्यान दि.30 जुलै 2023 रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वृत्तपत्र क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 56 वर्ष होते.
प्रशांत जोशी यांच्यावर लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील दवाखान्यात नेत असताना आज दि.30 जुलै 2023 रोजी पहाटेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रशांत जोशी यांच्या निधनाने वृत्तपत्र क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. दैनिक मराठवाडा साथी या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून ते काम पाहत होते. प्रशांत जोशी यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी 4 वा. अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार बोरुळ तलाव स्मशानभूमी करण्यात येणार आहेत.
एक सुसंस्कृत पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला – धनंजय मुंडे
’आमच्या परळीच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात अत्यंत सभ्य, सोज्वळ आणि समंजस व्यक्ती म्हणून कायम गणले गेलेले ज्येष्ठ पत्रकार प्रशांत प्रभाकर जोशी यांच्या अकाली निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
त्यांच्या अखेरच्या काही दिवसात आजाराने ग्रस्त असताना आमची काही दिवसांपूर्वीच भेट झाली होती.’ ’सुसंस्कृत पण तितकेच प्रभावी लेखन करणे, विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणे आणि दरवर्षी ठरलेली दिनदर्शिका तयार करणे ही त्यांची वैशिष्ट्ये कायम स्मरणात राहतील. जोशीजींच्या निधनाने आमच्या परळीतील एक सुसंस्कृत पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला, मराठवाडा साथी परिवाराची आणि परळीची मोठी हानी झाली आहे. मी मराठवाडा साथी परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर जोशी कुटुंबाला हे दुःख सावरण्याचे बळ देवो.’ अशा शब्दात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत प्र. जोशी यांच्या अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.