गणेश सावंत । बीड
क्षीरसागरांच्या राजकीय वर्चस्वाविरुद्ध सातत्याने आक्रमकपणे मत मांडणारे विनायक मेटे अन् माजी मंत्री सुरेश नवले यांना स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगरपालिकेत कधीच यश प्राप्त झाले नाही. मात्र संधीचं सोनं करण्याइरादे यंदा मेटेंसह नवले नगरपालिकेच्या निवडणुकीत आपआपल्या पद्धतीने क्षीरसागरांना आव्हान देण्याच्या तयारीत दिसून येतात. म्हणूनच गेल्या 8 मे ला कधी नव्हे असा नवलेंनी मित्र मंडळाचा प्रयोग बीडमध्ये करताना त्याची स्थापना आणि उद्घाटन दणक्यात केले. तत्पुर्वी विनायक मेटेंनीही परिवर्तनाचा नारा देत संकल्प मेळावा घेतला. क्षीरसागरांचे आधीराज्य असलेल्या न.प.वर मेटे आपले मावळे घुसवण्यात यशस्वी होणार का? अन् नवले आपल्या आप्तस्वकियांसह मित्रांना नगरसेवकांच्या माध्यमातून न.प..मध्ये बसवू शकणार का? याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राजकारणातलं थोरलं घर असलेल्या जयदत्त क्षीरसागरांनी बीड नगरपालिकेवर आपलं अधिराज्य कायम ठेवलं. गेल्या पाच दशकांच्या कालखंडामध्ये एखाद दुसरी पंचवार्षिक ही क्षीरसागरांच्या विरोधात गेली असेल. शिवसेनेत असताना राज्यमंत्री असलेले सुरेश नवलेंनी शिवसेनेचा भगवा नगरपालिकेवर फडकवला होता. एवढीच नवलेंच्या बाबतीत शहरातली बेरजेची दखलपात्र घटना. त्यानंतर नवले यांनी शिवसेना सोडली, जनशक्ती पार्टी काढली, काँग्रेसकडून विधान परिेदषदेची आमदारकी घेतली. परंतु मूळ मतदारांशी नातं या कार्यकाळामध्ये त्यांना कधीच दृढतेने जोडता आलं नाही. अशा परिस्थितीत मित्र पक्षांच्या अथवा मित्रांच्या व्यासपीठावरून सातत्याने क्षीरसागरांना कडवा विरोध मात्र नवलेंनी केला. नवलेंच्या या कडव्या विरोधामुळेच प्रा. सुरेश नवले यांचे नाव आजही चर्चेत आहे. मंत्रमुग्ध करणारं वक्तृत्व, हाताशी असलेल्या नवलेंनी आता मात्र थेट निवडणुकीच्या आखाड्यात क्षीरसागरांशी दोनहात करण्याचा बहुदा निर्णय घेतला. म्हणूनच त्यांनी गेल्या 8 मे ला बीडमध्ये मित्रमंडळाची स्थापना केली. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील दोन-तीन मंत्र्यांना आमंत्रित केेलं. आपली ताकद आजही मुंबईच्या मंत्रालयामध्ये आहे हे दाखवून देण्याचा त्यांचा तो प्रयत्न असावा. असे असले तरी वैयक्तिक सुरेश नवले हे खरे ताकतीने शहरात उतरले तर नक्कीच त्यांच्या राजकीय पेर्याला पालवी फुटेल. दुसरीकडे विधान परिषदेवर सर्वात जास्त आमदार म्हणून राहिलेले शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे हेही क्षीरसागरांचे कट्टर विरोधक मानले जातात. 2014 पर्यंत त्यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये लक्ष घातले नव्हते. 2014 (पान 7 वर)
च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असताना दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची बीडमध्ये सभा झालेली असताना मेटेंचा निसटता पराभव झाला होता. त्यातूनच मेटेंची बीडवर पकड असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र जेव्हा नगरपालिकेच्या निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकांमध्ये मेटेंनी आपले उमेदवार शहरामध्ये उभे केले तिथे मात्र मेटेंना अपयश आलं. एकही नगरसेवक ते नगरपालिकेमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये पाठवू शकले नाहीत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मेटेंचे चार उमेदवार निवडून आले होते. सत्तेमध्ये सहभागही जयश्री मस्केंच्या माध्यमातून त्यांना घेता आला होता. शिवसंग्रामचा जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाला होता. मात्र पुन्हा अंतर्गत गटबाजीत जयश्री मस्केंसह तीन जिल्हा परिषदेचे सदस्य मेटेंना रामराम ठोकून बाहेर पडले. यानंतर बीड जिल्ह्यावरची आणि खास करून बीड तालुक्यावरची शिवसंग्रामची पकड ढिली होतेय का यावर चर्चा होत असताना मेटे वेगवगेळ्या कार्यक्रमातून आपला जनसंपर्क जिल्ह्याला दाखवून देताना दिसून आले. मग दिवाळीतला फराळाचा कार्यक्रम असो, की रमजानचा इफ्तार असो, या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद हीच शिवसंग्रामची जमेची बाजू. म्हणूनच उद्याच्या निवडणुकीमध्ये क्षीरसागरांशी दोनहात करण्याइरादे आ. मेटे अग्रेसर राहणार यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही. आज मितीला आमदार मेटे हे आमदार नसले तरी गेल्या 30 वर्षातील कालखंडातला राजकीय अनुभव, जनसंपर्क, क्षीरसागरांमधील घरफुटीची संधी, आणि गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात नगरपालिकेकडून बीड शहराकडे झालेले दुर्लक्ष, त्या दुर्लक्षावर सातत्याने मेटेंनी मांडलेली भूमिका त्यांच्या नक्कीच कामी येईल. उद्याच्या निवडणुकीत मेटेंचा संकल्प परिवर्तनाची लाय आणेल का अन् नवलेंचं मित्रमंडळ आपल्या मित्रांना नगरसेवक करेल का? याकडे आता उत्सुकतेने सर्वांचं लक्ष आहे.