गेवराई (रिपोर्टर): सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक गणित जुळवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजपासून राज्यभरात घोंगडी बैठकीला सुरुवात केली आहे. आजची पहिली बैठक ही गेवरई शहरात होत असून जरांगेंच्या घोंगडी बैठकीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
या बैठकीसाठी मतदारसंघातले मराठे गेवराईत डेरेदाखल झाले आहेत. बैठकीपूर्वी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्याठिकाणी लोक जमा होत आहेत.
गेवराई शहरातल्या दसरा मैदान याठिकाणी आज मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत घोंगडी बैठक होत आहे. या बैठकीसाठी मतदारसंघातून मोठ्या संख्येने मराठे डेरेदाखल होत आहेत. बैठकीपूर्वी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, या ठिकाणावरून रॅलीला सुरुवात होणार आहे. या चौकात मराठ्यांची गर्दी जमा होत असून तेथून ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचायत समिती कॉर्नर, मोंढा नाक्याहून दसरा मैदानावर जाणार आहे. घोंगडी बैठकीच्या पहिल्या बैठकीत जरांगे पाटील काय बोलणार याकडे आता राज्याचे लक्ष लागून आहे.