गणेश सावंत–
सत्ताकारणातल्या गणितासाठी समाजकारणातले हातचे आणि पदरचे जुळवित महाराष्ट्रात जे धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण केले जात आहे ते प्रचंड प्रमाणात चिंताजनक म्हणावे लागेल. कधी धर्माची अफू तर कधी जातीची नशा करवत नेतेच जेव्हा स्वत:चा डीएनए किंवा स्वत:च्या पक्षाचा डीएनए अमूक जातीचा असल्याचे सांगतात, तेव्हा कोणाच्या निधड्या छात्या तर कोणाचे शिवशिवते मनगट समोर येते अन् इथच माणूस धर्म संपून जातो. तीच काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. खरंतर महाराष्ट्राच्या मातीला रक्त पचवणं नवं नाही. देशासाठी आणि राज्यासाठी रक्त सांडणंही नवं नाही. स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवत प्राणाची आहुती देणंही नवं नाही. कारण आपण आपला इतिहास पाहिला तर स्वातंत्र्यासाठी इथे कित्येक देह खर्ची पडले. तुमच्या-आमच्या बाप-दादांनी गडकोटांसाठी खडे पहारे दिले तेव्हा जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पाहिला तो स्वाभिमान. आज हाती तलवार घ्यायची गरज नाही, बंदुका घ्यायची गरज नाही, मिळालेला स्वाभिमान आणि मिळालेला स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आज गरज आहे, जात-पात-धर्म-पंथ विरहीत गणतंत्र दिन साजरा करण्याची. आज गरज आहे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेण्यापेक्षा संतांच्या विचाराचा आणि वारकरी संप्रदायाचा ध्वज उंचवण्याची. आज गरज आहे ती करमटपणा आणि अंधश्रध्दा गाढून टाकायची. आज गरज आहे, माणसाला माणूस म्हणून शिकवण देण्याची, आज गरज आहे ती शक्ती आणि भक्तीतलं खरं मर्म समोर मांडत भक्तीचा डांगोरा पिटवण्याची आणि
कळीकाळाशी दरारा
निर्माण करण्याची
जगाच्या पाठीवर महाराष्ट्र धर्म हा सर्वोच्च असला पाहिजे. इतिहास चाळून पाहिला आणि त्या इतिहासातले सोळाव्या शतकातले संदर्भ पाहिले तर महाराष्ट्राच्या मातीत निपजल्यांनीच स्वाभिमान जागवल्याचे दिसून येते. जणु काल पर्वाही देशावर संकट आलं तर महाराष्ट्रच धावून गेल्याचे पहावयास मिळते. म्हणून आणि म्हणूनच ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’ असे मथळे तुम्हाला ज्ञात असतील. परंतु असे असतांना आता काही तथाकथित धर्म मार्तंड आपले तोंड वरी काढत आहेत. जिथं तिथं विषवल्ली पेरण्याचे काम करीत आहे. हे विषवल्ली महाराष्ट्राच्या मातीलाच नव्हे तर हिंदुस्तानच्या सर्वोभौमितेला काळवंडून टाकणारी असेल म्हणून शक्ती भक्तीला आणि वारकरी धारकर्यांच्या एकात्मतेला जे जळजळीत आणि कर्मट दाखवण्याचा प्रयत्न होतो. त्या प्रयत्नांना सरकारही मुक संमती देते तेंव्हा आम्हाला तुकोबांचा सहारा घेत तुकोबांची भक्ती आणि त्या भक्तीतली शक्ती आत्मसात करण्याबरोबर ती आमच्या वाचकांनाही द्यावीसी वाटते. सध्या महाराष्ट्रात जात, पात, धर्म, पंताच्या नावावर जो गोंधळ सुरू आहे. तो गोंधळ महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या एकाही संताला मान्य नसेल. ज्या मणुस्मृतीच्या आधारे हा गोंधळ घातला जातो ती मणुस्मृती जुने मढे उकरल्यागत आहे. असं म्हटलं तरी आम्हाला त्यात बर वाईट वाटणार नाही. कारण हा महाराष्ट्र जगद्गुरू संत तुकारामांच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र आहे. भक्तीचा डांगोरा पिटवणार्या जगद्गुरू तुकोबांच्या तणामनात कुठलीच जात नव्हती. म्हणूनच तुकोबा आपल्या एका अभंगात जातीच्या उतरंडी पाडतांना महाराष्ट्राच्या मातीत अशी कुठलीही जात ही शुद्र नाही. आणि त्या जातीतला माणुस शुद्र नाही. माणुस म्हणून जो जगतो आणि दुसर्याकडे माणुस म्हणुन जो पाहतो तो सर्वश्रेष्ठ आहे. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र असा प्रदेश आहे ज्या प्रदेशाला भुगोलाबरोबर इतिहास आहे. साधु, संत, सुफींची मांदीयाळी याच महाराष्ट्राच पहावयास मिळते.
पवित्र ते कुळ
पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरिचे दास घेती जन्म ॥
कर्म धर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥
वर्ण़अभिमाने कोण जाले पावन । ऐसे द्या सांगुन मजपाशी ॥
अंत्यजादि योनि तरल्या हरिभजने । तयाची पुराणे भाट जाली ॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥
कबीर मोमीन लतिब मुसलमान । सेना न्हावी जाण विष्णुदास ॥
कान्होपात्रा खोदु पिंजारी तो दादु । भजनी अभेदू हरिचे पायी ॥
चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवे ॥
मैराळा जनक कोण कुळ त्याचे । महिमान तयाचे काय सांगो ॥
यातायातीधर्म नाही विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्री ॥
तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणो किती ॥
तुकोबांचा हा अभंग आणि या अभंगात सर्व जातं, पात, धर्म, पंतातले संत पाहिले तर महाराष्ट्र जात, पात, धर्म, पंताला कधीही थारा देणारा नाही हेच स्पष्ट होते. प्रत्येक जातीमध्ये एक ना एक संत जन्माला आले आणि त्या संतांनी केवळ एकच शिकवण दिली. ती म्हणजे ईश्वर हा एक आहे आणि त्या ईश्वराला शरण जातांना सर्व मोहमाया, मत्सर, लोभ दूर ठेवून नामस्मरण करा. परंतु आज त्याच महाराष्ट्रात जात, पात, धर्म, पंताचे भुत मानगुटीवर बसवण्याचे काम तथाकथीत धर्म मार्तंडांकडून होतांना दिसून येत आहे. हे महाराष्ट्राचेच नव्हे तर महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील माणसा माणसाला त्यागाची, विश्वासाची, प्रेमाची शिकवण देणार्या संतांचे दुर्दैव नव्हे ते तुमचे आमचे दुर्दैव म्हणावं लागेल. पंढरपुरची वारी ही शेकडो शतकापासून सुरू आहे. मृदंगावर थाप, टाळांचा निनाद, मुखी विठ्ठलाचे नामस्मरण, खांद्यावर भगवी पताका म्हणजेच वारकरी. परंतू आता या वारकर्यातही काही तथाकथीत वार करी घुसू पाहत आहेत. यातून अशा वार करणार्या आणि त्याचा पुरस्कार करणार्या लोकांना साध्य काय करायचे हा शोधाचा विषय नक्कीच नसला तरी हा विषय गंभीरतेने घेण्याचा आहे. अशा लोकांबाबत आणि त्यांच्या कृत्यांबाबत तुकोबा म्हणत असतील
बुडते हे जन न देखावे डोळा।
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे महाराष्ट्राचे वेद आहे. त्यांचे अभंग म्हणजे तुकोपनिषदच आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथही मराठीतच आहे व ज्ञानदेवांनी तो अबालसुबोध अशा ओवी छंदात आपण लिहिल्याचे सांगितले आहे. इतके असून सुद्धा ज्ञानेश्वर हा ग्रंथ पुुष्कळांना मिटलेल्या मुठीसारखा वाटतो. तर तुकोबांचे अभंग हे उघडलेल्या मुठी सारखे वाटतात. तुकोबांच्या अभंगात जो सिद्धांत जे सामर्थ्य पहावयास मिळते ते स्पष्टवक्तेपणाचाच. हे उघड सत्य सर्वश्रुत असतांना शक्ती भक्तीचा नारा वारकरी धारकर्यात बदलोतच कसा? याचं विवेचन नक्कीच व्हायला हवं. ज्या वेळेत रक्तपाताची, ढाल, तलवारीची गरज होती त्यावेळेस नक्कीच शस्त्र हाती घ्यायला हवे. परंतू आता शास्त्र आणि शस्त्र नव्हे तर संविधान महत्त्वाचे आहे. भारतीय सर्वोभौमत्ता महत्त्वाची आहे. त्यावेळी कोणी जर असा धार्मिक गलका करू पाहत असेल आणि या गलक्यात लोक सामील होत असतील तर तुकोबा अशा व्यवस्थेला आणि माणसिकतेला आपल्या अभंगातून म्हटले असते
