॥ गणेश सावंत ॥
दिल्लीस्वरांच्या सदरेवर जेव्हा महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व ठळकपणे दिसून येते व ते प्रभावीपणे कामगिरी करून सर्वदूर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडतात तेव्हा सर्वसाधारणपणे ‘दिल्लीचेही तख्त राखतो’ हे बिरूद मोठ्या अभिमानाने म्हटले जाते. आता प्रश्न आहे कोणाच्या महाराष्ट्राने प्रभावीपणे काम केल्याचा, आता सवाल आहे. कोणी किती कर्तृत्व गाजवल्याचा? कारण महिना पंधरा दिवसांपूर्वी दिल्ली तख्त राखण्याहेतू ज्या निवडणूका झाल्या त्या निवडणूकांमध्ये दिल्लीश्वरांना रसद पुरवणार्या पवार, शिंदेंसह फडणवीसांचे महाराष्ट्रातली कामगिरी आणि कर्तृत्व किती? याचा हिशोब दिल्लीश्वर कसा जुळवणार? आगामी विधानसभा निवडणुका फडणवीसांच्या नेतृत्वात लढवल्या जाणार्या की शिंदेंच्या नेतृत्वात? या प्रश्नाचे उत्तर दिल्ली तख्ताचे प्रमुख सिलेदार गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच दिले असले तरी
वर्षापतीची
मनिषा अनेकांच्या अंगी आहे. मग ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजीत पवारांपासून थेट विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत जो तो आपण मुख्यमंत्री होणार अशी अभिलाषा ठेवून आहेत. मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा ठेवणे अथवा असणे यात गैर नाही, परंतू गेल्या पाच वर्षांच्या कालखंडामध्ये ‘वर्षा’ची जी हालअपेष्टा झाली आणि पाच वर्षात ‘वर्षा’ला तीन पती म्हणजे मुख्यमंत्री मिळाले. जे हाल मुख्यमंत्र्यांचा बंगला असलेला वर्षाचे झाले, तेच हाल उभ्या महाराष्ट्राचे झाले. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे-फडणवीस आणि पवार यांच्या महायुतीत ही निवडणुक लढविली जाणार परंतू राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार? देवेंद्र फडणवीस असणार की शिंदे, पवार असणार? यावर आता आपआपले कार्यकर्ते दावे प्रतिदावे आणि बॅनरवर आपल्या नेत्याला भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देत आहेत. महायुतीतली ओढाताण यातून सातत्याने समोर येताना दिसून येत आहे. एकीकडे लोकसभेच्या निवडणूकीमध्ये भाजपाला महाराष्ट्रात म्हणावे तसे यश प्राप्त करता आले नाही. दोन
पक्ष फोडून
भारतीय जनता पार्टीने गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्राच्या राजकारणाची खिचडी केली. निष्ठेचा बाजार मांडत राजकीय व्याभिचार देशासमोर मांडला. ज्यांचे पक्ष फुटले त्यांना वाईट वाटणे साहजिक परंतू भाजपाच्या निष्ठावंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भाजपाची ही कुटनिती पचणी पडली नसावी. म्हणून जेव्हा 300 पार चा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या मैदानात उतरले, कंठफाटूस्तर मोदींनी गावकुसावर कित्येक जाहीर सभा घेतल्या. असं वाटलं आता भाजपाचे 300 पार सहज होतील आणि महाराष्ट्रात पैकीच्या पैकी जागा भाजपाला आणि त्यांच्या मित्र पक्षाला मिळतील. महाराष्ट्रातले प्रमुख पक्ष असलेली शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना फोडून 40- 40 आमदार जेव्हा भाजपाच्या काफिल्यात डेरेदाखल होतात तेव्हा साहजिक ते अवघे राज्य एका पक्षाच्या छत्रछायेखाली असल्यागत वाटते, मात्र हा महाराष्ट्र आहे आणि इथे स्वाभिमान, अभिमान सर्वसामान्यांत स्पष्टतेणे दिसून आलेला आहे, म्हणूनच गेल्यावेळी ज्या महाराष्ट्रात भाजपच्या रग्गड जागा होत्या, त्या महाराष्ट्रात भाजपाचे यावेळेस केवळ 9 खासदार निवडून आले. मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला 9 मिळाले तर अजीत पवारांना केवळ 1 खासदार निवडून आणता आला. यातून फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला रुचले नाही हे निकालातून स्पष्ट झाले, एक तर सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडी केली, स्वत:चा विधानसभेत मोठा पक्ष असतांना मुख्यमंत्रीपद शिंदेंना द्यावे लागले. अन् दुसरीकडे लोकसभेच्या महत्त्वाच्या निवडणूकीत फारसे यश हाती मिळाले नाही. मग अशा स्थितीत दिल्ली तख्त महाराष्ट्राबाबत काय विचार करत असेल? हा प्रश्न पडणे साहजिक आहे. त्यात
