राखीव जमिन कंठाळे, नागरेंनी विक्रीला काढली
गावकर्यांचा सामुहिक आंदोलन
दगडवाडी येथील घटना, पोलीस घटनास्थळी दाखल
बीड, (रिपोर्टर)ः-शिरूर तालुक्यातील दगडवाडी येथे 100 एक्कर जमीन जनावरे चरण्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. ही जमीन दोघाजणांच्या नावे करण्यात आली होती. मात्र या दोघांनी हळूहळू जमीनविक्री करण्यास सुरूवात केली. या विक्रीला गावकर्यांनी विरोध दर्शविला असून आज सर्व गावकर्यांनी एकत्रित येत पाण्याच्या टाकीवर चढून सामुहिक आंदोलन सुरू केले तर काही महिलांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत सामुहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.

शिरूर तालुक्यातील दगडवाडी येथे 1960 पासून गट नं. 184, 185, 186, 218, 220 क्षेत्रातील जमीन जनावरे चारण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे.ही जमीन जवळपास 100 एक्कर असून सदरील जमीन कंठाळे आणि नागरे या दोन व्यक्तीच्या नावावर करण्यात आली हेाती. गेल्या काही महिन्यापासून या दोन्ही व्यक्तीने हळुहळू जमीन विक्री करण्या सुरूवात केली. या जमीन विक्रीला गावकर्यांनी विरोध दर्शविला.दोषी विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकर्यांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र याची दखल घेतली जात नव्हती. आज गावकर्यांनी एकत्रित येत सामुहिक आंदोलन करण्यास सुरूवात केली. काही नागरिक टाकीवर चढून बसले तर काही नागरीक टाकीच्या खाली आंदोलन करत होते. महिलांनी अंगावर पेट्रोल ओतुन घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.