बुडते हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणुनीया ॥
तुका म्हणे माझे देखती डोळे । भोग देते वेळ येईल कळो ॥
ज्यांना शिष्य शाखा वाढवून गुरूपणाचे अवडंबर माजवायचे आहे त्यांना त्या अवडंबरातून आजच्या परिस्थितीत जे प्रक्षोप होईल तो डोळ्याने पाहण्यासारखा नक्कीच नसेल. पुढे धर्माचे पाळण कसे करावे यावर भाष्य करतांना
धर्माचे पाळण । करने पाषाण्डं खंडन
हेचि आम्हा करने काम । बीज वाढवावे नाम
तिष्ण उत्तरे । हाती घेवूनी बाण फिरे
नाही भिडभार । तुका म्हणे लहानथोर
वज्रास भेदण्या इतका कठीणपणा प्रसंगाने विष्णुदासांना तो स्विकारता येत असला तरी मेनाहुन मऊ आम्ही विष्णुदास हा त्यांचा खरा स्वभाव असायला हवा. तिष्ण उत्तरांचे बाण हाती घेवून फिरत असतांनाही तुकोबांनी लोकांना प्रेमाने समजावून सांगण्याचा त्या काळी तेवढाच प्रयत्न केला. मी निष्ठुर बोललो तरी ते तुमच्या हिताचे आहे. हे त्यांनी वेळोवेळी सांगितले. परंतु आपल्या कर्तव्य कर्मातून जात, पात, धर्म, पंत याला कुठेही थारा देवू नका. हे वेळोवेळी साांगितले. तुकोबांच्या या भक्तीच्या डांगोर्यामुळेच आज महाराष्ट्र हा देशात शक्तीपीत आहे हे ही अभिमानाने सांगावेसे वाटते. पंढरीच्या वाटेने जातांना उच, निच, कोणी नाही. लाभ, लोभ, मत्सर, माया इथे कोठेही पहावयास मिळत नाही. उलट तुकोबांनी पंढरीच्या वाटेवर जाणार्याबाबत आणि साक्षात पांडुरंगाबाबत विठ्ठलाला भुत म्हणून संबोधलं आहे. आपल्या पुढील अभंगात ते म्हणतात,
पंढरीचे भुत मोठे । आल्या गेल्या झडपि वाटे ॥
बहु खेचरीचे रानं । जाता वेडे होये मन ॥
तेथे जावू नका कोणी । गेले नाही आले परतुनी ॥
तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाही आला ॥
पंढरीचे भुत मोठे आहे. त्यावाटेने जो जातो त्याच्यावर हे भुत झडप घालतं. एक तर तिथं कोणी जावू नये आणि गेलच तर ते परतुन येणार नाही. कारण पंढरीचा हा मार्ग, वारीचा हा मार्ग, विठ्ठलाचं वेड लावणारं आहे. भक्ती रसात डुंबून टाकणारं आहे. विठ्ठल जसे पंढरीला गेले तसे पुन्हा ते जन्मले नाहीत. परंतु प्रत्येक वारकर्याच्या ह्रदयामध्ये विठ्ठलाचा निनाद, पांडुरंगाचा निनाद पहावयास आणि ऐकवयास मिळतो. तुकोबा जर जात, पात, धर्म, पंत विरहीत ईश्वर माणसात शोधत असतील, रस्त्यात शोधत असतील, काटेरी झुडपात शोधत असतील तर तुम्हा आम्हाला शशस्त्र धारकरी होण्याचे कारण ते काय? भक्तीचा डांगोरा पिटवण्यासाठी माणसाला माणुस म्हणून जगण्याची अभिलाषा निर्माण करण्यासाठी जो कोणी प्रयत्नाची परिकाष्टा करत असेल तो नक्कीच नथ मस्तक होण्या लायक असेल. परंतु स्वत:च्या धर्माचा गर्व करत इतरांच्या धर्माला तुछ तेने पाहत असेल तर तो धर्मही नाही आणि तो माणुसही नाही. हे उघड सत्य संत महात्म्यांनी सांगून ठेवले. तरीही महाराष्ट्राच्या मातीत
बकरे वाचतात आणि माणसे मरतात
