गणेश सावंत
मो. नं. 9422742810
सराटे आंतरवलीत उसळलेला मराठ्यांचा जनसागर हा कुठल्या पक्षाचा अथवा कुठल्या नेत्याच्या विचाराचा नव्हता, त्या जनसागरात न्यायाची हाक होती, आपल्या लेकरा-बाळांच्या भविष्याची काळजी होती, तो उसळलेला जनसागर ओरडून जगाला सांगत होता, आम्ही कष्टाळू, त्या कष्टाचे चीज द्या. आम्हाला आमचा हक्क द्या, आमच्या लेकरांना भविष्य द्या, तो समाज आणि तो जनसागर मनोज जरांगे नावाच्या आंदोलकाच्या नेतृत्वात एवढ्यासाठीच आला होता, की गेले चाळीस-पन्नास वर्षे मराठा असो वा इतर जाती-जमातीचे पुढारी असतो त्यांनी मराठ्यांच्या भविष्याला हरताळ फासली. आता मनोज जरांगेंच्या नेतृत्वात लेकरांच्या भविष्याचे आरक्षणातून दीप उजळायचे, काल आलेला एक-एक मराठा हा श्रीमंत 140 मराठ्यांच्या घरांपैकी नक्कीच नव्हता, तो होता एकरवाला-दोन एकरवाला, पाच एकरवाला. दोन-पाच टक्के बागायतदार तर बाकी सर्व कोरडवाहू! नरड्याला कोरड पडली, डोक्यावर सुर्य आग ओकतोय, तशा स्थितीतही मराठा आणि त्याची कारभारीन सराटे आंतरवलीत चित्त लावून बसली होती. तिला वाटत होतं, 30 दिवसांचा कालावधी गेलाय अन् आता आपल्या लेकराचं भविष्य सरकार मायबाप आरक्षणातून प्रकाशमय करेल. मात्र दुर्दैव, राज्यात नव्हे तर देशाच्या पातळीवर अशी कुठलीच जाहीर सभा झाली नाही, की ज्या जाहीर सभेमध्ये कित्येक लाखांचे लोक आपले गार्हाणे घेऊन आले होते. मात्र इथं मराठ्यांच्या आरक्षणावरून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य पाहण्यापेक्षा निवडणुकातल्या
सत्ताकारणाचं गणित
मांडण्यात मायबाप सरकार आणि त्यांचे नुमाइंदे मश्गुल असल्याचे दिसून आले. जरांगेंनी जाहीर सभेतून 24 तारखेपर्यंत आरक्षण न दिल्यास पुढची जबाबदारी सरकारची असेल, असा निर्वाणीचा इशारा दिला. एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नसता आरक्षणाची विजयी यात्रा निघेल, असे टोकाचे भाष्य केले. जरांगेंच्या भाषणात आणखी काही मिळून आले नसले तरी जरांगेंच्या भाषणातून एकवटलेल्या मराठा समाजाचे ध्रुवीकरण करण्याहेतू सत्ताकारणाचं ‘बीज’ गणित घेऊन बसलेल्यांनी मराठ्यांना शब्द देण्यापेक्षा त्यांच्या बगलबच्च्यांनी जरांगे किती वाईट, अअभ्यासू हे दाखविण्याचा प्रयत्न केला. मग छगन भुबळ असोत, नुसतेच नावाला वकील असलेले गुणवंत सदावर्ते असोत अथवा विखे पाटील, प्रवीण दरेकर असोत यांना जरांगेंची भाषा आणि त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावीशी वाटली, मात्र कित्येक लाखाने आलेल्या मराठ्यांची आर्त हाक ना त्यांना दिसली ना सरकार मायबापाला दिसली. जरांगे किती वाईट हे दाखवून मराठ्यांच्या एकीचे ध्रुवीकरण होईल असे जर सत्ताकारणाचं बीज रोवणार्यांना आणि गणित मांडणार्यांना वाटत असेल तर आम्ही उघडपणे सांगू, आरक्षणाच्या विषयावर मराठ्यांच्या एकीचं ध्रुवीकरण आता होणे शक्य नाही. त्याचे कारणही तसे…. आमच्याकडे