बीड : मराठवाड्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघात यंदा चांगलीच चूरस वाढली असून निवडणुकीत जातीय रंग दिसून येत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचं केंद्रस्थान असल्याने बीड जिल्ह्यात मराठा समाजही निवडणूक प्रक्रियेत सक्रीय झाला आहे. बीडमध्ये पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) महाविकास आघाडीच्या बंजरंग सोनवणेंचं आव्हान असून वंचित बहुजन आघाडीनेही येथील मतदारसंघात उमेदवार दिला आहे. त्यामुळे, येथील निवडणूक तिरंगी होत असली तरीही थेट लढत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांच्यातच असणार आहे. मात्र, बीडमध्ये जरांगे पॅटर्नही लक्षवेधी आहे. त्यातच, जरांगे यांनी मराठा आरक्षण देणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. आता, वंचितच्या उमेदवाराने थेट स्टँप पेपरवरच आरक्षणाबाबत लिहून दिलं आहे.
बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज अंतिम टप्प्यात आला असून सायंकाळी 6 वाजता येथील प्रचाराच्या तोफा तंडावणार आहेत. त्यामुळे, पंकजा मुंडेंसाठी आज स्वत: उदयनराजे भोसले व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची परळीत सभा पार पडली. तर, शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बजरंग सोनवणेंच्या प्रचारासाठी सभा होत आहे. त्यातच, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. वंचितच्या उमेदवाराने थेट बॉण्ड पेपरवरच आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणारे शपथपत्र तयार केलं असून ते प्रसिद्धही करण्यात आले. विशेष म्हणजे हे शपथपत्र मनोज जरांगे पाटील यांना सादर करण्यात येणार असल्याचंही उमेदवाराने स्पष्ट केले आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाबाबतच्या आरक्षणाची हमी थेट बॉण्डवर लिहून जाहीर केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जो उमेदवार आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल, त्याच्या पाठिशी मराठा समाजा उभा राहील असं म्हटलं होतं. त्यानंतर आता वंचितचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी आपली भूमिका बॉण्डवर लिहून देत स्पष्ट केली. तसेच, हे शपथपत्र जरांगे पाटलांपर्यंत पोहोचविणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, बीडच्या निवडणुकीत नवाच ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. आता, जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून हे शपथपत्र जरांगे स्वीकारतील का, मराठा समाज वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी जाईल का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.