गणेश सावंत
मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफल उचलणार नाही, असे बाणेदारपणे सांगणार्या लोकमान्यांनी सुरू केलेल्या लोक उत्सवाला कालपासून सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. कुठे ढोल-ताशे वाजत होते, कुठे गुलालाची उधळण होत होती, कुठे फटाक्यांची आतिषबाजी होत होती, कुठे रोशनाई, तर कुठे शामियाने बाप्पासाठी उभारले आहेत. भक्तांच्या या भक्तीपुढे बाप्पाही नतमस्तक झाले असतील. भक्तांचे हे स्वागत नाटकी आहे की, खरचं ते माझ्यावर तेवढे प्रेम करतात, हा सवालही विघ्नहर्त्याला पडला असेल. गेल्या वर्षभराच्या कालखंडात महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या आणि त्या घटनातून माणसाला माणूस म्हणून न पाहणार्या माणसांच्या हस्ते बाप्पाचे स्वागत बाप्पाला तरी पटणारे असेल का? हा सवाल एवढ्यासाठीच…. इथे शासनही तसेच, इथे प्रशासनही तसेच आणि इथे रयतही तशीच. म्हणून
हे विघ्नहर्त्या,
आम्हा निर्बुद्धांवर संकटे येतात, विघ्न येतात, ते आमचे दुश्मन आमच्यासमोर संकटे उभे करत नाही तर आम्हीच दुश्मनाबरोबर संकट आणि विघ्न तयार करतो, ते आम्ही आमच्या बोकांडीवर बसून घेतो आणि जेव्हा बोकांडीवरचं ते संकट नरड्यापर्यंत येतं तेव्हा हे दु:खहर्ता अमाही तुझा धावा करतो, आम्ही जेव्हा सुखात असतो तेव्हा आम्ही संसाराची भक्ती करतो, तेव्हा आम्ही भौतिक सुखाला दैवत्व मानतो, जेव्हा आमच्याकडलं सर्वकाही संपतो, भौतिक सुखाला लागणारी माया आमच्याकडे नसते तेव्हा आम्ही भौतिक सुखाचा मोह सोडतो अन् भक्तीमार्गात हे सुखकर्ता आमचे दु:खहरण कर म्हणत तुझ्या पायाशी लोटांगण घालतो, ही आमच्यातल्या माणसाची वृत्ती. आम्ही चुकीचे का, असा जेव्हा आम्हालाच प्रश्न पडतो, तेव्हा आमच्यातला स्वार्थ आमच्यातला तोडका अभिमान ताठरतेने अमाच्या मनात उभा राहतो अन् तो ठासून सांगतो, बेरका, मोठेपणा सोडू नको, तुझ्यासारखा तूच सर्वश्रेष्ठ असल्याचा आभास आमच्या तनामनात भरतो अन् तिथच बाप्पा
संधीसाधू
आमच्या तोडक्या अभिमानावर स्वार होतात. विघ्न, संकट आम्ही तयार केलेले असते. आमचा तोडका अभिमान आम्हाला आमच्या गळ्यातला दागिना वाटतो, परंतु तो तोडका अभिमानच आमच्या गळ्यातला पट्टा असतो, हे आम्हाला कळतच नाही. अभिमानावर स्वार झालेला संधीसाधू जेव्हा आम्हाला इकडे – तिकडे हाकतो ना, कधी आम्हाला जातीच्या नावावर भिडवतो, कधी आम्हाला धर्माच्या नावावर एकमेकांना शिव्याशाप द्यायला लावतो, कधी गावकी-भावकीत दंगल घडवतो, कधी कधी तर असे स्वप्न दाखवतो की आमच्या सात पिढ्यात ते स्वप्न कुणाला पडले नसेल, स्वप्नात का होईना आम्ही अशा काही खुर्चीवर बसलेलो असतो, की ती खुर्ची बाप्पा तुझ्या सिंहासनापेक्षाही मोठी असते बरं. मग सांग ना रे असं जीवन कुणाला नकोय, झोपेतून जेव्हा उठतो का, स्वप्नावर जेव्हा विरजन पडतं, दोन धर्मात, दोन जातीत आणि भावबंदकीत जेव्हा डोकं फुटतं, तेव्हा आमचे तोंड आणि टिर्या लाल झाल्याचे लक्षात येतं रे, असो, तु म्हणत असशील आज काय हे रडगाने! नाही रे बाप्पा तुला सुद्धा दहा दिवस राहायचं, 17 सप्टेंबरपर्यंत आम्हा सर्वांच्या रडगाण्याबरोबर नाही नाही त्या गाण्यावर तुलाही नाचायचय, म्हणून सांगतो रे, आम्हाला नेमकं काय करायचं, कुणासोबत जायचंय, कुणाच्या विचारांवर चालायचय, कुठपर्यंत चालाचय, हे 21 व्या शतकात आल्यानंतरही जेव्हा कळत नाही ना तेव्हा बाप्पा
