30 टन साखरेचे नुकसान
धारूरच्या घाटाचं दुखणं काही जायना. वर्षभरात 82 अपघात झाले. अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू
बीड/धारूर (रिपोर्टर) धारूरहून श्रीरामपूरकडे साखर घेऊन निघालेला ट्रक धारूरच्या घाटामध्ये पलटी झाला. याच ठिकाणी सरकीचा टेम्पोही पलटला. या दोन्ही अपघातात तिघे जण जखमी झाले. दोन्ही वाहने रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस खोळंबा झाला होता. या दोन्ही घटना मध्यरात्रीच्या दरम्यान घडल्या. वर्षभरात या ठिकाणी 82 अपघात होऊन त्यात 13 जणांचा मृत्यू झाला. धारूर घाटातील रस्त्या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे संबंधित खातं दुर्लक्ष करत आलेला आहे. आणखी किती अपघातांची वाट बांधकाम विभाग पाहणार आहे? अपघातस्थळी पोलीस प्रशासनाने जावून रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने हटवली होती.
मध्यरात्री साखर घेऊन श्रीरामपुरकडे निघालेला ट्रक धारूरच्या घाटामध्ये पलटी झाला. याच ट्रकवर पाठीमागून सरकी घेऊन आलेला टेम्पो आदळला. दोन्ही वाहने रस्त्यावर आडवी झाली होती. या अपघातात तिघे जण जखमी झाले. ट्रकमध्ये 13 टन साखर होती. अपघातामुळे साखरेचे अनेक पोते फुटल्याने जवळपास 12 लाख रुपयांचे नुकसान झाले. सरकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. याठिकाणी सातत्याने अपघात होतात. वर्षभरात 82 अपघात होऊन त्यात 13 जणांचा मृत्यू झालेला आहे. धारूरचा हा घाट चार कि.मी.चा असून रस्त्याचे रुंदीकरण करावे या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलनसुद्धा झालेले आहेत. मात्र तरीही याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती अपघात हवे आहेत? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. अपघातस्थळी सकाळी पोलीसांनी जावून रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने हटवली होती.