देवेंद्र फडणवीस आज पुन्हा दिल्लीला जाणार?
मुंबई (रिपोर्टर) शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास
मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदारांसह केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. शिंदे यांच्या बंडाला भाजपचीच फूस असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. अशातच आता भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज दुपारनंतर पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फडणवीस यांची या आठवड्यातील ही चौथी दिल्ली वारी असणार आहे. राज्यपाल कोरोनातून बरे होऊन राजभवनात परत आल्याने सत्तापालटासाठी आता वेगवान हालचालींना सुरुवात झाली.
शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडामागे आमचा हात नाही, असा दावा भाजप नेत्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र हा दावा सुरू असतानाच भाजपचे काही नेते मात्र बंडखोर आमदारांसोबत हॉटेलमध्ये दिसून आले आहेत. तसंच राज्यातही भाजप नेत्यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी राज्यभरातील भाजप नेत्यांची खलबतं सुरू आहेत. त्यानंतर फडणवीस हे दुपारनंतर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी दाखल होतील, अशी माहिती आहे. भाजप नेत्यांचं मौन
शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी जवळपास 40 आमदारांनी बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरे राजकीय जीवनातील सर्वांत मोठ्या संकटात सापडले आहेत. मात्र असं असताना दिल्ली आणि मुंबईतील भाजप नेत्यांनी मौन बाळगलं आहे. भाजपश्रेष्ठींशी महत्त्वाची चर्चा करण्यासाठी दिल्लीत येऊन गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्लीतील माध्यमांशी बोलणे टाळले आहे. ऑपरेशन पूर्णत्वाला जाईपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही, अशी सूचना सर्व भाजप नेत्यांना देण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
बंडखोर शिवसेना आमदारांना आता
केंद्राची ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा
एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरी करून गुवाहाटीमध्ये थांबलेल्या शिवसेना आमदारांना आता केंद्र सरकारची सुरक्षा पुरवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये गुवाहाटीमध्ये थांबलेल्या शिवसेना आमदारांपैकी काहींच्या कार्यालयांमध्ये तोडफोड झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे या आमदारांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारवर देखील आरोप केला जात होता. या पार्श्वभूमीवर आता या बंडखोर आमदारांपैकी जवळपास 15 आमदारांना केंद्र सरकराने वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
’सिल्वर ओक’वर महाविकास आघाडीच्या नेत्यांची खलबते
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरमहाविकास आघाडीची खलबतं सुरू झाली आहेत. आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण दाखल झाले आहेत. तर, शिवसेनेकडून अनिल देसाई सहभागी झाले आहेत. आगामी काळात कोणती पावले उचलावीत याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष सावध झाले आहेत. मागील काही दिवसात शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्याही बैठका पार पडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शनिवारी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेने बंडखोरांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या 16 बंडखोरांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे.