– सिसीटीव्ही कॅमेरे बंद, प्रशासनाचे दुर्लक्ष
– धरणात पाण्याची आवक सुरूच, बघ्यांची धरण परिसरात वाढली गर्दी
– गेटसमोरच टाकलेले आहेत मच्छिमारांचे जाळे
– तिन वर्षांपूर्वी या जाळ्यांनी घेतला दोघांचा जिव
– माजलगाव धरण विस टक्यांवर
————–
माजलगाव, दिनकर शिंदे : मागील दोन दिवसांपासुन सुरू असलेल्या पावसामुळे माजलगाव धरणात पाण्याची आवक सुरू असुन हे पाणी पाहण्यासाठी व पोहण्यासाठी अनेकांची गर्दी धरण परिसरात होत. त्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु धरणाच्या सुरक्षेसाठी फक्त एक कर्मचारी असुन पोलिस अथवा जलसंपदा विभागाचे कुठलेही कर्मचारी याठिकाणी नसतात तर सिसीटीव्ही कॅमेरे देखिल बंद आहेत. धरणाच्या गेटसमोरच मच्छिमारांचे झालेले जाळे टाकण्यात आलेले असुन याच जाळ्यांनी तिन वर्षांपूर्वी कोल्हापूर येथील बचाव पथकातील जवानाचा व एका डॉक्टराचा जिव घेतलेला आहे.
जायकवाडी धरणाचा दुसरा टप्पा म्हणुन ओळख असलेल्या माजलगाव धरणात मागील दोन ते तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आवक वाढली असुन धरण विस टक्यांवर आले आहे. त्यामुळे बघ्यांची याठिकाणी गर्दी वाढत आहे. परंतु येथे पोलिस अथवा जलसंपदा विभागाचे कर्मचारी नाहीत. त्यामुळे धरणाची सुरक्षा रामभरोसे असुन सिसीटीव्ही कॅमेरे देखिल बंद अवस्थेत आहेत. सध्या पाण्याची आवक कमी जास्त होत असुन कुठलाही अनुचित प्रकार घडु नये अथवा पाणी पाहण्यासाठी व पोहण्यासाठी येणा-यांना रोखण्यासाठी मात्र पोलिस अथवा जलसंपदा विभागाचे कर्मचारी याठिकाणी नाहीत. धरणाच्या गेटसमोरच मच्छिमारांच्या वतीने जाळे टाकण्यात आलेले आहे. मच्छिमारांना देखिल जाळे इतर ठिकाणी टाका असे सांगण्यासाठी कर्मचारी नाही अथवा त्यांना तशा मार्गदर्शक सुचनाफलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एकंदरीत माजलगाव धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसते.
——
मी सध्या छत्रपती संभाजीनगर येथे ट्ेनिंगसाठी आलेलो आहे. याची माहिती घेउन धरण प्रशासन व पोलिस प्रशासनास याबाबतचे पत्र देउन पोलिस कर्मचारी व जलसंपदा विभागाचे कर्मचारी नेमण्याच्या सुचना देण्यात येतील व याप्रकरणी कारवाई करण्यात येईल. – श्री. रूईकर, तहसिलदार माजलगाव.
——
जाळ्यांनी घेतलाय दोघांचा जीव
——
मागील तिन वर्षांपूर्वी धरण परिसरात पोहतांना डॉ. फपाळ यांचा मच्छिमारांच्या जाळ्यात अडकुन मृत्यु झाला होता. त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी कोल्हापूर येथील बचाव पथकाचे शोधकार्य सुरू असतांना पथकातील जवानाचा देखिल मृत्यु झाला होता. सध्या धरणाच्या गेटसमोर हे जाळे टाकण्यात आलेले असुन याठिकाणी पोहणा-यांचा व पाणी पाहणा-यांचा मुक्ता संचार आहे. त्यांना रोखण्यासाठी कुणीही कर्मचारी नाही. त्यामुळे पुन्हा तीन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होउ नये यासाठी धरण प्रशासन व पोलिस प्रशासनाने याठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे.