क्षीरसागरांची हुकूमशाही वृत्ती ठेचली पाहिजे, युतीचे नेते जातीवाद निर्माण करतायत-प्रा.सुरेश नवले
लोकसभा निवडणूकीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा जेवढा प्रभाव दिला, त्यापेक्षा कित्येक पटीचा अधिक प्रभाव विधानसभा निवडणूकीमध्ये जरांगे पाटलांचा दिसणार आहे. जयदत्त क्षीरसागर माझे मित्र आहेत. त्यांना माझा सल्ला आहे, ‘आता पंचाहत्तरी गाठली, चालतांना कल जातायतं, बोलतांना बोबडी वळतेय, थोडा प्रकाश सोळंकेंचा आदर्श घ्या’. क्षीरसागर घराण्याची मानसिकता ही हुकूमशाहीची आहे. ती ठेचून काढली पाहिजे. विद्यमान आमदार यांच्या कर्तव्यकर्माचा हिशोब लोक या निवडणूकीत करतील. लोकनेत्याने जाती-पातीला महत्त्व द्यायचे नसते, सर्वांना समान घेवून पुढे चालायचे असते. महायुतीचे नेते मराठा-ओबीसीमध्ये वाद निर्माण करत आहेत. असे सडेतोड उत्तर देत, माजी मंत्री प्रा.सुरेश नवले यांनी रिपोर्टरच्या थेट सवालमध्ये आपण बीड विधानसभा लढणार असल्याचे म्हटले.
==================
प्रश्न : गेल्या 15-20 वर्षांच्या काळात तुम्ही दोन तीन पक्ष बदलले, तिथे स्थिरता मिळाली नाही की विचार जुळले नाहीत?
उत्तर : लोकसभा निवडणूकीच्या आधी शिंदे सेना का सोडली? याचे समर्पक उत्तर मी या आधीच लोकांसमोर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत आलेल्या खासदारांना उमेदवारी देवू शकले नाहीत. ते केवळ भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळेच आम्ही त्यांना म्हणत होतोत, भाजपाच्या दबावाला बळी पडू नका. तसे आमच्यापैकी अनेकजणांनी त्यांना सांगितले होते. जे खासदार मुख्यमंत्र्यांसोबत आले होते, त्यांचेही त्यांनी ऐकले नाही. शिवसैनिकांच्या मनातल्या भावना त्यांनी समजून घेतल्या नाही. या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही शिंदे सेना सोडली. त्यापूर्वी मी आणि माझे मित्र अर्जून खोतकर यांनी सत्तार साहेबांच्या साक्षीने पक्षात प्रवेश केला होता आणि त्यांना सांगूनच आम्ही पक्ष सोडला.
प्रश्न : तुम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले आहे. त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या आता दोन शाखा झाल्या. मग बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना कोणती? ठाकरेंची की शिंदेंची?
उत्तर : खरं तर या सर्वांचा प्रतिकात्मक सिम्बॉल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुगारून जी नवी शिवसेना स्थापन केली आणि तिच खरी शिवसेना अशी भुमिका वठविली. त्यावेळी कार्यकर्त्यांना ती भुमिका पटली, म्हणून त्यांच्यासोबत अनेकजण आले. परंतू लोकसभा निवडणूकीत आणि लोकांच्या न्यायालयात उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना खरी असल्याचे दाखवून दिले. लोकशाहीमध्ये लोकांचा कौल अधिक महत्त्वाचा असतो. त्यातून उद्धव ठाकरेंची शिवसेना हिच खरी बाळासाहेबांची शिवसेना असल्याचे समोर आले आहे.
प्रश्न : विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तुम्ही काम सुरू केलं आहे, बीड विधानसभेतून तुम्ही अपक्ष लढणार की कुठल्या पक्षाकडून?
उत्तर : मी 1986 पासून बीड मतदारसंघात काम करत आहे. आज 38 वर्षे झाले, माझे काम अविरत सुरू आहे. विधानसभेमध्ये दोन वेळेस याच मतदारसंघातून लोकांच्या आशिर्वादाने निवडून गेलो आहे. 2008 ते 2014 या कार्यकाळात विधान परिषदेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्या अनुषंगाने बीड मतदारसंघामध्ये अधिक विकासाची कामे केलेली आहेत. लोकसंघटन, लोकांचं पाठबळ त्यांच्या आशिर्वादावर मी पुन्हा एकदा बीड विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
प्रश्न : अपक्ष लढणार की कुठला पक्ष?
