मराठ्यातले 140 घरे गर्भश्रीमंत झाले म्हणजे सर्व मराठे श्रीमंत’ असा जो जाणीवपुर्वक डांगोरा पिटवत गैरसमज निर्माण केला जातो त्यांच्यासाठी आज सराटे आंतरवलीत उसळलेला मराठ्यांचा जनसागर हा चटनी-भाकरीवरचा मराठा होता. इथे कोणी आणण्यासाठी पैसे दिले नव्हते, वाहनांची व्यवस्था केली नव्हती. तर इथं येणारा मराठा हा थोडक्यात भाकर आणि डोळ्यात लेकरांचं भविष्य घेऊन सराटे आंतरवलीत आला होता.
‘एक मराठा लाख मराठा’ नव्हे तर ‘एक मराठा कोटी मराठा’ असे चित्र आज सराटे आंतरवलीत पहावयास मिळत होते. रात्रीपासून लाखो मराठे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून सराटे आंतरवलीत जमा झाले होते. या प्रचंड जनसमुदायांपसमोर पुढे बोलताना जरांगे म्हणाले, गोरगरीब मराठ्यांनी मोठे केलेले राजकारणी आम्हाला विचारतो की, सभेसाठी पैसे कुठून आले, सात कोटी खर्च येणार, अरे हे वावर विकत घ्यायचं नाही, शेतकर्यांनी फुकट दिलं सभेसाठी. 170 एकरमध्ये ही सभा होतेय, 123 गावातील फक्त बावीस गावातून 21 लाख जमा झाले. लोकांनी पैसे दिले आहेत, बाकीच्या गावांना हे पैसे तसेच ठेवा म्हणून सांगितलं आहे. एवढ्या मोठ्या नेत्याला काय बोलावे हे कळायला हवे.
अजित पवार यांनी त्यांना समज द्यावी, नसता मराठे मागे लागतील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. मराठा समाजाच्या सहा मागण्या आज जरांगे यांनी सरकारसमोर मांडल्या. कोण म्हणतं, मराठा एक होत नाही. मराठा एक होत नाही हे बोलणार्यांना आजच्या गर्दीचे हे उत्तर आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना नव्हे तर राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसींमध्ये समाविष्ट करावं, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी म्हटले. सरकार तुमच्या हातात दहा दिवस आहे. हा उसळलेला मराठ्यांचा जनसागर तुम्हाला एकच मागणं मागतोय, दहा दिवसात आरक्षण द्या, तुम्हाला शब्द दिला होता, त्या शब्दानुसार गेल्या तीस दिवसात आम्ही एकही मागणी केली नाही. माझा समाज, माझा मराठा शांततेत आलाय, शांततेत जाईल, मराठा दिलेला शब्द मोडत नाही, आपल्या लेकरा बाळांसह या ठिकाणी माता भगिनी आलेल्या आहेत. आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी त्या होय, गैरसोयीतही इथे तळ ठोकून आहे. आता आम्ही हटणार नाही मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मागे सरकणार नाही, शेवटची विनंती करतो, समितीचे काम बंद करा, तुमचं -माझं ठरलं होतं तीस दिवसात कायदा करतो, पंतप्रधान मोदी साहेब, शहा साहेब आणि सर्व केंद्रिय मंत्रिमंडळांना व राज्य शासनाला कोट्यवधी मराठा समाजाकडून हात जोडून विनंती करतो, सर्वात मोठ्या समाजाची अवहेलना करू नका, कुणबी प्रमाणपत्र द्या, दहा दिवसांपेक्षा जास्त वाट पहाण्याची आमची तयारी नाही. हे मराठ्यांचं आग्या मोहळ आहे, ते शांत आहे, हे उठलं तर…? असा गर्भीत इशारा देत भुजबळ आणि सदावर्ते या दोघांना मराठ्यांविरुद्ध बोलण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सांगितल्याचा गंभीर आरोप या जाहीर सभेमधून जरांगे यांनी केला. दहा दिवसात आरक्षण द्या, नसता 22 तारखेला पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. आता माघार नाही, आरक्षण दिलं नाही तर टोकाचं उपोषण करणार. एक तर माझी अंत्ययात्रा निघेल नसता आरक्षणाच्या विजयाची यात्रा निघेल, असा पुनरुच्चार करत लाखो मराठ्यांच्या साक्षीने जरांगे यांनी दहा दिवसाचे आखरी अल्टिमेट देत ‘मरा तो हटा तो मर्हट्टा’ हे दाखवून दिले.