गणेश सावंत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात गडकर्यांना अनन्यसाधारण महत्व होते. स्वराज्यासाठी, समतेसाठी छत्रपती शिवराय ज्या आक्रमकपणे लढत होते त्याच आक्रमकतेने अन् निष्ठेने गडकरी आपल्या जिवाची बाजी लावत होते. निष्ठा काय असते आणि आपल्या राजाच्या स्वप्नासाठी कर्तव्य-कर्म काय असते, हे अनेक गडकर्यांनी आपल्या बलिदानातून तेव्हा दाखवून दिले आहे. म्हणूनच आजही छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि मावळ्यांच्या निष्ठेचा आदर होतो. शिवरायांनी जे स्वराज्य घडवलं आणि त्या स्वराज्यात प्रत्येक जात-पात-धर्माला तेवढेच महत्व आणि तेवढाच आदर प्राप्त करून दिला म्हणून छत्रपती शिवराय हे विश्वगुरू होऊ शकले. परंतु तेच छत्रपती शिवराय, प्रभू श्रीराम यांचे नाव घेऊन कधी रामराज्य तर कधी शिवशाही आणण्याचे स्वप्न दाखवणार्या ‘अच्छे दिन’ वाले स्वत:ला विश्वगुरू म्हणवून घेत असले तरी ते विश्वगुरू आहेत का? विश्वगुरुची पात्रता काय? कोणाला विश्वगुरू म्हणायचे? हे जे प्रश्न आमच्या मनात उपस्थित झाले होते त्या प्रश्नांचं उत्तर
महाराष्ट्राच्या गडकर्याने
काल दिले. केंद्रामध्ये गेल्या बारा वर्षांपासून ज्या मोदींचे सरकार आहे त्या मोदींच्या सरकारमध्ये अत्यंत कर्तृत्ववान आणि निष्ठावान मंत्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते नितीन गडकरी काल अधिक स्पष्ट बोलले. विश्वगुरू व्हायचंय, शिवरायांसारखे धर्मनिर्पेक्ष व्हा’ असे स्पष्ट गडकरींनी बजावलेच जणू. आमच्याकडे कधी मोदींना प्रभू रामाच्या ‘अवतारात’ भक्ततुल्य दाखवतात तर कधी जिरेटोप तर कधी तुकोबांची पगडी मस्तकी ठेवून कलीयुगी अवतारी? पुरुषाची वाह वाह करतात. एखाद्या महात्मा आणि महापुरुषाचा अवतार परिधान केला म्हणजे तो व्यक्ती अवतारी पुरुष झाला का? तो विश्वगुरू होऊ शकतो का? यावर गेल्या बारा वर्षात अनेक वेळा देशात काठ्याकुथ झाले. जिथं सवाल विचारला अथवा हुकमाची तामील केली नाही किंवा सत्ता आली नाही तिथं ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणेचा गैरवापर करत दहशत माजवत ‘हम करे सो कायदा’ हा सिद्धांत मांडला जात असे. तिथं रामराज्य अथवा स्वराज्य असू शकते का? जेव्हा हा अतिरेक झाला आणि 2024 च्या लोकसभेत ‘अच्छे दिन’ वाल्यांना उतरती कळा आली तेव्हा तो गैरवापर काहीसा थांबला. परंतु प्रत्येक वेळा स्वच्छ आणि सच्चे विचार मांडणारे गडकरी या वेळेस अधिक खुलून बोलले आणि त्यांनी विश्वगुरुची व्याख्या अन्
सेक्युलरचा अर्थ
अत्यंत साध्या भाषेत सांगून टाकला. सेक्युलर म्हणजे तुम्ही-आम्ही धर्मनिर्पेक्षता असा अर्थ घेऊन पुढे जात आलो आहोत. परंतु गडकरींनी स्वामी विवेकानंदांचे शिकागोतील भाषणातले काही उतारे देत ते म्हणाले, ते म्हणाले, शिकागोमध्ये स्वामी विवेकानंदांनी असे म्हटले होते… माझा धर्म श्रेष्ठ आहे, हे सांगायला आलो नाही, माझा परमेश्वर श्रेष्ठ आहे, हे सांगायला मी आलो आहे. तुमचा धर्म आणि तुम्ही जो परमेश्वर मानता तो श्रेष्ठ आहे हे सांगायला मी आलो आहे. धर्मनिर्पेक्षता म्हणजे सेक्युलर नव्हे तर सर्वधर्म समभाव म्हणजे सेक्युलर अन् हे खरयं. आम्हाला शब्दाचा अर्थ कळायणा, आम्हाला केवळ देखाव्यामध्ये अधिक रस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वेशभुषेला अधिक महत्व देतात. त्यापेक्षा विचारांना त्यांनी महत्व दिलं तर ते या देशाला विश्वगुरूकडे नेणारं पाऊल असेल. असे आम्हाला तरी वाटते. गडकरी ज्या पद्धतीने या भाषणात अखंड हिंदुस्तानाला संस्कृती आणि इतिहास ही देणगी मिळालेली आहे सहिष्णुता हे आपले वैशिष्यट्य आहे, हे सांगून ज्ञानेश्वरांचं पसायदान जेव्हा गडकरी मांडतात. ‘दुरीतांचे तिमीर जावो, विश्वष्व धर्म सुर्य पाओ, जे जे वांचिल तेते लाओ प्राणीजातक’ ज्याच्या तना-मनात हा विचार असेल तो आपल्या कर्तृत्व-कर्मातून नक्कीच विश्वगुरुच्या पदपथावर निघेल. गडकरी अधिक स्पष्ट बोलतात. ते काल जे काही बोलले त्यांचा
रोख कुणाकडे?
