पात्रूड गल्लीत
रात्री थरार
एक जखमी, एक फरार
बीड (रिपोर्टर)- देशभरात महात्मा गांधींच्या अहिेंसेबाबत चर्चाच नव्हे तर व्याख्यानावर व्याख्याने होत असताना, गांधी जयंती उत्साहात साजरी केली जात असताना गांधी जयंतीच्या पुर्वसंध्येला बीड शहरातल्या पात्रूड गल्लीत भाकर मागितली म्हणून मामाच्या मुलाने थेट छाताडावर पिस्तूल लावत गोळी झाडल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना रात्री साडेअकराच्या दरम्यान घडली. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे तर गोळीबार करणारा 22 वर्षी तरुण फरार असल्याचे सांगण्यात येते. या घटनेवरून पुन्हा एकदा बीडमध्ये अवैध शस्त्राबाबत प्रश्न उपस्थित होत असून शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्र असल्याची चर्चा केली जात आहे. या प्रकरणी बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, बीड शहरातल्या पात्रुड गल्लीत जखमी मनोज दत्ताराव जाधव याचे मामा राहतात. तोही त्याच भागात राहतो. रात्री मनोज हा मामाच्या घरी गेला, ‘मला भूक लागली आहे, जेवायला द्या’, असे त्याने म्हटले, त्या वेळी मामाचा 22 वर्षीय मुलगा रितेश विकास गायकवाड याने ‘तुला आमच्याकडे जेवायला का देऊ’, असे म्हणत दोघांमध्ये वाद झाला. रितेशने संतापाच्या भरात घरातून अवैध पिस्टल काढली आणि मनोजच्या छाताडावर लावली. काही क्षणात रितेशने गोळी झाडली. यात मनोज गंभीररित्या जखमी झाला. त्याला तात्काळ बीड येथील जिल्हा रुग्णालयामध्ये गोळी झाडणार्या रितेशनेच दाखल केले, मात्र तेथे उपचार होत नसल्याने आज पहाटे जखमी मनोजला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र या दरम्यान गोळी झाडणारा रितेश हा फरार झाला. त्याची माहिती बीड पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्रीपासून रितेशच्या घराची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी रितेशच्या घरातून आणि घटनास्थळावरून झाडलेल्या गोळीची रिकामी कॅप हस्तगत केली. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयात असताना जखमी मनोजने दिलेल्या जबाबावरून रितेशविरोधात कलम 307, 3/25 मुंबई शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय गव्हाणे करत आहेत.