बीड (रिपोर्टर): : राज्यात आरक्षणाची लढाई ईरेला पेटली आहे. पंढरपूर, वडीगोद्री आणि अंतरवाली सराटीत आरक्षण आणि आरक्षण बचाव या दोन्हीसाठी उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व आंदोलनांना धार आली आहे. त्यातच आता मराठवाड्यात मराठा आंदोलकांचा संयम सुटल्याचे दिसून येत आहे.
मराठवाड्यात मराठा आंदोलकांचा संयम सुटत असल्याचे दिसत आहे. राज्यात आरक्षणाची लढाई अटी-तटीवर आली आहे. मराठा आंदोलक ओबीसी आरक्षणासाठी, धनगर आरक्षणासाठी आणि ओबीसी आरक्षणाला धक्का नको म्हणून असे तीन ध्रुव झाले आहेत. राज्यातील अंतरवाली सराटी, वडीगोद्री आणि पंढरपूर हे नकाशावर आले आहे. राज्य सरकारपुढे विधानसभेपूर्वीच मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यातूनच आता कोणताही तोडगा दिसत नसल्याने आणि काही मंडळी मुद्दामहून पेच वाढवत असल्याची भावना मराठा कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते आहे. त्यातूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आंदोलकांनी उग्र आंदोलन केले आहे.
मराठा कार्यकर्ते आक्रमक
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. मराठा कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात येऊन हा परिसर घोषणांनी दणाणून सोडला. त्यानंतर तहसीलदाराच्या दालनातून त्यांची खुर्ची बाहेर आणली. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात खुर्चीवर पेट्रोल ओतून ती पेटवून दिली. मनोज जरंगे यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी खुर्ची पेटवण्यात आली. खुर्ची पेटवून फुलंब्री तालुक्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.