बीड (रिपोर्टर): ज्ञानराधा मल्टिस्टेटमधून ठेवीदारांना ठेवी मिळत नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे.
ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी लि. ने ठेवीदारांच्या मुदतठेवी परत न दिल्याने सदरील मल्टिस्टेट बँकेच्या संचालक मंडळाविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे ठेवीदारांनी गुन्हा नोंदवला आहे. तसेच जालना व बीड ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत.
परंतु गुन्हा दाखल होऊनही ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासंदर्भात कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत ठेवीदारांच्या वतीने अर्जुन कचरू भाकरे व इतर 186 ठेवीदारांनी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे अॅड. नरसिंग लक्ष्मणराव जादव यांच्या मार्फत रीट याचिका दाखल केली असून सदरील याचिकेमध्ये सचीव सहकार मंत्रालय, भारत सरकार, अतिरिक्त सचिव केंद्रीय सहकार सोसायटी नोंदणी कार्यालय, सचिव सहकार मंत्री केंद्र सरकार, केेंद्रीय निबंधक मल्टिस्टेट को.ऑप. सोसायटी नवी दिल्ली, गव्हर्नर भारतीय रिझर्व बँक, जिल्हाधिकारी बीड यांना प्रतिवादी केलेले आहे. तसेच ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या कारभाराची संपुर्ण चौकशी करून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचे निर्देश प्रतिवादीला देण्यात यावे, अशी विनंतीही करण्यात आलेली आहे.