ही हार नमेकी कोणाची? हा पराजय नेमका कोणाचा? आणि ही जीत कोणाची हा विजय कोणाचा? याचे आत्मचिंतन केल्यानंतर पुन्हा-पुन्हा सरकारच्या कार्य प्रणालीवर आक्षेप घ्यावासाच वाटतो. नागपुुरात जैन समाजाच्या काही लोकांनी बकरे वाचवण्यासाठी टाहो फोडला. कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेत मजूर यांचे एटीएम असलेल्या शेळ्या, मेंढ्या आखाती देशामध्ये विक्रीसाठी जाणार होत्या. परंतु बकर्यांचे जीव वाचवा हो म्हणत जैन समाजाच्या काही लोकांनी विरोध करताच सरकारने विमानाद्वारे दीड हजार बकरे जे आखाती देशामध्ये जाणार होते ते रद्द करण्यात आले. बकर्यांचा जीव येथे वाचला परंतु या बकर्यांचा जीव महाराष्ट्रात वाचेलच हे सांगणे कठीण आहे. परंतु सरकारने मात्र हे विमान उडान रद्द करून महाराष्ट्रामध्ये आपल्या कुठल्या निर्णयाची दिशा दाखवून दिली हे सांगणे कठीण. दुसरीकडे आफवेवरून राईनपांडा येथे पाच निष्पाप लोकांची याच महाराष्ट्रात हत्या होते. महाराष्ट्र सरकार बकरे वाचवण्यात यशस्वी होतात माणसे वाचवण्यात यशस्वी होत नाहीत. हे उदाहरण एवढ्यासाठीच या भक्तीच्या डांगोर्यामध्ये आम्ही घेतोय ते म्हणजे कर्मटपणा, धर्म मार्तंडपणा आणि मणुच्या सांनिध्यात वाहत चाललेल्या सरकारचे धोरण दाखवण्यासाठी. पंढरीस निघालेली वारी ही भक्तीचा डांगोरा पिटवणारी आहे आणि पंढरीचं वाळवंट हे एक एका लागती पाईरे याची शिकवण देणारं आहे. परंतु महाराष्ट्र सरकार ज्या धर्म मार्तंडाचा पुरस्कार करू पाहतय. जात, पात, धर्म, पंताला महत्त्व देवू पाहतय ते पुरस्कार आणि ते महत्त्व
महाराष्ट्राचं वाळवंट
केल्याशिवाय राहणार नाही. भक्ती रसात डुंगून जाणं ईश्वराचं नामस्मरण करणं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतू स्वत:च्या धर्माचा आदर करणं आणि इतरांच्या धर्माचा अनादर करणं ही कुठल्याच धर्माची शिकवण नाही. वारकरी संप्रादाय आणि वारकरी धर्म हा तर अक्षरश: माणसातल्या माणुस पणाला जागृत करणारा आणि प्रत्येकाकडे माऊली म्हणून पाहणारा आहे. त्यामुळे वारकर्यांना कधी हाती तलवार घेण्याची गरज पडली नाही. त्यांना कधी भिती वाटली नाही. स्वरक्षणाची गरज पडली नाही. कारण ज्याच्या अंगी शिस्त असते त्याला कशाचीच भिती नसते. म्हणूनच विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेला वारकरी पंढरीच्या वाटेवर ऊन, पावसात निघतो तेंव्हा त्याच्या मनात कुठली जात नसते, कुठला धर्म नसतो असते ती फक्त विठुरायाच्या भेयीची ओढ. आणि त्या भेटीसाठी जेंव्हा हा वारकरी पंढरीत जातो त्यावेळी त्या ठिकाणी खेळ मांडतो.
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाईरे ॥
क्रोध अभिमान गेला पावटणी । एक एका लागती पाईरे ॥
असं म्हणत आनंदाने नाचत गात विठ्ठलाचे नामस्मरण करतो. कसलाही अभिमान नसतो, कसलाही क्रोध नसतो, कुठलीही जात नसते, कुठलाही धर्म नसतो असतो तो फक्त माणुस धर्म, असते ती फक्त माऊली. परंतू आज या माऊलीला स्वरक्षण देण्याच्या नावाखाली जो सौराचार चालु आहे आणि महाराष्ट्रात सत्ताधार्यांकडून जो धर्माचा पुरस्कार करणे चालू आहे तो महाराष्ट्राला वाळवंटाच्या खाईत लोटणाराच.