उत्तर : या प्रश्नाचे उत्तर आताच देता येणार नाही, कालसापक्ष उत्तर मिळेल.
प्रश्न : एखाद्या पक्षासोबत चर्चा अथवा निमंत्रण?
उत्तर : कालच्या लोकसभा निवडणूकीमध्ये शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बजरंग सोनवणे यांना सुरेश नवले मित्र मंडळाच्या वतीने जाहीर पाठींबा देत काम केलेले आहे. हे काम करताना कुठल्याही अटी शर्ती शिवाय त्यांचे काम केलेले आहे. त्यात त्यांना विजयाचं यश मिळालं, त्या विजयात आम्हीही खारीचा वाटा उचलला आहे. पाहू काय होतयं ते!
प्रश्न : शरद पवारांच्या पक्षाचा विषय निघाला, सध्या त्यांच्याच पक्षाचा बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार आहे. त्या आमदाराच्या कार्यपद्धत आणि कामाविषयी तुम्ही समाधानी आहात का?
उत्तर : त्यांच्या कामाविषयी लोक ठरवतील. लोकांनी त्यांच्या कामाचे मुल्यमापन केले आहे. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये लोक त्यांना पोहोचपावती देतील. तुम्ही योग्य असाल तशी पावती देतील, योग्य नसाल, पाच वर्षात तुमचे आचार विचार उच्चार यात सुसंगती नसेल तर लोक या निवडणूकीमध्ये उत्तर नक्की देणार! आज तो विषय नाही, मी या मतदारसंघात निवडणूक लढवणार का? तर हो! हो! मी विधानसभेची निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार!
प्रश्न : चाळीस वर्षे तुम्ही क्षीरसागरांचे कट्टर विरोधक राहिलात, आता त्याच क्षीरसागरांचे घर फुटले आहे, तिथे तीन उमेदवार तुमच्या समोर येतात. यात तुमचा प्रबळ विरोधक उमेदवार कोण असेल?
उत्तर : मुळात क्षीरसागरांची जी मानसिकता आहे, ती समजून घेतली पाहिजे. आमच्याशिवाय दुसर्याकडे सत्तेचे पद जाताच कामा नये. ही क्षीरसागरांची भावना आहे. सत्तेमध्ये आम्हीच असलो पाहिजे आणि बाकीच्या लोकांनी भोई म्हणून आमची पालखी उचलली पाहिजे. ही त्यांची मनोवृत्ती मुळात घातक आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे. मागच्या निवडणूकीमध्ये संदीप क्षीरसागर यांना आम्ही पाठींबा दिला, शक्तीने काम केले. लोकांनी त्यांना निवडून दिले. क्षीरसागरांची जी मानसिकता आहे, ती हुकूमशाहीची आहे. आमच्याशिवाय दुसर्याला काहीच मिळता कामा नये असे असेल तर ती मानसिकता ठेचून काढली पाहिजे. कोण प्रबळ, कोण दुर्बल आणि कोण सबळ हे या निवडणूकीत ठरणार आहे. क्षीरसागरांची ही घातक मनोवृत्ती आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत.
प्रश्न : जयदत्त क्षीरसागरांना मतदारसंघातल्या गावात जाण्यासाठी फौजफाटा घेवून जावा लागत आहे, याकडे तुम्ही कसे पाहता?
उत्तर : मुळामध्ये खाजगी लोकांना पोलीस विभाग पोलीसांचा फौजफाटा देतोच कसा? कुठल्याही संविधानिक पदावर नसतांना बॉडिगार्ड शिवाय त्यांना शासनाने कुठलीही सुरक्षा पुरवलेली नसतांना बीडचा एसपी त्यांना फौजफाटा का देतो, आता मी उद्या एखाद्या गावात निघालो अथवा सर्वसामान्य एखाद्या गावात निघाले तर बीडचे एसपी त्यांना फौजफाटा देणार का? मुळात क्षीरसागर यांची गृहविभागातील वरिष्ठ नेत्यासोबत चांगले लागेबांधे आहेत. त्यांच्या सांगण्यावरून क्षीरसागरांना फौजफाटा मिळाला हे योग्य नाही. लोकशाहीला ते मारक आहे.
प्रश्न : मग क्षीरसागरांना फडणविसांचे पाठबळ आहे का? ओबीसी नेत्या पंकजांना शह देण्यासाठी फडणवीस क्षीरसागरांना रसद पुरवितात का?
