तोडफोड करणारी महिला कोण?
ती पासविना कशी घुसली?
मंत्रालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मुंबई (रिपोर्टर): राज्यातल्या सुरक्षा व्यवस्थेविरोधात जनसामान्यांत आक्रोश असतानाच आज थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका महिलेकडून तोडफोड करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सदरच्या महिलेने मंत्रालयात पासविना घुसखोरी करत घोषणाबाजी करून ही तोडफोड केली. देवेंद्र फडणविसांच्या नावाची पाटी काढून फेकली. घोषणाबाजी आणि गोंधळ घालत ही महिला जशी आली तशी परत गेली. मात्र अद्यापही मंत्रालय सुरक्षा व्यवस्थेला ती महिला कोण होती? कुठून आली होती? याचा थांगपत्ता नसल्याने राज्याच्या मंत्रालयाचीच सुरक्षा बेवारस असल्याने सर्वसामान्यांत चिंता व्यक्त केली जात आहे.
मंत्रालयात कायमच मोठा बंदोबस्त असतो आणि अशात थेट गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड आणि नासधूस होण्याची घटना कशी काय घडू शकते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान इतकी सुरक्षा असूनही असा प्रकार घडल्यामुळे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचेच कार्यालय सुरक्षित नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड करणारी महिला मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेल्या पासशिवाय सचिव गेटमधून मंत्रालयात आली आणि थेट घोषणाबाजी करत तोडफोड करू लागली.
दरम्यान या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तिचा शोध सुरू आहे. अद्याप या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कोणतेही वृत्त नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर अनेक मंत्री, आमदार आणि नेत्यांनी मंत्रालयाच्या सुरक्षेतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. ती अज्ञात महिला मंत्रालयात घुसखोरी करताना सचीव गेटमधून आतमध्ये आली. तेथून तिने थेट घोषणाबाजी सुरू केली. तशी ती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे घोषणा देत निघाली. तिथे तिने प्रचंड गोंधळ घालत तोडफोड केली. ही घटना जशी समोर आली तशी राज्यातल्या सुरक्षे व्यवस्थेबरोबर आता दस्तुरखुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालयच असुरक्षित आहे का? त्याचबरोबर मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही अनेक मंत्री-आमदारांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अद्याप ती महिला कोण आहे? हे यंत्रणेला समजू शकले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.