Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeसंपादकीयसरकारचा विकासाभिमुख दावा ‘भटका’ समाजाला चटकाच

सरकारचा विकासाभिमुख दावा ‘भटका’ समाजाला चटकाच

देशात विविध जाती, धर्माचे लोक आहेत. वर्षानुवर्ष काही समाज वंचीत राहत आलेला आहे. जुन्या काळात जे लोक जंगलात राहून आपली उपजीवीका भागवत होते. पुढे ह्या लोकांचा विकास झालाच नाही, भटकणारे लोक आज ही भटकत राहिले. पुर्वी लोकांची मुख्य गरज ही खाण्याची होती. खाण्यास मिळाले की लोक आनंदीत असाचये, अन्न धान्याची उत्पादकता अत्यंत कमी होती, तितकं पिकत नव्हतं. भटका समाज पुर्णंता जंगलावर अवलंबून होता. गावात त्याला तितका मान, सन्मान  मिळत नव्हता, त्यामुळे हा समाज गावाकडे फिरकत नव्हता. भटक्या समाजातील पारधी, भिल्लसह आदि भटक्या लोकांवर  नागरीक संशयाने पाहत होते. तो कुठे तरी चोरी करतो, मारामारी करतोय, असा संशय त्यांच्यावर घेवून त्याला बदनाम ही तितक्याच प्रमाणात व्यवस्थेने केलेलं आहे. त्याला मारहाण केली जात होती. लोकांच्या भीतीपोटी भटक्या समाजाने जंगल सोडलं नाही. काही झालं तरी हा समाज स्वत:ला जंगलात आणि रोनोमाळीच बंधिस्त करुन घेत होता. त्याचे जीवन म्हणजे जनावरापेक्षा बेकार होते. राजा,महाराजाच्या काळात ही भटक्या समाजाची प्रचंड प्रमाणात फरफट झालेली आहे. स्वार्थासाठी  या समाजाकडून विविध कामे करुन घेतली जात असे. जंगलाची माहिती असल्याने त्यांच्याकडून शिकारी करुन घेणं, शेतातील पिकांची राखण करुन घेणं किंवा अन्य जोखमीची कामे या समाजाकडून पुर्वीची मंडळी करुन घेत होती. समाज व्यवस्थेने भटक्या समाजाचा वापर करुन घेतला पण त्याला तितका मान, सन्मान दिला नाही, म्हणुन आज ही ह्या समाजाची अवस्था वाईटच आहे. #इंग्रजांनी गुन्हेगारीची कायदा केला देशात इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी येथील माणसांचा आपल्या हितासाठी वापर करुन घेतला. जे लोक इंग्रजांच्या विरोधात जात होते. त्यांना संपवण्याचे आणि बदनाम करण्याचे काम इंग्रज करत होते. इंग्रज व्यापारासाठी भारतात आले होते, पण त्यांनी व्यापारांच्या माध्यमातून देश बळकावला. इंग्रजांच्या आधी देशात विविध प्रांतात राजेशाही होती. जेव्हा इंग्रजांनी देशात आपली हुकूमत सुरु केली. तेव्हा काही राजांना त्याची जाणीव झाली. बहादूरशहा जफर आणि अन्य काही राजांनी एकत्रीत येवून १८५७ साली मोठा लढा इंग्रजांच्या विरोधात लढला गेला. त्यात भटका समाज इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी उतरला होता. १८५७ चा लढा भारतीय हरले होते. या लढ्यात कोण,कोण उतरले होते याचा शोध घेवून इंग्रजांनी त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरु केली. भटक्या समाजावर इंग्रजांनी अन्याय करायला सुरुवात केली. या समाजाला जाणीवपुर्वक बदनाम केलं जावू लागलं. त्याच्यावर विविध आरोप करुन त्यांना गुन्हेगार ठरवलं गेलं. १८७१ साली इंग्रजांनी भटक्या समाजाला गुन्हेगारी ठरवण्यासाठी कायदा केला. या कायद्याच्या माध्यमातून इंग्रज अधिकारी जिथं भटका समाज दिसेल तेथे त्यांच्यावर अन्याय करत असे. या