Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeसंपादकीयनव्या पालवीला जन्म घालणारा महावृक्ष

नव्या पालवीला जन्म घालणारा महावृक्ष


रदचंद्र गोविंदराव पवार हे नाव महाराष्ट्राच्या मातीतल्या व्यक्तीला माहित नसेल असा एकही माणूस नसेल. गेल्या आठ दशकांच्या कार्यकाळात शरदचंद्र पवार यांनी आपल्या कर्तृत्व-कर्मातून साक्षात काळालाही आपल्या विजय मिरवणुकांमध्ये सातत्याने नाचायला भाग पाडले. राजकारण असो, समाजकारण असो, अर्थकारण असो, निती असो कुटनिती असो कुठल्याही क्षेत्रात आणि कुठेही हात घातला या माणसाने तर तो हात रिकामा कधी आलेला नाही. शरद पवार काय बोलतील, याकडे जेवढे लक्ष असते तेवढेच पवार बोलले त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक अर्थ काढताना चांगल्या चांगल्यांचे नाकीनऊ होऊन जाते. पवार चांगलं बोलले, स्तूती केली तर लोकांना वाटतं आपलं काही चुकलय. पवार रागवले तर लोकांना वाटतं आपलं चुकलं आहे की,
आपण योग्य वाटेवर जातोय? या प्रश्‍नचिन्हात तो व्यक्ती अडकून पडलेला असतो. पवारांचा तळ आजही कुणाला सापडला नाही. तो केवळ आणि केवळ त्यांचं लक्ष भेदक असतं, उद्दिष्ट चांगलं असतं अन् सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी ते गांजलेलं असतं. म्हणूनच शरदचंद्र पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख मांडताना अथवा तो समजून घेताना माझ्यासारख्यालाच काय तर मी मी म्हणणार्‍या राजकीय विश्‍लेषकांनाही तो अजूनपर्यंत ठामपणे मांडता आलेला नाही. किती पिढ्या आल्या आणि किती पिढ्यांना भविष्यात शरदचंद्र पवार यांच्या कर्तव्य-कर्मातलं, यशातलं कोडं सुटेल की नाही हे सांगणे आजमितीला तरी कठीण आहे. कोण काय म्हणतं, कोण काय टिका करतं यापेक्षा आपल्याला लोकांसाठी काय करायचं आहे या

भूमिकेत राहणारा अन्
कोणाच्याच हाताला
न लागणारा

हा ८० वर्षांचा तरणाताठा योद्धा जेव्हा दुर्धर आजाराच्याही हाताला लागत नाही त्या वेळेस या माणसाची इच्छा शक्ती, आत्मविश्‍वास आणि त्याने आजपर्यंत केलेले उभ्या आयुष्यातले पुण्य कर्मांचा हिशोब मांडणारे गणित तज्ञही अवाक होऊन जातात. शरदचंद्र पवार हे महाराष्ट्राला लाभलेलं एक शीतल चांदणं आहे. महाराष्ट्राच्या मातीत काम करताना महाराष्ट्राच्या तक्ताची जबाबदारी आणि त्याचं नेतृत्व करताना समाजातील प्रत्येक घटकाची काळजी वाहणारा नेता म्हणून पवारांकडे पाहितलं जातं. चार वेळा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना शरद पवारांनी जे धोरण स्वीकारले आणि जे धाडसी निर्णय घेतले ते दखलपात्रच म्हणावे लागतील. शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार अमलात आणणे, त्या विचारावर चालणे म्हणजेच महाराष्ट्राच्या मातीला बळ देणे म्हणावे लागेल. रोजगार हमीचा कायदा, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कायदा, नव्या औद्योगिक वसाहती स्थापन करून मराठी माणसाला उद्योजक बनविण्याचा धडाका, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर, लातूरच्या किल्लारी भुकंपानंतर पुनर्वसनाची जगाने घेतलेली नोंद, सहकार चळवळीला साथ, फळबाग, शेतीवाडीसाठी योजना असे अनेक लोकोपयोगी कामे करून शरद पवारांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला बळकटी मिळवून दिली. सामाजिक न्याय, महिलांचे सबलीकरण, औद्योगिक विकास, शेती सुधारणा, शिक्षणाची संधी, रोजगारासाठीचे प्रयत्न हे राष्ट्रीय विचार आणि जागतिक पातळीवरील बदलाचे भान तेव्हा त्यांना वेळोवेळी येत राहिलं आणि त्यातूनच त्या महाराष्ट्राचे भाग्य बदलत गेले. महाराष्ट्राला मोठं करण्यासाठी, महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले परंतु यामध्ये शरदचंद्रजी पवार यांचं नाव आघाडीवर घ्यावेच लागेल. गेल्या अडीच दशकांपासून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली, देशाच्या संरक्षणाची जबाबदारी, ताठरतेने पेलवली. सर्वात मोठी कामगिरी त्यांनी देशाचे कृषीमंत्री म्हणून केली. १० वर्षे देशाच्या कान्याकोपर्‍यात जावून तेथील शेती उत्पादन कसे वाढेल, त्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. एकेकाळी अन्नधान्य आयात करून कोट्यवधी लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करावी लागायची, अशा भारत देशाच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके उत्पादन करून जागतिक बाजार पेठेत भारत आता अन्न-धान्य, फळ-भाज्या निर्यात करणारा देश बनविण्यात शरद पवारांचा सिंहाचा वाटा म्हणावा लागेल.


