दोन महिन्यात घरकुल न बांधल्यास
मालमत्तेवर बोजा पडणार
202 लाभार्थ्यांना बोलवण्यात आले होते लोक अदालतमध्ये
बीड (रिपोर्टर): पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरीकांना घरकुल मंजूर झाल्यानंतर बहुतांश लाभार्थी घरकुल न बांधता पैसे उचलून खातात. बीड तालुक्यातील 202 लाभार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली होती. या सर्वांना लोकअदालतमध्ये बोलवण्यात आले होते. याठिकाणी संबंधितांना दोन महिन्यात घरकुल बांधण्याच्या सुचना देण्यात आल्या. घरकुल न बांधणार्यांच्या मालमत्तेवर बोजा टाकून त्यांच्याविरोधात फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे.
सर्वसामान्य नागरीकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई यासह इतर योजनेअंतर्गत दरवर्षी शेकडो लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होतात. काही लाभार्थीच घरकुल बांधतात. इतर मात्र पैसे उचलून बसतात. बीड तालुक्यातील दोनशे दोन लाभार्थ्यांना घरकुल बांधले नाहीत. या सर्वांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. 9-9-2023 रोजी संबंधितांना लोक अदालतमध्ये हजर राहण्याचे आदेशित करण्यात आले होते. या ठिकाणी गटविकास अधिकारी सानपसह घरकुल विभागाच्या कर्मचार्यांनी लाभार्थ्यांना दोन महिन्यांमध्ये घरकुल बांधण्याच्या सूचना केल्या आहेत. घरकुल न बांधल्यास संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा टाकून त्यांच्याविरोधात फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.