तुका म्हणे येथे
पाहिजे जातीचे
येरघबाळ्याचे काय काम, हा अभंग आठवतो बघ. आम्ही दुष्कर्म करणार, आम्हीच माणसा-माणसाचे अहित साधणार, आम्हीच एकमेकांचे पाय ओढणार, लाचखोरीसाठी आम्हीच प्रोत्साहन देणार, आमचं काम झालय ना, मग दुसर्याचं काय करायचय, असंही आम्हीच ठरवणार अन् जेव्हा सत्याचा विषय येईल तेव्हा आम्ही एकमेकांकडे बोटं करणार, कधी शासनाकडे, कधी प्रशासनाकडे आम्जही कर्तृत्व-कर्मापेक्षा प्रतिक्रियावादी अधिक झालेत ना, एखादी दुर्घटना घडत असेल, एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल, तिला त्रास दिला जात असेल, आमच्या पोस्टच्या लाईक वाढवण्यासाठी आम्ही व्हिडिओ काढू, त्या दुर्घनेकडे नुसते पाहत राहू आणि तो व्हिडिओ पोस्ट करून त्या अबलेच्या मदतीसाठी कुणीच धावले नाही बाप्पा, असं आम्हीच म्हणू. आम्हाला सोकवलंच तेवढं, आम्ही नोकरी मागितली, की आम्हाला दिली जाते भीक. आम्ही भुकेसाठी आमच्या कष्टाच्या पिकाला दाम मागितला, आम्हाला दिलं जातं मोफत धान्य. आम्ही आमच्या लेकीबाळीचं शिक्षण मोफत करा म्हटलं की आम्हाला दिलं जातं, लोन, आम्ही आमच्या म्हातार्या आई-बापाच्या आरोग्यासाठी दवाखान्यात सोय मागितली, उपचार मोफत द्या म्हटलं तर आम्हाला द्यावं लागतं आमच्या उत्पन्नाचं कार्ड. त्यांचीही चूक नाही रे बाप्पा, यथा राजा तथा प्रजा, असं आपल्याकडे म्हटलं जातं, मात्र इथे जशी प्रजा तसेच राजे होतायत रे! आम्ही पाचशे रुपयात मतदान करतो, चपटी, हातभट्टी आणि बोटीमध्ये धन्यता मानतो, मग त्यांना तरी कुठय निष्ठा? कुठय स्वाभिमान? मग तेही खोके बहाद्दर होतायत अन् तुझ्याच चरणी येऊन नतमस्तक होतात, हे तुला चांगलं माहितेय. परंतु बाप्पा, तुला आमचं विघ्नच दूर करायचंय तर जळी-थळी आम्हाला
बुद्धी दे बाबा!
त्यामुळे स्वाभिमान कशाला म्हणतात, अभिमान कशाला म्हणतात, हे तरी कळेल. आणि जेव्हा आमच्यातला स्वाभिमान जागा होईल ना, तेव्हा आम्ही आमचं पाहणार नाही, आमच्यातल्या प्रत्येक माणसाचं पाहू आणि जेव्हा आम्ही प्रत्येक माणसाचं हित पाहू ना तेव्हा तुझ्यासमोर रडगाणं गायला, सुख मागायला, दु:खहर म्हणायला, विघ्न दूर कर म्हणायला कोणी येणार नाही, इथे गल्ली असो वा दिल्ली, समाजकारण असो, राजकारण असो, अर्थकारण असो, शैक्षणिक धोरण असो, आरोग्याचं समीकरण असो सिंचन असो, शेती असो, कुठलंही क्षेत्र घे रे बाबा, त्या क्षेत्राला बाळांतपणाच्या कळा येतायत, त्या कळा एखाद्या वांझेच्या तर नाहीत ना? हा प्रश्न नेहमी पडतो कारण विकास कधी जन्मतच नाही ना, सिझर करून जन्मलाच तर टक्केवारीत त्याचं वजन कमी होऊन जातं. म्हणून म्हणतो, हे गणराया, हे बुद्धीच्या देवता, हे विघ्नहर्ता आमचे विघ्न दूर करण्यापेक्षा बुद्धी दे रे बुद्धी !