बुद्धी आहे, आमच्याकडे शक्ती आहे, आमच्याकडे धैर्य ठेवून संघर्ष करण्याची तयारी आहे. तरी आमच्या लेकरांना केवळ आरक्षणामुळे पुढचे शिक्षण घेता येत नाही, एक-दोन मार्कासाठी एक-दोन एकरला उभी काडी लावावी लागते, सावकाराचे दार ठोठावे लागते, कारभारीनचं मंळसूत्र सावकाराच्या तिजोरीत ठेवावे लागते, तरीही डोनेशनच्या तोंडाला तोंड जुळत नाही, ही प्रतिक्रिया काल उपस्थित असलेल्या अनेक महिलांनी जाहीरपणे दिली. त्या प्रतिक्रियेची दखल सत्ताधार्यांना घ्यावीशी वाटली नाही. परंतु नेत्यांचे
कच्चे धुणारे बगलबच्चे
काल बोलले. मराठ्यांच्या एकीचे ध्रुवीकरण करण्याबरोबर जाती जातीत तेढ कसा निर्माण होईल यावरही भाष्य या बगलबच्च्यांनी केले. गुणवंत सदावर्ते नावाचा बगलबच्चा नेत्यांचे कच्चे धुणारा हा माणूस दिशाहीन आहे. जो माणूस अतिरेक्याचा पुरस्कर्ता असू शकतो, नथूरामसारख्या अतिरेक्याला आपलं दैवत माणू शकतो, तो माणसाच्या डोक्यात शांतीचा, समतेचा विचार असूच शकत नाही. त्याला दिशा कुठून येईल. ज्या वेळेस या राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं त्या वेळेस फडणवीस सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, त्या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाणारा हाच माणूस, ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्या वेळेस ‘एक मराठा लाख मराठा’ची घोषणा देणारा आणि मराठ्यांना टिकावू आरक्षण द्या म्हणणारा हाच माणूस. आणि आज पुन्हा मराठठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणाराही हाच माणूस. जरांगेंची भाषा कुठली? यावर भाष्य करायला गेलं तर जरांगे मराठ्यांच्या बाजुने सरकारला जाब विचारतायत, मात्र गुणवंत सदावर्तेंची भाषा कुठली, तुम्ही स्वत:ला पाटील म्हणताय, पाटील कुठे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात का? मराठ्यांना आरक्षण देण्याची गरज नाही, यासह अन्य शब्द प्रयोग करून मराठ्यांना डिवचण्यात गुणवंत सदावर्तेंनी धन्यता मानली. व्यासपीठावरून मनोज जरांगे जे बोलले ते गुणवंत सदावर्तेंच्या मराठा द्वेषावरून दिसून आले. हा खरचं मराठ्यांचा द्वेष आहे, की आगामी निवडणुकांसाठी
फडणवीसांचा मुखवटा
गुणवंत सदावर्ते आहे. ही उघड शंका आता जाहीरपणे मराठे घेताना दिसून येत आहेत. ज्या फडणवीसांकडे एक मुरब्बी राजकारणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दरबारातले गुणीरत्न म्हणून पाहितलं जातं, त्या फडणवीसांकडून गुणवंत सदावर्तेंद्वारे विकेंद्रीकरण आणि ध्रुवीकरणाचे बीजगणित मांडण्यात येत असेल, तर फडणवीसांनाच नव्हे तर त्यांच्या दिल्लीतख्त पोषित असलेल्यांनाही अवघड म्हणावे लागेल. राजकारण करताना मुखवट्यांचा सहारा घ्यावा लागतो आणि तो घ्यायलाही हवा. परंतु एखाद्या पक्षाच्या नेत्याला चितपट करायचं असेल तर तो मुखवटा अधिक परिणामकारक राहतो. मात्र इथं अखंड मराठा समाज आहे आणि त्या मराठ्यांना मुखवट्याच्या आडून निशाना बनवला जात असेल तर मुखवटा कधी फाटेल आणि उभ्या देशाला खरा चेहरा केव्हाही दिसेल. खरं पाहिलं तर एकवटलेल्या मराठ्यातून शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांना नक्कीच धडकी भरलेली असेल, मात्र राज्यकर्त्यांना हे नवं नसतं. नक्कीच अशा सभांमधून उपस्थितांच्या अंत:करणातले सत्य चाणाक्ष राजकारण्यांच्या डोळ्यात दिसते तेव्हा कोणाला ते खुपते अन् कोणाला ते सत्य वाटते. इथे शिंदे-फडणवीस-पवारांपैकी कालचा जनसागर हा कुणाला खुपला आणि कोणाला सत्य वाटला हे लवकरच कळेल. मात्र
उपस्थित समाज
हा श्रीमंत होता की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल होता हे एकदा सरकारने छातीवर हात ठेवून सत्य सांगावे. येणारा प्रत्येक माणूस हा लेकराच्या भविष्यासाठी आलेला होता. तो कोणी श्रीमंत नक्कीच नव्हता. मात्र मनाच्या श्रीमंतीतले कष्टाळू मराठे जेव्हा एकीची वज्रमुठ बांधतात तेव्हा इतिहास घडतो. हा मराठ्यांचा इतिहास नक्कीच माहित आहे, अशा वेळी गरजवंतांना त्यांची निकड ओळखून ती गरज पुर्ण करणे हे स्वराज्याचे लक्षण मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महाराजांचे एकच ध्येय असायचे, सर्वास पोटास लावणे आहे, मग तिथे जात-पात-दर्म-पंथ पाहिले जात नव्हते. इथे सत्ताकारणाच्या गणितात जात-पात-धर्म-पंथ सर्वसामान्य रयतेकडून नव्हे तर सत्ताधार्यांकडून मांडले जाते, हे दुर्दैव. मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, यापेक्षा मराठा, ओबीसी यांच्यात तेढ कसे यावर जास्त भाष्य केलं जातं. याचं उदाहरण काल आपल्याला पहायला मिळालं. विखे पाटलांना बाहेर काढण्यात आलं, प्रवीण दरेकरांना त्यावर भाष्य करावसं वाटलं, छगन भुजबळांसारखे
महात्मा फुलेंचे पाईक
सत्ताकारणाच्या बीजगणितात गुंततात तेव्हा आश्चर्य वाटतं, ज्या महात्मा फुलेंनी अखंड मराठा समाजावर सर्वात मोठा उपकार केला, तो म्हणजे रायगडावर मराठ्यांच्या बापाची समाधी सापडून तिथे दिवा लावला अन् त्या दिव्याच्या प्रकाशात अखंड मराठी माणूस आज तेजोमय होतोय. त्या महात्मा फुलेंच्या पाईकांनी मराठा, ओबीसी यांच्यात वाद कसा निर्माण होईल यावर भाष्य करावं, भुजबळांनी खरं तर मराठ्यांचं अर्थकारण पाहून आरक्षणाचं धोरण आखलं पाहिजे होतं, महात्मा फुलेंचा शेतकर्यांचा आसुड प्रत्येक कष्टाळू मराठ्याच्या खांद्यावर आहे, हे उघड सत्य नाकारता येणारं आहे का? सराटी आंतरवलीत एक काय आणि लाख काय, अथवा कोटी काय ,जे मराठे जमले होते ते छाताडाने, मनगटाने, बुद्धीने नक्कीच दुर्बल नव्हते. मात्र अर्थकारणात ते दुर्बल आणि दुर्बलच आहेत. आहो गेल्या वीस वर्षांच्या कालखंडात जेवढ्या काही शेतकर्यांनी आत्महत्या केल्या, त्यामध्ये ऐंशी टक्के मराठे आहेत. आता सरकारने सत्ताकारणाचे बीजावरोपण करण्यापेक्षा मराठ्यांच्या पोटतिडकीच्या हाकेकडेे लक्ष द्यावे.