कारवाई करण्याची मागणी
बीड (रिपोर्टर): अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रातच गेवराई विधानसभा मतदारसंघातल्या पाडळसिंगी येथे गेवराई पोलीस ठाण्याचे पीआय बांगर यांनी विनाकारण काही तरुणांना लाठ्यांनी मारून गाडीत बसवल्याने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी प्रशासनाकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाधिकारी सातत्याने मतदानाचा हक्क बजावण्याबाबत आवाहन करत आहेत. मात्र पोलीस प्रशासन काही ठिकाणी दादागिरीची भाषा करून लाठ्या काठ्या उगारत मतदारांना भयभीत करत असल्याचे दिसून येते. आज सकाळी पाडळसिंगी येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी अनेक मतदार उपस्थित होते. या दरम्यान गेवराई पोलीस ठाण्याचे पीआय बांगर त्याठिकाणी आले आणि शिस्तीच्या नावाखाली स्वत:च बेशिस्त होत अरेरावीची भाषा करून काठ्या उगारू लागले. काही तरुणांना त्यांनी काठीने मारहाणही केली. एका 17 वर्षीय तरुणाला गाडीत बसवले. बांगर यांच्या वर्तनाने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बांगर यांच्या या कार्यपद्धतीचा गावकर्यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून दादागिरी करणार्या बांगरांवर कारवाई करण्याची मागणी केली.