बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये एक महिना पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी, मका इत्यादी पिके कोमजून गेली होती. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात कुठे ना कुठे मध्यम आणि रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडू लागला. आज सकाळपासून बीड तालुक्यासह इतर ठिकाणी दमदार हजेरी लावल्याने सुकलेल्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले.पाऊस उशिरा पडल्याने खरीप पिकाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. राज्य सरकारने 25 टक्के अग्रीम मंजूर केला असला तरी नुकसान मात्र जास्त झाले.
जुलै महिन्यानंतर पावसाने खंड दिला. तब्बल एक महिना पाऊस पडला नाही. पाऊस पडला नसल्याने खरीप पिके धोक्यात आली, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका इ. पिके सुकून गेली. पिकाच्या परिस्थितीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाल होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे पुन्हा आगमन झाले. काल आणि परवा मराठवाड्यातील विविध भागात मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. या पावसामुळे दिलासा मिळाला. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी बारा-एक वाजण्याच्या दरम्यान बीड शहरासह इतर काही मंडळात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला. राज्य सरकारने 25 टक्के अग्रीम मंजूर केले असले तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालेले आहे. मोठ्या पावसाची अपेक्षा असून जिल्हाभरातील सर्वच धरणे कोरडी आहेत. दोन-चार धरणातच 20 ते 25 टक्के पाणीसाठा आहे. इतर धरणांमध्ये पाणी नसल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नद्यांना पुर येण्यासारखा पाऊस पडला तरच धरणात पाणीसाठा जमा होऊ शकतो. आणखी तीन दिवस राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. या तीन दिवसात धुव्वाधार पाऊस पडला तर नक्कीच पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते.