पंढरपूर (रिपोर्टर) पंढरपुरात आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली.पंरपरेला अनुसरुन राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक लता शिंदे यांच्यासोबत महापूजा केली.आज पहाटे 2 वाजून 55 मिनिटांनी विठ्ठल रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्र्यासोबत यावेळी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मुरली नवले आणि जिजाबाई मुरली नवले हे दाम्पत्य यावर्षीचे मानाचे वारकरी ठरले.
ज्ञानोबा-तुकोबांचा अखंड जयघोष, पाऊस वार्याची झुळूक अन् शेकडो किलोमीटर चालून आलेल्या वारकर्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पहाटे आषाढीची विठ्ठल-रुक्मिणी महापूजा केली. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी पांडुरंगाला साकडे घातले.राज्यातले सर्वच लोक सुखी आणि समृध्द होवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यानी विठ्ठलाकडे केली आहे. यावर्षी मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची पुजा करण्याचा मान बीड जिल्ह्याला मिळाला. जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई येथील मुरली नवले, जिजाबाई नवले या दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठलाची महापुजा केली. उभ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या भक्तीजागराला आज आषाढीच्या महापूजेने कळस चढवला. विठू माऊलीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी वारीतून पंढरीकडे धाव घेतली आहे. त्यांच्या विठ्ठल दर्शनाची आस आज पुर्ण झाली. इतक्या दिवस शांत असणार्या पंढरपुरात आषाढीच्या निमित्ताने भक्तांचा कल्लोळ दाटला आहे.
विठ्ठला, माझे पाय चांगले राहू दे
जिजाबाईंचं अभिमानाचं मागणं
खरंतर, विठ्ठलाकडे अनेकजण धन, दौलत, जमीन-जुमला आणि दीर्घ आयुष्य मागतात. पण मानाचा वारकरी ठरलेल्या जिजाबाई यांनी विठुमाऊलीकडे काय मागितलं? असं विचारलं असता, त्यांनी दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल. याबाबत त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, माझे पाय चांगले राहू दे! अशी मागणी केली. म्हणजे पुढच्या वर्षी पुन्हा वारीला येता येईल. त्यांचे पती मुरली बबन नवले हे गेल्या 30-35 वर्षांपासून म्हणजेच लग्नाआधीपासून वारी करत आहेत. पण जिजाबाई यांचं हे वारीचं दुसरंच वर्ष आहे. त्यांचे पती मागील 12 वर्षांपासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला येत आहेत. नवले दाम्पत्य हे बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रूई येथील रहिवासी आहे. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून मुरली नवले हे 1987 पासून न चुकता वारीला येतात.