आष्टी (रिपोर्यर): आष्टी, अंभोरा, चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत असून काल अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकत येथील विजय शिंदे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नगदी रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला तर दुसरी चोरीची घटना चकलांबा येथे घडली. येथील सलमान मुन्ना शेख यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून घरातील कपाटामधून रोख 55 हजार रुपयांसह 2 लाख 37 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याबाबत अधिक असे की, गेल्या काही दिवसांपासून आष्टी, अंभोरा आणि चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडत आहेत. या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश येत असून सातत्याने घडत असलेल्या चोरी आणि दरोड्यांमुळे या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकत येथील आजिनाथ लिंबराज भोगाडे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडत प्रवेश करून कपाटामधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी 90 हजार असा एकूण 1 लाख 70 हजार रुपयांची चोरी केली. या प्रकरणी विजय मोहन शिंदे यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चोरीची दुसरी घटना चकलांबा येथे घडली. येथील सलमान मुन्ना शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.