मुख्यमंत्रीपदाची लालसा
जो तो अंगी बाळगताना दिसून येत आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षांपासून राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळताना आपलं कर्तृत्व दाखवण्याचा प्रयास दिल्लीश्वरांना केला. एवढेच नव्हे तर भाजपाचे लोकसभेत जेवढे सिट निवडून आले तेवढे लोकसभेमध्ये त्यांनी स्वत:चे खासदार निवडून आणले. त्यामुळे शिंदेंचा दावा दिल्लीश्वरांना फेटाळता येणार नाही. दुसरीकडे ज्या शरद पवारांनी निवडणूकीपूर्वी 300 पार ला आडकाठी आणण्याहेतू पंतप्रधान मोदींना सातत्याने आडवे घेतले, त्या पवारांचं घर फोडून भाजपाने अजीत पवारांना आपल्या काफील्यात घेतले खरे परंतू लोकसभेच्या निवडणूकीत पवारांना आपला परफॉर्मर्स म्हणावा तसा दाखवता आला नाही. अशा स्थितीतही पवारांचे समर्थक कधी केक वर ‘मी अजीत आशा अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की’ असे लिहून तो केक अजीत पवारांच्या हाताने कापला जातो. कधी अजीत पवारांचे अनेक ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागतात. तर इकडे शिंदे समर्थकही आमचाच मुख्यमंत्री असणार असे सांगतात. दुसरीकडे भाजपाचे धुरंधर आम्ही मोठा भाऊ आहोत आणि आमचाच मुख्यमंत्री असणार हे स्पष्टपणे मांडतात. नव्हे नव्हे तर कोणी मुख्यमंत्री पदावर दावे प्रतिदावे केले तर शिंदे-पवार आणि फडणवीसांचे समर्थक एकमेकांच्या अंगावरही जातात. यातून
महायुतीत अलबेल
आहे असं म्हणणं धाडसाचं होईल. महाराष्ट्र हा बुद्धीजीव्यांचा आहे, इथे विचाराला अनन्य साधारण महत्त्व आहे. लबाडीला इथे थारा दिला जात नाही. हे लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाला अनुभवायास आलं आहे. आता महायुतीत सर्वकाही अलबेल असल्याचे सांगण्यात येत असले तरी ‘वर्षा’पती कोण होणार? कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार? यावर जो तो कामाला लागला आहे. विशेष म्हणजे जागा वाटपावरूनही महायुतीत अवमेळ असल्याचे एकीकडे सांगितले जात असतांना दुसरीकडे शिंदे-पवारांना फोडण्यासाठी दिल्ली तख्ताच्या मुख्य शिलेदारांची तडजोड कशी ही गुलदस्त्यात असल्याने दिल्लीश्वरच शिंदे-पवार की फडणवीस? हे महाराष्ट्राला सांगू शकतील. परंतू लोकसभा निवडणुकीमध्ये जी दाणादाण महायुतीची उडाली, तशी दाणादाण विधानसभेत उडू नये यासाठी महायूती प्रयत्नशिल नक्कीच असणार. परंतू
इच्छावादी
जेव्हा एकाच काफील्यात मोठ्या प्रमाणावर एकत्रित होतात. तेव्हा त्या ठिकाणी फुटीरतेला कोंब फुटताना दिसतात. हा इतिहास आहे. जेव्हा एकच मनिषा बाळगून जो तो आपली पताका तिथे फडकवू इच्छितो तेव्हा तो अंतर्गत चाली खेळायला सुरूवात करतो आणि जेव्हा अंतर्गत चाली खेळल्या जातात तेव्हा प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह देण्यापेक्षा स्वत:चेच प्यादे मारत मारत तो पुढे जात असतो. आता महायुतीत मुख्यमंत्रीपदाच्या इच्छावादींची संख्या भरमसाठ आहे. गेल्या पाच-सात वर्षांच्या कालखंडात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना भाजपाने एकहाती आणि एक कलमी सत्ता चालवल्याने भाजपाच्याच नेत्यांमध्ये जी उर्मी आणि गुर्मी आली होती ती गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडात कमी झाली असली तरी लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिंदे-पवारांना घेवूनही महाराष्ट्राने आपल्याला झोपवलंच, मग आपलंच नेतृत्व प्रभावी का होवू नये यासाठी ते काम करताना दिसून येवू लागले. तसे पवारांचे समर्थकही दादांच्या नेतृत्वाला समर्पक नेतृत्व म्हणून महाराष्ट्रासमोर आणू लागले तर शिंदेंसारखा एकनाथी मुख्यमंत्री दुसरा कोणीच नाही हे शिंदे समर्थक छातीठोकपणे सांगू लागले. अशा स्थितीत महायुतीमध्ये नक्कीच मुख्यमंत्रीपदावरून कट शह कटाचे राजकारण शिजतयं, आता येणारा काळच ‘वर्षा’पतीची मंडवळी कोणाच्या माथी लागणार ते दिसून येईल.