गणेश सावंत-
अखंड ब्राह्मांडात भुगोलाबरोबर इतिहास असलेल्या अखंड हिंदुस्तानात आज धर्म आणि जातीवर राजकारण करत सत्ताकारणाच्या खुर्च्या शेकवल्या जात आहेत. ज्या महाराष्ट्राकडे बहुजनांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र, सुसंस्कृत आणि मानवतावादी महाराष्ट्र म्हणून पाहिले जाते त्या महाराष्ट्रात तर धर्मांधतेची आग अन् जातीयवादाचा टेंभा गावागावात शिलगताना दिसतोय. परंतु धार्मिकतेची ही आग आणि जातीयवादाचा आग आम्हाला तिथच शिलगताना दिसतेय जिथले घर भरल्या पोटाने टामटूम आहेत अन् जातीयवादाचा टेंभा तिथच पेटताना दिसतोय ज्याच्या घरात अर्धपोट भरण्यापर्यंत तरी साधन आहेत. यात चिरडले जातायेत ते रिकाम्या पोटाने भाकरीसाठी धडपड करणारे लोक. होय, आम्ही ठणकावून सांगतोय, धर्म त्यांनाच आठवतो ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे तेच धर्मांध आहेत आणि यांचा लढवय्या धर्म कसा स्वत:च्या लेकरा बाळांना सुरक्षित ठेवायचे, शिक्षणासाठी देश-विदेशात पाठवायचे आणि धार्मिक धुव्रीकरण करत युद्धासाठी मात्र सर्वसामान्य जातीतले पोरांचे मस्तके भडकवत त्यांना रस्त्यावर पाठवायचे. होय, जात त्यांनाच आठवते ज्यांच्यात कमी बुद्धी आहे, जे दुसर्याच्या हातातले कठपुतली आहेत, जे कच्च्या कानाचे आहेत, ज्यांना स्वत:च्या परिवारापेक्षा सत्ताकारणाचं गणित जुळवणार्या नेत्यांचं बटिक होणं पसंत असतं. हेच लोक जातीयवादावर भाष्य करतात. अरे, थू तुमच्या जिंदगानीवर जिथं माणूस म्हणून जगण्यासाठी तुम्हाला संधी दिलेली असताना आणि छत्रपतींच्या महाराष्ट्रात तुमचा जन्म झालेला असताना तुम्ही जातीयवादावर आणि धर्मावर आज एकेविसाव्या शतकात भाष्य करतात.
छत्रपतींना तेव्हा समजलं होतं
स्वराज्य घडवायचं असेल, गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर इथं जात-पात-धर्म-पंथापेक्षा माणूस धर्माला अनन्यसाधारण महत्व देत अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारावा लागेल. आजतरी हे एकेविसावे शतक माहिती तंत्रज्ञानाचं पुढचं पाऊल घेऊन चालणारा आहे, त्या सोळाव्या शतकात तर धर्मांधतेचा आगडोंब होता. जिथं धर्मांधांनी संत ज्ञानेश्वरांना सोडलं नाही. जिथं मनुवाद्यांनी संत तुकाराम महाराजांना सोडलं नाही. अहो, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अडवला गेला त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी
मुर्ती घडवणार्यांचे हात
अस्पृश्य कसे?
असा जळजळीत सवाल तेव्हाच्या धर्ममार्तंडांना विचारला. त्याचे एक उदाहरण आपल्याला इतिहासामध्ये पहायला मिळते. जेव्हा जावळीच्या मोर्यांचा पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी भोरप्याच्या डोंगरावर एक किल्ला बांधला आणि त्याचे नाव ‘प्रतापगड’ ठेवले. तिथे भवानीमातेचे एक मंदिरही बांधण्यात आले. शिवाजी महाराज जेव्हा प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी तिथे खालच्या जातीतील काही माणसे दूरवर उभी असलेली पाहिली. त्याविषयी विचारपूस करता त्यांना सांगण्यात आले की ती मूर्ती घडविणारी अस्पृश्य माणसे होती. शिवाजी महाराजांनी त्यांना पूजा करण्यास सांगितले. पुजार्याने यावर आक्षेप घेतला पण शिवाजी महाराजांनी आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ विचारले की जर हे अस्पृश्य मूर्ती घडवू शकतात तर मग तीच मूर्ती त्यांनी पूजा केल्याने अपवित्र कशी होईल? या जळजळीत आणि थेट सवालाने उपस्थित पुजारी आणि धर्मांध विचारसरणी गांगारून गेली. महाराजांनी मूर्ती घडवणार्यांचे हात पालखीला लावण्यास सांगितले आणि पालखी त्यांच्या खांद्यावर दिली. त्या छत्रपती शिवाजी महाराजाचें तुम्ही-आम्ही मावळे आहोत.
