वर्षभराचा आरोग्य तपासणी, औषधोपचार, कपड्यांचा
खर्च सामाजिक योगदानातून करण्यात येणार
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुदेव सोळुंकेंच्या कल्पनेतील उपक्रम
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामसेवकाकडून निराधार ज्येष्ट नागरिकाचा शोध घेवून त्याला जिल्हा परिषदेचे स्वतंत्र वेळापत्रक देवून त्याचा औषध, पाणी आणि कपड्याचा खर्च सामाजिक उपक्रमातून राबवण्यात येणार आहे. या निराधार ज्येष्ट नागरिकांची संख्या निश्चित झाली की याबाबत हा उपक्रम राबवला जाईल अशी माहिती बीड जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुदेव साळुंके यांनी दिली.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुदेव सोळुंके यांच्या कल्पनेतून गेल्या एक महिनापासून प्रत्येक ग्रामसेवकाला आदेश देवून ग्रामपंचायतच्या हद्दीतील ज्या नागरिकाला सांभाळण्यासाठी मुले मुली किंवा कोणीच नाही, मात्र त्यांचे वय 65 ते 70 च्या पुढे आहे. अशा सर्व नागरिकांचा डाटा कलेक्ट करण्यात येत आहे. हा डाटा कलेक्ट झाला की अशा ज्येष्ट नागरिकांची आरोग्य तपासणी ती वर्षभर मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर मंडळीकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर आजार डिटेक्ट झाल्यावर त्याचा औषध पाण्याचा खर्च फार्मासिस्ट यांच्याकडून मोफत करण्यात येणार आहे आणि रोटरी व व्यापारी संघटना यांच्याकडून वर्षभरासाठी त्यांना लागणारे कपडे मोफत देणार आहेत. मात्र जे वयोवृध्द आणि ज्येष्ट नागरिक आहेत त्या नागरिकांना बीड जिल्हा परिषदेतील स्वतंत्रपणे ओळखपत्र दिल्यानंतरच या सामाजिक संघटना आपले योगदान या नागरिकांना देणार आहेत. वसुदेव सोळुंके यांच्या या उपक्रमामुळे ज्येष्ट नागरिकांना मात्र मोठी सवलत मिळणार आहे.