नेकनूर (रिपोर्टर): श्रीक्षेत्र बेळेश्वर संस्थानचे मठाधीपती महंत शांती ब्रम्ह, तुकाराम भारती महाराज यांच्या नावाने राजकीय हेतुने प्रेरीत होऊन सोडबुद्धीने सोशल मिडियावर संस्थानची बदनामी करत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी षडयंत्र रचून महाराजांना बदनाम करत शिवीगाळ केली जात आहे. त्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
गेल्या काही दिवसांपासून ह.भ.प. तुकाराम भारती महाराज यांना सोशल मिडियावर बदनाम करण्यात येत आहे. त्याचबरोबर मोबाईलद्वारे शिवीगाळ करण्यात येत आहे. याच्या निषेधार्थ आज लिंबागणेश येथे मांजरसुंबा ते पाटोदा या राष्ट्रीय महामार्गावर पंचक्रोशीतील भाविकांनी रास्ता रोको आंदोलन करत शिवीगाळ करणार्या आणि बदनामी करणार्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. आज सकाळी लिंबागणेश येथील ईश्वर भारती मंदिरामध्ये श्रीफळ अर्पण करत आंदोलकांनी गावातून पायी दिंडी काढत बसस्थानकापर्यंत येऊन त्या ठिकाणी मांजरसुंबा ते पाटोदा हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला. या वेळी नेकनूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, तलाठी गणपत पोतदार यांना निवेदन देण्यात आले. हे आंदोलन डॉ. गणेश ढवळे, सरपंच बाळासाहेब जाधव, बाळकृष्ण थोरात, विक्रांत वाणी, संतोष वाणी, विनायक मोरे, पांडुरंग वाणी, मुळुकचे सरपंच रामकिशन कदम, महाजनवाडीचे सरपंच विश्वंभर गिरी, पिंपरनईचे सरपंच बाळासाहेब वायभट, पोखरीचे सरपंच बिभिशन मुळीक, बेळगावचे सरपंच अशोक जाधव, सोमनाथवाडीचे सरपंच किशोर शेळके, युवराज इंगोले, योगेश चव्हाण, नानासाहेब शिंदे, अनिल माने, तुळशीराम काटकर, राजाभाऊ कदम, अंबादास मानकर, अरुण काकडे, बाबूराव बावणे, अशोक वायभट, कृष्णा वायभट यांच्यासह आदींनी केले.