यावर काठ्याकुथ करण्यापेक्षा आजच्या परिस्थिवरचे हे स्पष्ट भाष्य चुका उमजून समजून घेणार्याला मुख्य पथकपदावर नेणारे ठरेल. छत्रपतींचे विचार हे सर्वधर्म समभावाचे होते. तिथे राजाला टीकेला सामोरे जावे लागले तरी राजा सहनशील असेल तर ते राज्य यथोयोचीत प्रजेचे असते. मग छत्रपतींचे स्वराज्य असो अथवा प्रभू रामांचे रामराज्य असो दस्तुरखुद्द प्रभू रामांना रयतेच्या टीकेला सामोरे जावे लागले आणि रयतेच्या वक्तव्यावर माता सीतेला वनात सोडावे लागले. इथे मात्र ‘हम करे सो कायदा’ या ध्येय-धोरणात सर्वच अडकले. गडकरी लोकशाहीवर भाष्य करताना काल म्हणाले, लोकशाहीत सर्वात मोठी परीक्षा जर कोणती असेल तर राजाच्या विरुद्ध कितीही प्रखरपणे जर कोणी विचार मांडले तरीही राजाने ते सहन केले पाहिजे. त्या विचारावर चिंतन केले पाहिजे. हीच खरी लोकशाहीमध्ये अपेक्षा आहे. माझी आई मला नेहमी सांगायची, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ आपल्याला दिशा देणारा आहे तो निंदा करणारा माणूस. आपण जगातली सर्वात मोठी लोकशाही आहोत. लोकशाही चार स्तंभावर उभी आहे. या चारही स्तंभाचे अधिकार संविधानात आहे जे समाजाच्या हितासाठी आहेत, देश हितासाठी आहेत. त्याप्रमाणे ते मांडण्याचं स्वातंत्र्य आपल्या संविधानाने प्रत्येकाला दिला आहे. मग हे भाजपाच्या कार्यकाळामध्ये ते स्वातंत्र्य गेलं कुठं? आणि मतासाठी
धार्मिक ध्रुवीकरण
करण्याचा अट्टाहास तो का? हा सवाल उपस्थित होतोच. लोकसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वीपासून ते आतापर्यंतही भाजपाच्या कार्यकाळात ज्या काही घडामोडी महाराष्ट्र आणि देशात घडतात त्या नक्कीच सर्वधर्म समभाव याच्या नाहीत. जाणीवपुर्वक कधी हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद घडवण्याचा प्रयत्न केला जातो, कधी मराठा-ओबीसी, कधी दलित-संवर्ण यांच्यात उभी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि यासाठी धर्माची अफू आजच्या तरुणाला दिली जाते. कुठे ‘किडे’ वळवळतात तर कुठे धार्मिक द्वेषाची विषवल्ली ‘गगनगिरी’वर जाते तर कुठे भाजपातले आमदार-खासदार जातीयद्वेष निर्माण व्हावा या उद्देशाने मस्जिदमध्ये घुसण्याचे विखारी वक्तव्ये करतात. याने विश्वगुरू होता येते का? असो स्पष्ट बोलणे आणि सर्वधर्म समभावाशी एकरुप होणे हे महाराष्ट्रातच होऊ शकते. गडकरी जे बोलले, त्यांच्या त्या 30 मिनिटांच्या भाषणामध्ये अखंड हिंदुस्तानाचा इतिहास, भुगोल, संस्कार, संस्कृती आणि सत्य बोल हे आजच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरतील. शेवटी
जातीय द्वेषाला
आता तुम्ही-आम्हीही खतपाणी घालायला नको. राज्यकर्ते अणि राजकारणी हे जर सत्ताकारणाच्या गणितासाठी धार्मिक हातच्यांना सोबत घेऊन आपली बेरीज बराबर करत असतील तर मला वाटतं की, सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाने आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातले आहोत, शाहू-फुले-आंबेडकरांचे आचार-विचार तुमच्या-आमच्या तना-मनात आहेत. ते फक्त डोक्यात घ्यायचे, आणि या देशाला विश्वगुरू करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करत धर्मनिर्पेक्ष नव्हे तर सर्वधर्म समभाव ‘सेक्युलर’ व्हायचे हे प्रत्येकाने आता ठरवायलाच पाहिजे तेव्हा कुठं धार्मिक धु्रवीकरणाच्या जोरावर सत्ताकारणाच्या लोण्याचा गोळा खाणार्या बोक्यांचा बोका शांत होईल.