माजलगाव (रिपोर्टर): मागील दोन दिवसापासून शहरासह तालुका परिसरात कधी संततधार तर कधी मुसळधार पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. याचाच परिणाम म्हणून मृतसाठ्यातील माजलगाव धरण या पावसाच्या पाण्यामुळे सोमवारी सायंकाळी 18 टक्क्यावर आले आहे . जायकवाडी धरणाचे पाणी माजलगाव धरणात आज दाखल झाले असून धरण भरण्यास या पाण्याचा देखील मोठा फायदा होत आहे. दरम्यान जोरदार बरसत असलेल्या पावसामुळे खरिपातील कापूस,सोयाबीन,तीळ, उडीद, तुर या पिकांसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन धरणात सकाळी दहा वाजता एकतीस हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती.
माजलगाव तालुक्यात मागील आठ दहा दिवसापासून गायब झालेल्या वरून राजाने शनिवारच्या मध्यरात्री जोरदार हजेरी लावली होती यानंतर काल रविवारी मध्यरात्री थोड्या प्रमाणात तर पहाटे सहा वाजल्यापासून ते सोमवारच्या पहाट पर्यंत कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरूच होता. या पावसामुळे मृतसाठ्यात असलेले माजलगाव धरण मृत साठ्याबाहेर येत 18 टक्क्यावर आले आहे त्यामुळे त्यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून माजलगाव धरण हे परतीच्या पावसावरच भरते कारण मागील दोन-तीन वर्षांपूर्वी देखील अत्यल्प असलेले माजलगाव धरण परतीच्या पावसावरच भरले होते त्यामुळे यावर्षी माजलगाव धरण भरेल अशी आशा शेतकर्यांना लागली आहे. दरम्यान मागील वर्षी माजलगाव धरण भरले नसल्यामुळे माजलगाव शहर सह तालुक्याला दुष्काळाचा सामना करावा लागला होता परंतु सध्या पावसाच्या पाण्याची आवक धारणात सुरू असल्याने सोमवारी सायंकाळी माजलगाव धरण 18 टक्क्यावर आले आहे आणि जायकवाडी धरणातून व पावसाच्या पाण्याची आवक माजलगाव धरणात सुरूच आहे. दरम्यान सोमवारी सकाळी दहा वाजता माजलगाव धरणात एकतीस हजार क्यूसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती.
मोरेश्वर मंदिर पाण्यात
माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे राज्यातील 21 प्रसिद्ध गणपती पैकी एक असलेले मोरेश्वराचे पुरातन असे मंदिर गोदावरी नदी काठी आहे. दोन दिवसापासून च्या संततधार व मुसळधार पावसामुळे मंदिर पूर्णतः पाण्यात गेले असुन फक्त शिखर उघडे दिसत आहे.
घळाटी नदीला पुर, गावचा संपर्क तुटला
माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथील घळाटी नदीला कालपासून झालेल्या दमदार पावसामुळे मोठा पुर आला आणि नदीकाठच्या घळाटवाडी, पवारवाडी, शिंपेटाकळी गावातील अनेक शेतक-यांच्या उभ्या सोयाबीन, कापुस या पिकांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने गावाचा संपर्क तुटला तर ग्रामस्थांसह माजलगावला येणारे अनेकजण अडकुन पडले होते. दरम्यान घळाटवाडी येथील नदीवर मोठ्या उंचीचा पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे परंतु प्रशासनाकडून याबाबत दुर्लक्ष केले जात आहे.
पावसातच पोळा साजरा
दि. 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान तज्ञ पंजाब डख यांनी दिलेला आहे. कालपासून पावसाची जोरदार हजेरी आहे पोळ्या दिवशी देखील दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे शेतकर्यांना आपल्या सर्जा राजासह पावसातच बैलपोळा साजरा करावा लागला.
माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला असुन गोदाकाठच्या महातपुरी गावामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे त्यामुळे ग्रामस्थांना घराबाहेर पडणे अवघड करत आहे. शिंदेवाडी नदीला पूर आल्याने पूल वाहून गेला आहे तर तालखेड येथील चाहुर तांड्यावरील ओढ्याला पूर आल्याने येथील पुल देखील वाहून गेला आहे.