भीटीपोटी भटका समाज रानोमाळी गेला, तो नागरी वसाहतीत फिरकत नव्हता. कुणी नागरी वसाहतीत आला की, त्याला जेलमध्ये टाकले जात होते. पिढ्या ना, पिढ्या भटक्या समाजाला गुन्हेगारीच्या विळख्यात अडकवण्यात आलं आहेे, त्यांच्यावर तसा शिक्का मारण्यात आला. #कायदा रद्द झाला तरी…देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटनेनूसार देशाचा कारभार चालू लागला. प्रत्येक माणसाला समान अधिकार देणारी आपली घटना असली तरी माणसातील माणुसपण जागे होत नव्हते. लोकांच्या मनात जे द्वेष होते ते पुर्णंता गेलेले नव्हते. भटक्या समाजाकडे पाहण्याचा जो पुर्वीचा दृष्टीकोन होता तो पुर्णंता कमी झालेला नव्हता. ज्या भटक्यांना इंग्रजांनी गुन्हेगार ठरवले, त्यांना आज ही लोक गुन्हेगारच म्हणुन ओळखतात. १९४७  ते  १९९० पर्यंतच्या  या काळात लोकांच्या मनात पारधी, भिल्ल व इतर काही भटक्या जमातीबद्दल चांगली विचारधारा नव्हती. शिवारात कुठं पारधी, भिल्ल  दिसले की, लोक त्यांना त्रास देत होते. त्यांच्याकडे संशयी वृत्तीने पाहुन त्यांना मारहाण करत होते. गावात चोर्‍या झाल्या की, त्याचं पुर्णंता खापर हे पारधी, भिल्ल लोकांवर फोडलं जात होतं. पोलिस प्रशासन ही दरोडे व चोरीच्या संशयात आधी या समाजाकडेच नजर वळवत असे. पुरावे असो अथवा नसो, या लोकांना पकडून आणुन डांबले जात असे, काही लोक गुन्हेगारी वृत्तीचे असतील ही,त्यात काही शंका नाही. भटक्याच्या विरोधात इंग्रजांनी केलेला कायदा रद्द करावा अशी जोरदार मागणी झाल्यानंतर सन १९५२ साली. हा कायदा रद्द झाला असला तर लोकांचा दृष्टीकोन बदलला नाही. #आज ही हल्ले होतात देशात अनुसुचित जातींची संख्या १२१५ तर अनुसुचीत जमातीची संख्या ७४७ इतकी आहे. राज्यात अनुसुचीत जाती ५९ आणि अनुसुचीत जमाती ४७ इतक्या आहेत. यातील काही बोटावर मोजण्या इतके लोक थोडे आर्थिक,शैक्षणीक दृष्टया सुधारले असले तरी, इतरांचे पाय आजही शहर,गावाच्या  ठिकाणी नसतात. त्यांचे स्थलांतर काही थांबलेले नाही. आज ह्या गावाला तर उद्या त्या गावाला भटकत असतात. पोटाची आग विझवण्यासाठी हा समाज भटकंती करत आलेला आहे. बीड जिल्हयात गेल्या एक महिन्यापुर्वी दोन ठिकाणी पारधी समाजाच्या माणसावर हल्ले झाले. यात पाटोदा तालुक्यातील हल्यात दोघे ठार झाले, व केज तालुक्यात एक जण ठार झाला, हे हल्ले चोरीच्या संशयातून झाले. जिल्हयात या दोन घटना  गंभीर घडलेल्या असतांना त्याची तितकी चर्चा झाली नाही. कुणी त्याचा तितका तीव्र निषेध केला नाही. त्यासाठी मोर्चे काढले नाहीत, किंवा आंदोलन केले नाही, याचं दु:ख वाटतं. भटक्यांना आज ही चोर समजून मारले जाते ही लाज आणणारी बाब आहे,  पुर्वी गुन्हेगारी ठरावीक जातीभोवती फिरत होती, आज तिचा सर्वत्र विस्तार झालेला दिसून येत आहे. गुन्हेगारीने वेगळं वळण घेतलं. भटक्या  लोकांच्या समस्या शासन दरबारी तितक्या प्रमाणात सोडवल्या जात नाहीत. भटक्यांना गायरान जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, पण त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात झाली? ज्यांना जमिनी देण्यात आल्या