बीड दि. 13 (प्रतिनिधी ) : शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणात मागच्या एक महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठत आज (दि. 14 ) सुनावणी झाली. यात कुंडलिक खांडे यांच्या वकिलांची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली असून सरकारी पक्षाचे म्हणणे देखील ऐकून घेतले आहे. या प्रकरणातील पुढील युक्तिवाद आता 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे सध्यातरी कुंडलिक खांडे यांचा मुक्काम कारागृहातच असणार आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणात त्यांच्याच पक्षाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याच्या तब्बल तीन महिन्यांनी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. मागच्या एक महिन्यापासून या प्रकरणात कुंडलिक खांडे न्यायालयीन कोठडीत आहेत. बीडच्या जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्याची सुनावणी अगोदर न्या. एस. जी . मेहरे यांच्या पिठासमोर सुरु होती, मात्र नंतर ते प्रकरण न्या. शिवकुमार डिगे यांच्या पिठाकडे वर्ग करण्यात आले. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार होती, मात्र मंगळवारी ही सुनावणी एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली. आता त्या जामीन अर्जावर आज (दि. 14 ) रोजी सुनावणी झाली. यात कुंडलिक खांडे यांच्यासाठी विधिज्ञ सुदर्शन साळुंके यांनी युक्तिवाद केला. हे सारे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे. अर्जदार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय असताना त्यांना पोलिसांनी अटक केली नाही, मात्र एका वादग्रस्त ऑडिओक्लिप नंतर ही अटक करण्यात आली. मूळ एफआयआरमध्ये अर्जंदसुराचे नाव नाही , यातील दुसर्या आरोपीला जामीन मिळालेला आहे त्यामुळे अर्जदाराला जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद करण्यात आला. तर सर्कारपक्षाच्या वतीने सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी जामीन देण्यास विरोध केला. यातील आरोपी कुंडलिक खांडे हे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आहेत, ते पूर्वी एका राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते, म्हणून कदाचित पोलिसांनी त्यांना अटक केले नसेल , मात्र आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभुवनी आहे. त्यामुळे जामीन देण्यात येऊ नये अशी भूमिका सरकारच्या वतीने घेण्यात आली. यावर ’गुन्हेगारी पार्श्वभूमी हे जामीन नाकारण्याचे कारण होऊ शकते का ? ’ असा सवाल न्यायालयाने केला असून यावर आता 22 ऑगस्ट रोजी युक्तिवाद होणार आहे. त्याचदिवशी या प्रकरणातील मूळ फिर्यादी ज्ञानेश्वर खांडे यांचे म्हणणे देखील न्यायालय ऐकू शकते. त्यामुळे आता किमान आठवडाभर तरी कुंडलिक खांडे यांच्या सुटकेच्या आशा मावळल्या आहेत.