अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मनोमिलनाच्या चर्चेला उधान
राज्यातील महायुती सरकारच्या कार्यकाळातले शेवटचे अधिवेशन आजपासून होत असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयात जाताना भाजपनेते आणि शिवसेना नेते यांच्यात भेट झाली, पहिली भेट भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या दालनात जाऊन घेतली. त्यावेळी अचानक उद्धव ठाकरे त्याठिकाणी आले, ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना, आमच्या जागा जास्त आल्या, पेढे घ्या , असे म्हणाले तर चंद्रकांत पाटलांनी अंबादास दानवेंना चॉकलेट दिले. दुसरीकडे लिफ्टच्या समोर ठाकरे-फडणवीस समोरासमोर आले तेव्हा दोघात चर्चा झाली. सेना-भाजप नेत्यांच्या या भेटीची चांगलीच चर्चा सध्या राज्यात रंगली आहे.
महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन म्हणून पाहिल्या जाणार्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून मुंबईत सुरुवात झाली. कालच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापल्या पत्रकारपरिषदांमध्ये परस्परांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कटूता पाहायला मिळेल, असा अंदाज होता. मात्र, आज सकाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी एक वेगळेच पण सुखद चित्र पाहायला मिळाले. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. ते विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आले होते.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना एक भलेमोठे चॉकलेट दिले. यावेळी अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे आणि अनिल परब हेदेखील उपस्थित होते. चंद्रकांत पाटील दालनात येताच या सर्व नेत्यांमध्ये हसतखेळत संवाद सुरु झाला. चंद्रकांत पाटील दालनात आल्यावर अंबादास दानवे यांनी त्यांच्यासमोर पेढ्याचा बॉक्स धरला. दादा लोकसभा निवडणुकीत आमचे 31 खासदार निवडून आले म्हणून आम्ही पेढे वाटत आहोत, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या हातातील पेढ्याचा एक तुकडा शेजारी उभे असलेल्या अनिल परब यांना देत म्हटले की, मी यांचा पेढा अॅडव्हान्समध्ये वाटतो. ठाकरे गटाचे अनिल परब हे नुकतेच मतदान पार पडलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे किरण शेलार रिंगणात आहेत. या निवडणुकीचा निकाल 1 जुलैला जाहीर होईल. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचे अगोदरच अभिनंदन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच लिफ्टने प्रवास
आज विधिमंडळात एकाहून एक धक्कादायक घटनांचा सिक्वेन्स पाहायला मिळाला. विधिमंडळात लिफ्टपाशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेते एकाचवेळी येऊन थांबले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जुजबी संवाद झाला. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील तोंडदेखला का होईना पण झालेला संवाद हा महत्त्वाचा मानला जात आहे.
चौकट
अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला, अशा आमदारांची नावं सभागृहात वाचून दाखवली. राजू पारवे वगळता ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे, ते सर्व आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यामुळे ते संसदेत गेले आहेत. त्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. यामध्ये निलेश लंके, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांच्यासह 8 आमदारांचा समावेश आहे. राजू पारवे यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन, लोकसभा निवडणूक लढवली होती. रामटेक मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली मात्र काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी त्यांचा पराभव केला.
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, अमावस्या,
पौर्णिमेला घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या शेतात वेगळंच पीक..
संपूर्ण सरकारला जनता बाय बाय सरकार म्हणतं आहे. या सरकारच्या निरोपाच्या अधिवेशनात काही घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्याच काही घोषणा होऊ शकतात. केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प मांडला जातो. त्या अनुषंगाने ज्या योजना किंवा घोषणा असतात त्याची आर्थित तरतूद केली जाते. उद्या घोषणांचा पाऊस असेल पण तो गाजर संकल्प असणार आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. घोषणा आजवर खूप झाल्या. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हे कायमच झालं आहे. दोन वर्षांत ज्या घोषणा केल्या त्याची पूर्तता किती झाली हे खरेपणाने सांगावं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंचताराकिंत शेती करतात म्हणत त्यांना टोला लगावला आहे.