आहेत. त्याची नोंद सातबारावर केली जात नाही. भटक्यांना गायरान जमीनी दिल्या असल्या तरी काही धनदांडगे लोक त्यांना जमीनी कसू देत नाहीत. त्यावर अतिक्रमण करत असतात. त्यांना गावातून हाकलून लावले जात आहे. त्यांची घरे जाळली जातात. भटक्यांना घर नाही. ज्यांना चांगली घरे आहेत, त्यांची नावे दारिद्रय रेषेत, ज्यांना साध छप्पर नाही. त्यांची नावे घरकूलाच्या यादीत येत नाही, असा शासनाचा अनागोंदी व भ्रष्ट कारभार आहे. वंचीतांचा विचार केला जात नाही. ज्यांच्याकडे सगळं काही आहे. अशांच्या घरात शासनाच्या योजना पाणी भरत असेल तर कशाला वंचीत समाज सुधारेल?     #बदल काय झाला?  सर्वागीण विकासाची शपथ राज्यकर्ते घेत असतात. जेव्हा विकास करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र विकासाची आठवण होत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आज पर्यंत काही ठरावीक लोकांचाच विकास झाला. पुढार्‍यांची कारखानदारी, शिक्षण संस्था, उद्योग व्यवसाय आहेत. राजकारणातून  प्रस्थापीतपणा वाढला. हा प्रस्थापीतपणा जाणीवपुर्वक पोसण्यात आला. याला कारणीभूत सर्वच राजकीय पक्ष आहेत हे नाकारुन चालणार नाही. जग बदललं, तंत्रज्ञानाचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, असं असतांना विकासाच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे. आपले पुढारी उठता, बसता विकासाच्या गप्पा मारुन लोकांची दिशाभूल करत असतात, पण ज्या पध्दतीने विकास व्हायला हवा त्या पध्दतीने विकास होत नाही. काही ठरावीक लोक बंगल्यात राहतात. गाड्यात फिरतात म्हणजे देशाचा चेहरा, मोहरा बदलला असं आहे का? आज ही वंचीत घटकांचा विचार केला जात नाही. वंचीतांच्या हितासाठी योजना रावबल्या जातात. त्यावर कोटयावधीचा खर्च केला जातो, पण हे कोटयावधी रुपये जातात कुठे? कित्येक भटकणार्‍या लोकांना शासन म्हणजे काय हेच माहित नाही. शासन ही अशा लोकापर्यंत जात नाही. त्यांच्या मुलांना शिक्षण नसते. त्यांना चांगल्या आरोग्य सेवा मिळत नसतात, राशन कार्ड नाही, मोफतचं धान्य मिळत नाही, आधार कार्ड नाही. मतदान यातीत नाव नसत. जगाचा आणि त्याचा कधी संपर्क नसतो, जगात काय चाललं याची काही माहिती नसते. काही प्रमाणात भटका समाज संघटीत झाला. इतर भटका समाज आज ही संघटीत नाही. तो आपली रोजची लढाई लढण्यातच मग्न आहे. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे या सामाजात मोठया प्रमाणात अंधश्रध्दा आहे. या अंधश्रध्दापायी अशा समाजाचं मोठं नुकसान झालेलं आहे. भटक्यांना विकासाच्या प्रवाहात आणले गेले असते तर आज त्यांची ही अवस्था झाली नसती. सरकारी बाता मोठ, मोठया असतात. दरवर्षी इतके कोटी रुपये खर्च केले. तितके खर्च केले,पण या कोटीतून भटका समाज किती सुधारीत झाला? खोटया थापा मारणं सरकारने बंद करुन वंचीताच्या हिताचं राजकारण करावे, जो पर्यंत देशातील वंचीत घटक सुधारणार नाही तो पर्यंत खर्‍या अर्थाने देशाचा विकास होणार नाही. राज्यकर्त्यांनी कितीही विकासाभिमुखाच्या बाता मारल्या तरी त्या बाताला अर्थ नसतो.

Most Popular

error: Content is protected !!