बीड/परळी (रिपोर्टर): नूतन जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी बीड पोलीस दलाचे सुत्र हाती घेतल्यानंतर ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या संचालक मंडळाविरोधात धरपकडीच्या कारवाईला अधिक वेग आल्याचे दिसून येत असून काल ज्ञानराधाचा कुलकर्णी पकडल्यानंतर आज आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यामधून राजस्थानी मल्टिस्टेटचे सर्वेसर्वा चंदुलाल बियाणी यांचा मुलगा अभिषेक बियाणी याला ताब्यात घेतले. तर चंदुलाल बियाणी अद्याप फरार आहेत.
बीड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात दहा ते बारा मल्टिस्टेट आणि सोसायट्यांनी लाखो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये घशात घातले. या प्रकरणी अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. गुन्हेही दाखल झाले मात्र आरोपी फरार राहिले. ज्ञानराधा मल्टिस्टेटचे सर्वेसर्वा सुरेश कुटे हे ताब्यात असले तरी त्यांचे मुख्य व्यवस्थापक यशवंत कुलकर्णी सह अन्य काही संचालक फरार होते. अन्य मल्टिस्टेट आणि सोसाटींचे दोषी फरार आहेत. मात्र जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी सुत्र हाती घेतल्यानंतर या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने अधिक लक्ष घालत अटकसत्र सुरू केले. ज्ञानराधाचा यशवंत कुलकर्णी व त्याचा मुलगा ताब्यात घेतल्यानंतर आज पहाटे पुण्यामधून राजस्थानी मल्टिस्टेटचे चंदुलाल बियाणी यांचा मुलगा अभिषेक बियाणी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजस्थानी मल्टिस्टेटमध्येही हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये आहेत. ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून आता मल्टिस्टेटवाल्यानीं ठेवीदारांना ठेंगा दाखवला आहे. अभिषेक बियाणीला अटक केल्यानंतर आता चंदुलाल बियाणी यांचा शोध सुरू असून ते अद्याप फरार आहेत.