कुठल्याही क्षेत्रात
शरद पवार हे नाव जेव्हा येतं तेव्हा त्या त्या क्षेत्रातले छत्रपती शिवाजी झाल्याची अनुभुती अनेकांना येते. शुन्यातून विश्‍व निर्माण करणे या वाक्याचा अर्थ जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे स्वराज्य निर्माण केले असा घेतला जातो. तसेच कार्य सर्वच क्षेत्रात शरदचंद्रजी पवार साहेबांनी केले, असे छातीठोकपणे सांगायला आम्ही मागे-पुढे पाहणार नाहीत. पवारांचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शैक्षणिक धोरण महिला सबलीकरण हे विषय जेव्हा समोर येतात. तेव्हा एका-एका विषयावर पवारांच्या कार्याचा आलेख एवढा वाढत जातो की आलेख लिहिणारा आवाक् होतो. कधी कधी तर काळालाही हायसे वाटते. पवारांबाबत जेलेसी निर्माण होते, तो काळ त्यांचा पाठलाग करत असतो मात्र त्यांचं कार्य पाहुन काळही आपलं कर्तव्य विसरजो आणि या माणसाच्या पाठीशी नव्हे तर समोर येऊन त्याला मुजराच घालतो, असेच काहीसे उदाहरण या ऐंशी वर्षांच्या कालखंडात आलेल्या वेगवेगळ्या अडचणींसह पवारांवर आलेल्या संकटाकडे पाहून द्यावे लागतील. राजकारणामध्ये येणं, सत्तेत सहभागी होणं, निवडून आलं की, झोपायचा टाईम नाही अन् उठायचा टाईम नाही, लोकांना भेटलं तर भेटायचं, काम केलं तर करायचं, असे राजकारणी आपण अनेक पाहतो मात्र रात्री कितीही वाजता झोपले तरी सकाळच्या सात वाजता लोकांच्या सेवेत खुर्चीत येऊन बसायचं आणि लोकांची कामे करायचे हे दशकानुदशके शरदचंद्र पवारांनी करून दाखवलं आहे आणि याचा साक्षीदार हा महाराष्ट्रच नाही तर देश आहे.


यशवंतरावांचे
वारसदार

म्हणून शरद पवारांकडे पाहितलं जातं, वारसा हक्काने आलेलं कायम टिकतं असं नाही मात्र विचारांचा वारसा ज्याच्याकडे असतो आणि जो ते विचार अंगीकारतो तो मात्र आयुष्यभर त्याच रुबाबात आणि त्याच थाटात कर्तव्य-कर्म करत राहतो. तो रुबाब आम्ही गेल्या पंचेवीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये शरदचंद्रजी पवार यांचा पाहत आलेलो आहोत. लोकशाहीच्या मंदिरामध्ये तब्बल ५० वर्षे कार्यकाळ गाजवणारे पवार यांच्याकडे पाहितल्यानंतर त्यांच्या आज ऐंशीव्या वर्षीही ते शरीराने वृद्ध झाले एवढेच वाटते, मनाने मात्र आजही हा फर्डा नेता नव्या पालवींना जन्म घालणारा महावृक्षच वाटतो. या महावृक्षासोबत काही काळ घालवण्याचा योग आम्हाला तीन-चार वेळेस आला. या कालखंडात या माणसाचे अचाट आणि अफाट वैचारिक विद्यापीठ आम्ही अनुभवले. हे राजकारण, समाजकारण, अर्थकारणातलेच कुलगुरु नव्हे तर कुलपती असल्याचे आम्हाला जाणवले. जेव्हा शरदचंद्रजी पवार गेल्या पाच वर्षांपूर्वी सायं. दैनिक बीड रिपोर्टरच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला आवार्जून उपस्थित राहिले त्यावेळी संपादक शेख तय्यब यांच्या सोबत त्यांनी वृत्तपत्राबाबत जी चर्चा केली ती चर्चा ऐकून आम्ही अचाट झालो, कागद, मशीन, कर्मचारी, शाई, मशीनमधील फरक, छपाईमधील त्रुटी काय करायला हवं, काय करायला नाही पाहिजे ही सर्व चर्चा ऐकून या माणसाकडे कुठल्याही क्षेत्रातली माहिती येते कुठून, हा प्रश्‍न साहजिकच माझ्यासारख्याला पडला. आमच्या सोबतही काळ काळ त्यांनी चर्चा केली. आम्ही अबोल होतो, मात्र ती चर्चा आमच्यासाठी सर्वात महत्वाची ठरली. त्यातून एकच लक्षात आलं, तुम्ही किती उंचीवर गेला आहात यापेक्षा तुमच्या विचारांची उंची किती आहे हे महत्वाचं असतं आणि त्याच विचारांची उंची एखाद्या महावृक्षासारखी पवारांची आहे. म्हणूनच या महावृक्षाखाली आजही शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचे हिरे चमकून उठतात. अशा या अजोड, अफाट विचारशील महावृक्षास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…!

sawant
गणेश सावंत-बीड

Most Popular

error: Content is protected !!