बीड ग्रामीणसह बोलेरो गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात
बीड (रिपोर्टर): गेल्या तीन दिवसांपूर्वी कुमावत यांच्या पथकाने मांजरसुंबा ते पाडळसिंगी टोलनाका असा गुटखा माफियांचा पाठलाग करत 31 लाखांचा गुटखा पकडला होता. पाडळसिंगी येथे कारवाई करूनही तो टेम्पो बीड ग्रामीण ठाण्यात आणण्यात आला होता. त्यानंतर ज्या पोलीस कर्मचार्याने ही कारवाई केली त्यातील एका कर्मचार्याने एका बोलेरो गाडीतून गुटखा लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी दस्तुरखुद्द पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दखल घेतली असून अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
या बाबत अधिक असे की, 30 जुलै रोजी सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील काही कर्मचारी मांजरसुंबा परिसरात एका गुटख्याच्या टेम्पोवर कारवाई करण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांना हुकलवाणी देत टेम्पो चालकाने थेट गेवराईच्या दिशेने टेम्पो पळवला. तेथील टोलनाक्यावर असलेल्या महामार्ग पोलिसांनी टेम्पो पकडला. हा टेम्पो बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणला, मात्र येथे आणल्यानंतर ज्या पोलिसांनी ही कारवाई केली त्यातील एका पोलिसाने रात्री बोलेरो गाडीत गुटखा टाकून दोन खेपा केल्याचे समोर आले. याबाबत पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्वत: दखल घेऊन त्या पोलीस कर्मचार्याची चौकशी लावली आहे. ही चौकशी अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर हे करत असून त्यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गुटख्याने भरलेली बोलेरो ज्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. अन्य काही पुरावेही पोलीस गोळा करत असून लवकरच चौकशीचा अहवाल पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांना मिळणार असल्याचे कळते.