ठाणे : बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रश्नी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या ठिकाणी हजारो आंदोलक उपस्थित होते. त्यांना पांगवण्यासाठी आता पोलिसांनी लाठीचार्ज केला. तब्बल 12 तासांनंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून आंदोलकांना पांगवण्यात पोलिसांना यश आलं आहे.
बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच हे कृत्य केल्याचं समोर आलं. त्या नराधमाला फाशी द्या अशी मागणी करत सकाळी साडे सहा पासून आंदोलकांनी आंदोलन सुरू केलं. आंदोलकांनी यासाठी बदलापूर रेल्वे ट्रॅक अडवून ठेवला होता.
राज्य सरकारच्या मध्यस्तीला यश नाही
आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी पोलिसांनी आवाहन केलं होतं. तसेच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. आरोपीला आजच फाशी द्या अशी मागणी करत आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिला.
त्यामुळे अखेर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलकांना पांगवलं. यावेळी आंदोलकांकडूनही पोलिसांवर दगडफेकीचा प्रकार घडला. काही पोलिस यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी रेल्वे ट्रॅकवरून जरी आंदोलकांना पांगवलं असलं तरी आजूबाजूच्या परिसरातून हे आंदोलक दगडफेक करत असल्याची माहिती आहे.