अग्रलेख
व्याग्राचा बांबू, लोकशाहीला लोंबवू
गणेश सावंत
मो. नं. 9422742810
आम्ही उघडे झालो, आम्ही नागवे झालो, आम्ही कसेही वागलो, लोकशाही सोबत झोपलो, व्याभिचार केला तरीही आम्ही महात्मे आहोत. आमचा पक्ष हा भ्रष्टाचार्यांना, व्याभिचार्यांना धुवून पुसून स्वच्छ करणारा आहे. असाच काही आभासीपणाचा देखावा, भारतीय जनता पार्टी देशभरात उभा करत आहे, आणि हा देखावा निर्माण करण्या हेतू भलेही त्यांना लोकशाहीची निर्घृण हत्या करावी लागली तरी ते सर्रासपणे करत आहेत. याचा प्रत्यय परवा महाराष्ट्रातल्या मराठी ‘लोकशाही’ नावाच्या मराठी न्यूज चॅनलच्या बंदीवरून उभ्या महाराष्ट्राला आला. देशातल्या लोकशाहीच्या राज्यातल्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘लोकशाही’ चॅनेल 72 तासांसाठी बंद केले. काय गुन्हा होता, लोकशाही चॅनेलचा ? तर लोकशाही चॅनेलने भाजपाचा ज्येष्ठ नेता किरीट सोमय्या याच्या नागवेपणाचा नंगानाच आपल्या वृत्तवाहिनीवरून उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवला होता. प्रसार माध्यमांचे खरे तर जे आहे, जसे आहे तसे दाखवणे, तसे लिहिणे हे काम नव्हे तर त्यांचा धर्म आहे. तो धर्म त्यांनी पाळला. मात्र सोमय्या यांच्या नागवेपणावर भाष्य करण्यापेक्षा, त्या नागवेपणाचा किळस आणण्यापेक्षा हा नागवेपणा बाहेर आणला आणि त्यामुळे भाजपा पक्षातील काही नेत्यांचा किळसवाणा चेहरा समोर आला. याचा राग धरून भाजपाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ती कारवाई केली. नक्कीच त्या कारवाईला तात्काळ सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळाली आणि लोकशाहीचा विजय होत प्रसारण पुन्हा सुरू झाले. विषय हा आहे, स्वत:ला सुसंस्कृत आणि संस्कारशील मानणार्या भाजपाने स्वत:च्या पक्षातल्या नेत्याचा नागवेपणा बंदीच्या आडून झाकण्याचा जो केवीलवाणा प्रयत्न केला तो प्रयत्न लोकशाहीला मारक असल्याने खरंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाचा याठिकाणी आम्ही निषेध करू. ज्या किरीट सोमय्यांनी सर्रासपणे अंगप्रदर्शन केले, त्याचा काही भाग ‘लोकशाही’ने प्रसारीत केला. पुर्ण चित्रण जसे महाराष्ट्रभर नव्हे देशभर लोकांच्या हाती पडले, तसे ते चित्रण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हाती पडले असेल, असे असताना प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी का? हा सवाल आता देश विचारतोय.
व्याग्राच्या बांबुने
काही लोक चेहर्यावर सुरकुत्या असताना तारुण्य कटीपा आणू पाहत असतील तर हा कृत्रिम तारुण्याचा जोश छाती फुगवणारा नव्हे तर तो कृत्रिमरित्या धमण्यात रक्त उसळविणारा ठरेल. प्रत्यक्षात त्या उसळणार्या रक्तात काम वासना शमवणे एवढेच ध्येय असेल, परंतु वासना शमवणे हे ध्येय लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्याचे नक्कीच पाईक नव्हे, हे सर्वश्रूत असताना केंद्र सरकार सातत्याने एकहाती हुकुमत चालवण्याहेतू जी काही हिटलरशाही राबवते, ती संतापजनक म्हणावी लागेल. साधू संतांचे नाव घ्यायचे, देव-धर्माचे चरण शिवायचे, लोटांगणे घालायची. जप तपाला महत्व द्यायचे, अंधश्रध्देला साधना संबोधायचे, आमचे चारित्र्य हे गंगेपेक्षा निर्मळ आहे, हे दाखवण्यासाठी डांगोरे पिटवायचे, सुसंस्कृतपणा आमच्या नसानसात आहे, संस्कार ही केवळ आम्हालाच मिळालेली देणगी आहे, या आविर्भावात वागणार्या भाजपाला कृत्रिम तारुण्य कटीपाचे खरे चेहरे का दिसत नाहीत? उलट अशा खर्या चेहर्यांना दूर लोटण्यापेक्षा थेट त्यांच्या चेहर्यावर संस्कारशीलपणाचे मुखवटे चढवण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांची मुस्कटदाबी करणे हे सत्याचे हणन नव्हे काय? आम्ही या ठिकाणी लोकशाही’ या चॅनेलचे आणि त्यांचे संपादक कमलेश सुतार यांचे अभिनंदन तर करू, कौतुकही करू. त्यांनी पत्रकारितेचा धर्म सांभाळला आणि जे जसे आहे तसे लोकांपर्यंत सत्य मांडले, सत्य दाखवले. केवळ सोमय्या हे भाजपाचे नेते आहेत म्हणून भाजपाच्या सरकारमधील माहिती व प्रसारण मंत्रालयाची ही कारवाई असेल तर ते दुर्भाग्य म्हणावे लागेल. असे प्रसारणे आणि राजकारणातल्या नेत्यांचे अश्लील चाळे आत्ताच बाहेर आलेले नाहीत. समजा
सोमय्यांच्या ठिकाणी अन्य
पक्षाचा नेता असता तर
माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही तत्परता दाखविली असती का? या अगोदर असे कित्येक उदाहरणे आपल्याला देता येतील की, माध्यमांनी मुखवटे घातलेले मुक्या माजाचे नेते आणि त्यांचा भाद्रपद महिना उभ्या जगाला दाखवला. अनेकांची लफडे बाहेर आली, अनेकांचे अंतरबाह्य मन बाहेर आले, अंत:करण आणि त्या अंतकरणातले काळेबेरे समोर मांडण्यात आले, तेव्हा माहिती व प्रसारण मंत्रालयाला त्या त्या व्यक्तीचा मुलभूत अधिकार दिसला नाही, त्याचे व्यक्ती स्वातंत्र्य दिसले नाही, सोमय्याच्या बाबतीत मात्र मोदी-शहांच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला सोमय्याचे व्यक्तीस्वातंत्र्य दिसले, त्यांचे मुलभूत अधिकार दिसले. काय चालूआहे? आमच्या पक्षातल्या नेत्यांनी काहीही केले तरी ते ब्रह्मदेवाचे वरदान. स्वत:च्या पक्षातल्या नेत्यांना देवतांचे स्वरुप देताना सोमय्याच्या नागवेपणाला कामदेवाचे वर्णन करणार आहात का? सोमय्या ज्या पद्धतीने नागवे होतात, व्हिडिओ काढतात तेव्हा ते खरच मुलभूत अधिकाराचे मानकरी आहेत का? याचा विचार माहिती व प्रसारण मंत्रालयाने केला असता तर ते अधिक बरे झाले असते. सोमय्यांचा पुर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि ततली भाषा ऐकल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाची तळपायाची आग मस्तकाला जाते. सोमय्या थेट म्हणतात, महाराष्ट्राच्या पोरी बहुपाईशी होतात. म्हणजे तिखट मिर्ची असतात. अरे काय हा प्रकार आहे. हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर पक्षातल्या अशा व्यक्तीचे तोंड काळे करण्यापेक्षा माध्यमांच्या तोंडावर बंदीची पट्टी मारताय. शेमऽऽऽ शेमऽऽऽ
कोरा कागद, निळी शाई
लोकशाही कोणाला भीत नाही हे ब्रिद घेऊन कमलेश सुतार आणि त्यांच्या टीमने चॅनेलवर बंदी आणल्यानंतरही विविध सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली भूमिका महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर गेल्या काही तासात मांडली. माहिती व प्रसारण मंत्रालयाने जाणीवपुर्वक शुक्रवारच्या संध्याकाळी ‘लोकशाही’ वर 72 तासांची बंदी आणली. मात्र तितक्या तत्परतेने ‘लोकशाही’ने लोकशाहीचा म्हणजेच सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. तिथे त्यांना न्याय मिळाला, परंतु आठ ते दहा तासांच्या कालावधीमध्ये लोकशाहीवरील कारवाईबाबत महाराष्ट्रात जे पडसाद उमटले, पत्रकारांनी, समाजसेवकांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, राजकीय नेत्यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाची मुस्कटदाबी असल्याचे स्पष्ट केले, निषेध नोंदवले. भाजपाने केवळ ‘हम करे सो कायदा’ हे जर धोरण राबवण्याहेतू आता थेट व्यक्ती स्वातंत्र्यावर वृत्तपत्रांसह माध्यमांच्या स्वातंत्र्यावर बंदीची गदा आणण्याचा प्रयत्न होत असेल तर देशाच्या भविष्यासाठी आणि लोकशाहीसाठी हे घातक म्हणावे लागेल. सध्या भाजपाकडून
हुकुमाचे स्लोपॉईजन
देशभरात देणे सुरू आहे. 2014 पासून ते आजपावेत भाजपाचं समाजकारण, अर्थकारण, राजकारण उभ्या देशाने नव्हे जगाने पाहितलं, शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतय, हे धोरण अवलंबत जात-धर्म-पंथाला या दहा वर्षांच्या कालखंडात भाजपाने अधिक विकसित केलं . हे विकसित करताना जे ध्येय-धोरणे आणि कुरापती राबवण्यात येतात त्यामध्ये स्लोपॉईजनचा थोडासा थेंब असतो. आताही लोकशाहीवर केलेली कारवाई ही माध्यमांसाठी स्लोपॉईजनची लस म्हणावी लागेल. एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल आणि त्याची चाचपणी करायची असेल तर छोट्या-छोट्या गोष्टींवर त्याचा प्रयोग केला जातो. इथंही देशातल्या माद्यमांच्या अधिकारावर गदा आणण्या हेतू किंवा सेन्सॉरशीप नावाच्या गोंडस नावाखाली वृत्तपत्रांचे आणि माध्यमांचे अधिकार काढून घेण्याहेतू माहिती व प्रसारण मंत्रालयाने नव्याने सुरू झालेल्या लोकशाही चॅनेलवर बंदीचा प्रयोग केला आणि आम्ही कसेही वागलो, आम्ही नागवे नाचलो, आम्ही कपडे काढले, तरीही आम्ही किती संत आहोत हेच माध्यमांनी दाखवावे नसता आम्ही बंदीचा बडगा उगारू. हे दाखवण्यासाठीच भाजपाकडून सदरचा प्रकार झाला. परंतु माध्यमांच्या मुस्कटदाबीला इथला पत्रकार भिणार नाही, इथला सर्वसामान्य नागरीक सरकारच्या अशा धोरणांना पाठिशी घालणार नाही. परंतु भाजपाकडून ज्या ज्या वेळी अशा मुस्कटदाबी होत असतील त्या त्या वेळी तोंडावर पट्टी न बांधता आवाज प्रत्येकाने उठवावा.