उत्तर : भाजपाच्या त्या अंतर्गत राजकारणाशी आम्हाला देणे घेणे नाही. परंतू सत्तेतला माणूस किंवा संविधानिक पदावरचा व्यक्ती जोपर्यंत निर्णय घेत नाही तो पर्यंत पोलीस कुणालाही फौजफाटा देत नाही. जेव्हा वरून आदेश आला तेव्हाच क्षीरसागरांना फौजफाटा मिळाला. खरं तर जयदत्त क्षीरसागारांना माझा सल्ला आहे, आता 75 वर्षांचे झालात, चालताना तुमचे कल जातायत, बोलतांना तुमची बोबडी वळतेय, असे असतांना किमान प्रकाश सोळंकेंचा आदर्श त्यांनी घ्यायला हरकत नाही, हा माझा सल्ला आहे. मोफत सल्ला ते मानत नाहीत. ते माझे खास मित्र आहेत. मला सल्ला द्यायचा मोह आवरला नाही म्हणून हा सल्ला दिला.
प्रश्न : विधानसभा निवडणूकीत मराठा आरक्षणाचा प्रभाव दिसेल का?
उत्तर : मी शरद पवारांच्या व्यासपिठावर स्पष्ट म्हटलं होतं, त्यांच्या समोर सांगितलं होतं. लोकसभा निवडणूकीमध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रभावाखाली होती. जरांगे पाटलांनी घेतलेली भुमिका ग्रामीण भागातल्या बहुजनांनी स्विकारली आहे. जरांगे पाटलांच्या प्रभावामुळेच बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. तो प्रभाव नसता तर चित्र वेगळं राहिलं असतं. लोकसभा निवडणूकीपेक्षा अधिकचा प्रभाव तुम्हाला विधानसभा निवडणूकीमध्ये पहायला मिळेल असे माझे व्यक्तीगत मत आहे.
प्रश्न : निवडणूक लढविण्याबाबत जरांगे पाटलांसोबत काही चर्चा?
उत्तर : याबाबत जरांगे पाटलांसोबत कुठलीही चर्चा झाली नाही. जरांगे पाटलांच्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी मी तीन चार वेळेस त्यांना भेटलो. परंतू माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी इच्छा आहे, पाटलांनी आम्हाला पाठींबा दिला तर 100 टक्के विधानसभेमध्ये आम्हाला यश मिळू शकते. त्यामुळे आमच्या सारखे त्यांचा पाठींबा मिळविण्यासाठी प्रयत्न करतील मीही त्यांना व्यक्तीगत भेटून म्हणेल, आम्हाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठींबा मिळाला तर आपण घेतलेली भुमिका विधानसभेमध्ये समर्थपणे आणि सक्षमपणे मांडेल हे मी त्यांना सांगेल.
प्रश्न : तुम्ही आमदार असतांनाचा एखादा प्रश्न मतदारसंघात आजही तसाच आहे का?
उत्तर : 1989 ला बिंदूसरेला महापूर आला होता, तेव्हा बुद्धपेठ वाहून गेले होते. त्यावेळेस आम्ही आश्वासन दिलं होतं. संरक्षण भिंत बांधू म्हणून तेवढा प्रश्न राहिला. कालांतराने पाऊस कमी झाला, पुर आला नाही, लोकांचे त्याकडे दुर्लक्ष झाले. परंतू दुर्दैवाने आता ढग फुटीसारखी घटना घडली तर संरक्षण भिंत नसल्यामुळे पुराचे पाणी थेट पेठबीडमध्ये येईल. माझी स्पष्ट भुमिका आहे, नदीचे अस्तित्व वाचले पाहिजे. मी अनेक देशात पाहितले, अनेक देशातल्या नद्यांबाबत तेथील सरकार किती सक्रीय आहे हे वाचले, अभ्यासले परंतू महाराष्ट्रात नद्यांचे अस्तित्व धोक्यात आहे. त्या बुजल्या जातायत. त्यावर प्लॉटींग केली जातेय. म्हणून नदीपात्राच्या रस्त्याला मी तेव्हा विरोधही केला होता.
प्रश्न : मराठा आंदोलक आणि सरकारमधल्या संघर्षात तुम्हाला काही तोडगा दिसतो का?