जातीवादाचे उच्चाटन
करताना शिवाजी महाराजांनी काय केले? हे सांगण्याची गरज नाही. कारण छत्रपती शिवरायांचे स्वराज्य हेच माणसाला माणूस म्हणून जगण्याचे साधन होते. तरीही इथे आपणास एक उदाहरण देता येईल. महाराजांचा वैयक्तिक सेवक मदारी मेहतर होता, त्यांचा अंगरक्षक मुस्लिम होता; अफझलखानाच्या भेटीच्यावेळी त्यांचा अंगरक्षक असलेला जिवा महाला न्हावी होता; एवढेच नाही तर सिद्दी जोहरला चकवणारा त्यांचा तोतयादेखील शिवा काशिद नावाचा न्हावीच होता. अफझलखानावरील हल्ल्याच्यावेळी त्याचा वकील कृष्णाजी भास्कर याने शिवाजी महाराजांच्या मस्तकावर वार करण्यासाठी तलवार उगारताच ‘तुम्ही ब्राह्मण असलात म्हणून काय झाले’ असे म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला ठार केले. यावेळी झालेला घाव हा शिवाजी महाराजांच्या शरीरावरील एकुलता एक व्रण होता ज्याच्यामुळेच नंतर पन्हाळ्याला फझलखानाने आणि आगर्याहून सुटकेच्यानंतर जिजाबाईनी शिवाजी राजांना ओळखले. हा महाराष्ट्राचा इतिहास असताना आणि अस्पृश्यतांना निधड्या छातीने उभे करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुमच्या आमच्या पाठिशी असताना तुम्ही आम्ही आज जातीयवादावर भाष्य करतोय. जातीयवादावर एकमेकांवर भडकतोय. हे दुर्दैव नव्हे का?
आमच्या बीडची वैचारिकता
बदमुर्ख का होतेय?
होय, आम्ही हा जळजळीत सवाल विचारूच. जिथे संत भगवानबाबांनी आपल्या विचाराची पेरणी केली, सात्विकतेचा विचार घराघरात पोहचविताना बाबांनी घराघरातल्या लेकरांच्या गळ्यात तुळशीमाळ घातली. मग तो माळी आहे, साळी आहे, कोळी आहे, मराठा आणि की वंजारा आहे हे त्यांनी पाहिलं नाही. माझ्या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस हा सात्विक असावा, निर्व्यसनी असावा, मांसाहार करणारा नसावा, हरीनाम घेणारा असावा, असं म्हणत ‘पवित्र ते कूळ, पावन तेदेश जेथे हरिची दास जन्म घेती’ यावर ते सातत्याने भाष्य करायचे. या अभंगाचे मर्म सांगताना कीर्तनातून जातयवाद उच्चाटनाचे प्रबोधन करायचे. मात्र त्याच बाबांच्या बीड जिलह्यामध्ये आज जातीयवाद बोकाळलाय. हे दुर्दैव. इथे थेट संतांची गडेच जातीवर ओळखले जाऊ लागलेत. तेव्हा त्या संत-महात्म्यांना काय वाटत असेल. जातीयवादाने जिल्ह्याचा सोडा प्रत्येकाच्या घराचा सुद्धा विकास होणे नाही. जातीयवादाची अळी मस्तकात घेऊन जो फिरत असेल तो आपल्या संसारावर आज तुळशीपत्र ठेवत असेल, असे आमचे स्पष्ट मत आहे. कुठल्याही जातीचा माणूस असो, त्याने त्याच्या जातीवर उमर्याच्या आत नक्की गर्व करावा, दुसर्याच्या जातीचा त्याने द्वेष करू नये हे संतांसह समाज सुधारकांनी सांगितले आहे. इथे स्वत:ला मावळे समजणार्यांनी छत्रपतींची धर्म आणि जाती बाबतची व्याख्या समजून घ्यावी. इथे जे कोणी जातीवाद करत आहे, धर्मवाद करत आहे ते स्वत:च्या अकलीने नव्हे तर ते धर्म आणि जातीवाद भरल्यापोटी, अर्धपोटी असलेल्या भामट्यांच्या संगतीतून करतायत हा आमचा थेट आरोप म्हणा. मित्रांनो, जो कोणी धर्माभिमानाबद्दल बोलत असेल, जात अभिमानाबद्दल बोलत असेल, त्याला म्हणावं
‘एकदा आंदोलनात उतर’
बारकाईने पहा, ज्याच्या घरामध्ये अठराविश्व दारिद्र आहे, उद्याच्या भाकरीची ज्याच्याकडे सोय नाही, तो धर्म आणि जातीच्या युद्धात सर्वात आघाडीवर असतो. कारण त्याचं रिकामं डोकं धर्म आणि जातीच्या द्वेषातून भडकवलं गेलेलं असतं. परंतु आता जे भरल्यापोटीचे धर्माभिमानी आणि जात अभिमानी धर्म संकटात आहे, जात संकटात आहे त्यासाठी तुम्हा-आम्हाला लढावं लागतं, असं म्हणत असेल तर त्याला म्हणावं लागेल… तु समोर ये, तुझ्या लेकराला आमचं नेतृत्व करायला सांग, तेव्हा तुझ्या पाठिशी राहू, आम्ही ठामपणे सांगू. भरल्यापोटी टामटूम ढेर्यावाले पुढे कधीच येणार नाहीत, त्यांचे लेकरं शिक्षण घेतील, डॉक्टर होतील, इंजिनिअर होतील, वैज्ञानिक होतील, तुम्ही आणि तुमचे लेकरं मात्र पोलीस केसमध्ये अडकतील, त्यांचे कॅरेक्टर संपुष्टात येतील. त्यामुळे उघडा डोळे, बघा निट…. तुम्ही छत्रपतींचे मावळे आहात, शाहू-फुले-आंबेडकरांचे अनुयायी आहात, जगद्गुरू तुकाराम महाराजांपासून नगदनारायण आणि संत भगवानबाबांचे तुम्ही भक्त आहात. जातीयवाद सोडा आणि रिकामं पोट भरण्यासाठी उद्योग-धंद्यांसह आपल्या लेकरांना मानवतेच्या ध्येय-धोरणाचे महत्व पटवून दिलं.