बीडच्या शिवतीर्थावर पहाटे तीनला मराठ्यांचा जागर
हजारो मराठ्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे कडाडले
जेव्हा बीड जिल्हा एक होतो तेव्हा राज्याला दिशा देतो
पहाटेची सभा ऐकायला सरकार जागं -जरांगे पाटील
बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्याच्या इतिहासातच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहाटे साडेतीन वाजता बीडच्या शिवतीर्थावर हजारो मराठ्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होते. ती सभा मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या, या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी काढलेल्या संवाद यात्रे दरम्यानची होती. सायंकाळी सहा वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत एकवटलेले मराठा समाजातील स्त्री-पुरुष आणि त्यांच्याकडून दिल्या जाणार्या मराठा आरक्षणाच्या घोषणा उभ्या महाराष्ट्राला अस्तित्व दाखवून देत होत्या. पहाटे पावणे तीनच्या दरम्यान 48 गावे करत आलेला योद्धा जरांगे पाटील बीडच्या शिवतीर्थावर उभारलेल्या व्यासपीठावर जातो. तमाम बीडकरांना वंदन करत ज्या ज्या वेळेस बीड जिल्हा एक होतो त्या त्या वेळेस तो राज्याला दिशा देतो, असं वाक्य म्हणताच, टाळ्यांचा कडकडाट होतो. त्याच वेळी 29 ऑगस्टला सुरू झालेला हा लढा लोकशाही मार्गाचा आहे, आपल्याला अण्णासाहेब पाटील, विनायक मेटे, आण्णासाहेब जावळे, देवीदास वडजे, काकासाहेब यांच्यासह 45 मरठा बांधवांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही, असे म्हणत, आमचं एकच मागणं, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं असल्याचे सांगून आत्ता पहाटेची सभा ऐकण्यासाठी सरकार जागं असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलं. बस्स, आता वळवळ करायची नाही, आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्यायचं, असं म्हणत एकीचं बळ ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं.
बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक अर्थात शिवतीर्थावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद यात्रा निमित्त आयोजीत कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारण्यात आलं होतं. सायंकाळी सहा वाजण्याची सभा पहाटे तीन वाजता सुरू झाली. या कालखंडात उपस्थित मराठा समाजाच्या हजारो महिला-पुरुषांसह अबालवृद्धांनी तब्बल आठ तास एका ठिकाणी बसून शिवजागरात मराठा आरक्षणाचं जागरण केलं. बीड जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहाटेच्या दरम्यान झालेली ही सर्वात मोठी पहिली सभा असेल. उपस्थित मराठ्यांना बोलताना जरांगे म्हणाले, जन्मभूमीने मला भरभरून दिले आहे, ज्या ज्या वेळेस बीड जिल्हा एक होतो त्या त्या वेळेस तो राज्याला दिशा देतो. हा जिल्हा ज्या भूमिकेत असतो तीच भूमिका राज्याला घ्यावी लागते. बीडची सभा पहायला सरकार जागं असल्याचं सांगून हे माझं गाव आहे, माझा जिल्हा आहे. मी सोलापूरहून आलो आहे. हे 49 वं गाव आहे. एवढ्या उशिराची भारतातील आणि जिल्ह्यातील मराठा एकत्रित झालेली ही पहिली सभा आहे. 29 ऑगस्टला लढा सुरू झाला तो लोकशाही मार्गाने सुरू होता. अण्णासाहेब पाटील, विनायक मेटे, अण्णासाहेब जावळे, देवीदास वडजे आणि काका साहेबांसह 45 मराठा बांधवांचं बलिदान आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही, आमची सरकारला एकच मागणी आहे, आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, कोकणात दिलं जातं, विदर्भात दिलं जातं मग मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राने तुमचं काय घोडं मारलं आहे. आंदोलन सुरू झालं तेव्हा तीन दिवसांनी आंदोलनकर्त्या मराठा महिलांसह पुरुषांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यात अनेक जण जखमी झाले. कित्येकांना छर्र्रयाच्या गोळ्या लागल्या, ते अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. आमच्या महिला भगिनींना रक्तबंबाळ का करण्यात आलं? याचं उत्तर अद्याप मिळालं नाही. लढा अधिक तीव्र होत गेल्यानंतर सरकारचे अनेक मातब्बर मला भेटण्यासाठी येऊ लागले, मला अॅडजेस्ट करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. कोणी कानात बोलतो म्हणाले, कोणी कोपर्यात चला म्हणाले, माझा लढा इमानदारीचा आहे, सत्याचा आहे, आता बस्स वळवळ करायची नाही, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं. कोणी अंगावर आलं तर मी शिंगावर घेईल, दोन दिवस झालं येवल्यावाल्यानंी विरोध बंद केला. आम्ही बोलणं बंद केलं. ही एकजूट अशीच ठेवा बांधवांनो. शेवटी एकच सांगतो, शांततेच्या मार्गाने आपल्याला आंदोलन करायचं आहे, हिंसक मार्गाने आंदोलन करायचं नाही, आत्महत्या कोणी करायची नाही, सरकारला आपण 40 दिवस दिले आहेत, 14 तारखेला घरातल्या प्रत्येक माणसाने सराटे अंतरवलीत यायचं, असं आवाहन करत जरांगे यांनी हा लढा असाच तेवत राहील, असा इशारा सरकारला दिला.
शाहराने साज चढविला
मराठ्यांनी जागता पहारा दिला
बीडच्या शिवतीर्थावर इतिहासात पहिल्यांदाच सायंकाळी सहा ते पहाटे चार वाजेपर्यंत मराठ्यांचा जागता पहारा पहायला मिळाला. सहा वाजता सुरू होणारी सभा पहाटे तीन वाजता सुरू झाली मात्र मध्यंतरी सात तासांच्या कालखंडात लातूरचे शाहीर संतोष साळुंखे यांनी शिवचरित्राचा जाज्वल्य इतिहास आपल्या पहाडी आवाजातून उपस्थितांना सांगितला आणि उपस्थित श्रोत्यांना तब्बल सात तास मंत्रमुग्ध करत ठेवले. संतोष साळुंखेंचे कौतुक करावे तेवढे थोडेच.