उत्तर : मुळात सरकारची भुमिका संशयास्पद आहे, जरांगे पाटलांना खेळवत ठेवत मराठा ओबीसीमधील वाद सातत्याने पेटवत ठेवायचे काम सरकारकडून होत आहे. सरकारची मुळात इच्छाच नाही. या प्रश्नातून मार्ग काढण्याची. सरकारची इच्छा असती तर जरांगे पाटलांसोबत जेव्हा हे सरकार बसले होते, तेव्हाच त्यातून मार्ग निघाला असता. जरांगे पाटलांनी सरकारला विकल्प दिले होते, पर्याय दिले होते. त्या अनुषंगाने सरकारने मोठ्या मनाची भुमिका स्विकारली असती तर यातून मार्ग निघाला असता. सरकारची इच्छा नाही, यातून मार्ग काढायची! हे भिजतं घोंगडं त्यांना ठेवायचं आहे, निवडणूक कारभार उरकविण्यासाठी हे सरकार ही खेळी खेळत आहे.
प्रश्न : उद्याच्या निवडणूकीत ओबीसी-मराठा वाद तितकाद पेटलेला असेल?
उत्तर : आतापर्यंत असे दिसून आलेले आहे, खेड्यापाड्यामध्ये हा वादच नाही. निवडणूक राजकारणामध्ये पुढार्यांनी पेटविलेला हा वाद आहे. दैनंददिन जीवनात व्यवहारात मराठा-ओबीसी हा एकरूप आहे, एकजीव आहे. हे वातावरण राजकीय नेत्यांनी निर्माण केलेले आहे. मोठा स्फोट घडला पाहिजे याचीही तयारी आहे परंतू त्यांना यश मिळणार नाही. लोकसभा निवडणूकीमध्ये किती वाद पेटविण्याचा प्रयत्न झाला. पण काय झालं, दोन्ही समाज हुशार आहे. त्यावेळेस अनेक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या. स्वत:ला लोकनेत्या समजणार्यांनी काय भुमिका घेतल्या. लोकनेत्याकडून अशा अपेक्षा नसतात. लोकनेत्याने सर्वांना सोबत घेवून चालावे लागते.
प्रश्न : बीड जिल्ह्यातले नेते असा वाद पेटवितात का?
उत्तर : होय! युतीतले नेते खास करून हा वाद पेटवत आहेत.
प्रश्न : विधानसभा निवडणूकीला सामोरे जाताना तुमचे व्हिजन काय असेल?
उत्तर : आजही ग्रामीण भागामध्ये अनेक प्रश्न कायम आहेत. सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजाही पुर्ण झालेल्या नाहीत. केवळ पुढारी आश्वासन देतात. मतदारसंघात काम करत नाहीत. रस्त्याचे प्रश्न तसेच आहेत. सिंचनाचे प्रश्न तसेच आहेत. जयदत्त क्षीरसागरांनी या मतदारसंघात दहा वर्षे प्रतिनिधीत्व केलं, त्यांनी सांगावं एखादं मोठं कुठलं काम केलं. एखादा मोठा प्रकल्प कुठला आणला. मी तर माझ्या दहा वर्षांच्या कालखंडामध्ये जिल्हा रुग्णालयाचे विस्तारीकरण केले. माजलगावच्या पाणीपुरवठ्याची मंजुरी 1984 साली माझ्याच कार्यकाळात झाली. नंतर ती सलीमभाईच्या कार्यकाळामध्ये पुर्णत्वाला आली. क्षीरसागरांना एकही प्रकल्प आणता आला नाही. क्षीरसागर केवळ गावा गावात तंटे-बखेडे वाढविण्यात पटाईत आहेत. गावागावात गटागटामध्ये वाद वाढवायचे. लोकांना आपआपल्यात झगडत ठेवायचे. त्यांना आपल्या दारात उभे करायचे. त्यामध्ये आमचे मित्र जयदत्त क्षीरसागर अधिक पटाईत आहेत.
प्रश्न : मतदारांना काय आव्हान कराल?
उत्तर : मतदारबंधूंनी या निवडणूकीमध्ये व्यक्तीसापक्ष बघावं, सामाजिक जान, भान, राजकीय प्रश्नांची जान, भान असलेल्या व्यक्तीला प्राधान्य द्यावं, या सर्व गोष्टीमध्ये मी बसतो असा माझा व्यक्तीगत कयास आहे, यामध्ये दुमत असू शकते. मतदारांना विनंती आहे, मला जर निवडून दिले तर मतदारांची मान खाली जाईल असे कुठलेही कृत्य मी करणार नाही. मला एकदा मतदारांची सेवा करण्याची पुन्हा संधी द्यावी हीच विनंती.
धन्यवाद!