बीड (रिपोर्टर): आपल्याला काम करायचं आहे, विकास करायचं आहे, एवढ्यासाठीच आम्ही महायुतीसोबत गेलो आहोत. असे सांगत बीड जिल्ह्याच्या विकासासाठी, दुष्काळमुक्तीसाठी आणि ऊसतोड कामगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी काम करायचं आहे. पश्चिमेचं पाणी पुर्वेला आणायचा आहे, असं सांगत एप्रिलमध्ये 6 लाख कोटींचा अर्थसंकल्प मांडणार आहे, त्यात बीड जिल्ह्याला झुकते माप दिले जाईल, असा शब्द देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या वाट्याला कायम संघर्ष आल्याचे म्हटले. बीड जिल्ह्याचा पालकंमत्री हा राष्ट्रवादीचाच राहील, असे सांगत धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदाबाबत अजितदादांनी संकेत दिले.
बीडमधील आयोजीत बहुचर्चित सभेला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले की, मी बीडकरांचे आणि बीड जिल्ह्यातील जनतेला धन्यवाद देतो. तुम्ही एखादी गोष्ट मनावर घेतली की तुम्ही काय करू शकता, हे तुम्ही आजच्या सभेतून उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रु अथवा मित्र नसतो, हे राजकारण असल्याचे सांगून बीड जिल्ह्यामध्ये मी संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, हा जिल्हा संत भगवानबाबांचा, संत जगमित्र नागा यांच्यासह अन्य सतांचा जिल्हा आहे.
येथूनच जनतेचा विकास करायचा आहे. महायुतीत राहून महाराष्ट्रातील सर्व जनतेचे भले कसे करता येईल, विकास कामांना गती कशी देता येईल याकडे लक्ष द्यायचे आहे. आम्ही जरी महायुती सरकारमध्ये आलो असलो तरी सर्व जाती-धर्मात सलोखा राहिला पाहिजे, हे कृतीतून आम्ही दाखवणार आहोत. आम्ही महापुरुषांसमोर नतमस्तक होणारी माणसं आहोत, असे म्हणत अजितदादांनी बीड जिल्ह्याच्या पीकविम्याबाबतचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर असल्याचे सांगीतले. या वेळेस एक रुपयामध्ये शेतकर्यांना पिक विमा काढता आला. तिजोरीवर साडेचार हजार रुपये कोटींचा बोजा पडला तरी शेतकर्यांसाठी काही हरकत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये राजकीय चढउतार येतात. शेतकर्यांसाठी आम्ही सदैव काम करत राहणार असल्याचे सांगून बीडची जनता राजकारणाबाबत, समाजकारणाबाबत जाणकार आहे, असे बोलत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कांदा प्रश्न सोडविण्यासाठी धनंजय मुंडेंना दिल्लीला पाठवलं, असं म्हटलं. 2 लाख मे.टन कांदा 24 रुपयाने खरेदी केला. आमचा प्रमुख उद्देश हा काम करण्याचा आणि विकासाचे धोरण आखण्याचा आहे. देश अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर येऊन ठेपला आहे. सर्वसामान्यांच्या आणि तरुणांच्या हाताला काम मिळवण्यासाठी उद्योग धंदे महाराष्ट्रात यायला हवेत, त्यासाठी देवेंद्र फडणवीस उद्योग आणण्यासाठीच जपान दौर्यावर गेलेत. शेतकर्यांना मदत करण्याची भूमिका ही सरकारची आहे. बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडतो, कोरडवाहू शेती आहे, ऊसतोड कामगारांचे स्थलांतर आहेत, अनेक अन्य प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही तुम्हाला अंतर देणार नाही, जे जे जिल्ह्यासाठी करायचं ठरवलं ते ते आजपर्यंत केलं आणि यापुढेही करत राहू, एक लाख कोटी रुपये लागले तरी पुर्वेचं पाणी पश्चिमेला आणू, सहा लाख कोटींचा बजेट मांडणार आहे, त्या बजेटमध्ये बीड जिल्ह्याला अधिक अधिक काय देता येईल, याकडे लक्ष दिलं जाईल. अधिकार्यांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांच्या पाठिशी असतो. चांगले काम केले नाही तर त्यांचा बंदोबस्तही करतो. आमची प्रशासनावर पकड आहे,
मी एवढच सांगतो, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, पश्चिमेचा पाणी गोदावरी पात्रात आणण्यासाठी जे करता येईल ते करू, आता नव्या पिढीने राजकारणात यायला हवं, आम्हाला 30-35 वर्षे झालं राजकारणात. योगेश क्षीरसागर आपल्याकडे आले आहेत असा उल्लेख करून कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या वाटट्याला आयुष्यभर संघर्ष आला, प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी त्याचा सामना केला. म्हणूनच तो लोकांच्या मनात स्थान निर्माण करू शकला. सामाजिक न्यायमंत्री असताना त्यांनी धाडसी निर्णय घेतले. विरोधी पक्षनेतेपदही गाजवले. असे म्हणून अजित पवारांनी धनंजय मुंडेंचे कौतुकही केले.