कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन
बीड (रिपोर्टर):- मराठवाडा मुक्तीसंग्राममध्ये बीड जिल्ह्याचे महत्वपूर्ण योगदान आहे. या चळवळीमध्ये जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जिवाचे बलिदान दिले आहे. त्याचे आपण नेहमीच स्मरण ठेवले पाहिजे. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे ही ओळख पुसून नवीन विकसित बीड जिल्हा अशी ओळख आपण निर्माण करतोय . त्याचाच एक भाग म्हणून काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक नवीन प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे आता नवीन विकसित बीड अशी ओळख राज्यात आणि जिल्ह्यात होईल असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त करून बीडसह जिल्ह्याला विकासाच्या मार्गाने घेऊन जाण्याचा निश्चय केल्याचे त्यांनी सांगितले.
ते बीड येथे आयोजीत मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या चळवळीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात आणि गोविंदभाई श्राफ यांच्या समवेत बीड जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपले योगदान दिले आहे. त्यामध्ये आवर्जून स्वातंत्र्य सैनिक काशीनाथराव जाधव यांचा उल्लेख करावा लागेल. देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला तरी मराठवाड्याला निजामाच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी तब्बल 13 महिने संघर्ष करावा लागला. या संघर्षामध्ये अनेकांचे योगदान असून अनेकांना हौतात्म्ये पत्कारावे लागले आहे. आपण नेहमीच म्हणतो, बीड जिल्हा हा कामगार पुरविणारा जिल्हा आहे, ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे मात्र ही ओळख पुसण्यात येत असून काल मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जिल्ह्यातील अनेक विकासाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे. आजपर्यंत जिल्ह्याला एवढा निधी एकाच वेळी आला नसल्याचे त्यांनी म्हटले.
राज्य सरकारने केवळ 1 रुपयामध्ये शेतकर्यांना विमा देऊन शेतकर्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. पाऊस कमी असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना सरकारने वार्यावर सोडलेले नसून जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांना सोयाबीन पिकासाठी 25 टक्के अग्रीम मंजूर केला आहे. लवगरच विमा कंपनीकडून ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा होईल. आजही बीड जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे इतर पिकांच्या बाबतीतही सरकार लवकरच निर्णय घेईल. कायदा सुव्यवस्था राखणार्या पोलीस दलाला वाहनाअभावी त्यांची अडचण होऊ नये म्हणून 24 वाहने देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना प्रशासकीय पातळीवर अडचण येऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखपत्रही देण्यात येत आहेत. त्यामुळे तुम्ही आणि आम्ही विकसित बीड जिल्हा ही ओळख निर्माण करू, असे ते म्हणाले. या वेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक आणि पोलीस अधिक्षक नंदकुमा ठाकूरसह महसूल आणि जिल्हा परिषदेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.