बीडसाठी बहुगर्दी; माजलगावात जगताप-आडसकरांत टक्कर, आष्टीत शेख महेबूब-धोंडे सह अन्य इच्छूक, गेवराईत पुजा मोरे-बदामराव, केजमध्ये साठेंना खासदारांची नापसंती? विरोध, परळीत पुन्हा सर्व्हे
पुणे (रिपोर्टर): मराठा आंदोलन आणि लोकसभा निवडणुकीत मिळालेला विजय पहाता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बीड जिल्ह्यातल्या सहाही मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले आहे. आज पुण्यातील गुलटेकडीवर असलेल्या निसर्ग कार्यालयात बीड जिल्ह्यातल्या सहाही मतदारसंघातल्या इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. या मुलाखती दुपारी तीननंतर होणे अपेक्षीत आहे. त्यासाठी बीड जिल्ह्यातून इच्छुकांची मोठी फलटन गुलटेकडीवर गेल्याचे सांगण्यात येते. बीड मतदारसंघासाठी इच्छुकांची बहुगर्दी दिसून येत असून अन्य पाच मतदारसंघांसाठीही हौश्या-नौश्यांनी केवळ महायुतीच्या विरोधात वातावरण आहे या उद्देशातून उमेदवारी मागण्याचा आणि त्यासाठी मुलाखती देण्याचा धडाका सुरु ठेवला आहे.
पुण्यातील गुलटेकडीवर असलेल्या निसर्ग कार्यालयामध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिल्या जाणार्या उमेदवारीबाबत मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाकती सुरु झाल्या आहेत. या मुलाखतीसाठी बीड जिल्ह्यातल्या सहाही मतदारसंघातून मोठ्या संख्येने इच्छूक उमेदवारी मागण्यासाठी पुण्याच्या गुलटेकडीवर डेरेदाखल झाले आहेत. बीड विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची बहुगर्दी असून यामध्ये माजी मंत्री सुरेश नवले, दिलीप गोरे, सुशीलाताई मोराळे, सीए जाधव, भागवत तावरे, केजीएन ग्रुपचे जहीर कादरी यांच्यासह अन्य दोन ते तीन इच्छुकांचा समावेश आहे. यांच्या मुलाखती आज घेतल्या जातील. मात्र मुलाखती न घेता इच्छुक असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांसह अन्य दोन बीड विधानसभा लढवू इच्छीत असल्याचे बोलले जाते. याठिकाणी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे असून या मतदारसंघात ओबीसी उमेदवार द्यायचा की, मराठा उमेदवार द्यायचा ? हा कळीचा मुद्दा शरद पवारांसमोर उभा ठाकलेला आहे. यातून ते काय मार्ग काढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अन्य मतदारसंघातले अनेक इच्छूक पवार दरबारी पोहचल्याचे बोलले जाते. परंतु गेवराई मतदारसंघातून प्रामुख्याने पुजा मोरे आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांचा विचार शरद पवारांची राष्ट्रवादी करत असल्याचे बोलले जाते. इथे नुकतेच भाजपाच्या पाट्या उखडून फेकणारे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हेही शरद पवारांकडून निवडणूक लढवू इच्छीत असल्याची चर्चा होतेय. तिकडे माजलगावमध्ये अनेक जण निवडणूक लढवण्याबाबत इच्छूक असले तरी तिथे नुकतेच भाजपावर जाहीर नाराजी व्यक्त करणारे मोहन जगताप आणि भाजपाचेच परंतु शांत असलेले रमेश आडसकर या दोघात उमेदवारीसाठी अटीतटीची लढत सुरू असल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे. आष्टी मतदारसंघात अनेक जण इच्छूक म्हणून मुलाखती देण्यासाठी पुण्याच्या गुलटेकडीवर गेलेले असले तरी तेथे राष्ट्रवादीचे महेबूब शेख आणि भीमराव धोंडे यांच्याबाबत विचार केला जात असल्याचे बोलले जाते. धोंडे यांच्या संपर्कात शरद पवारांचे विश्वासू कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. तर केजमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराधीन माजी आमदार पृथ्वीराज साठे हे असले तरी स्थानीक शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांकडूनच विरोध होत असल्याचे बोललं जातय. दस्तुरखुद्द खा. बजरंग सोनवणे हेदेखील साठेंच्या उमेदवारीबाबत अनइच्छूक असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. त्यामुळे आज इच्छुकांपैकी शरद पवार केजमध्ये कोणाला उमेदवारी देतात याकहे अनेकांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात जो मतदारसंघ सातत्याने चर्चेत असतो त्या परळी मतदारसंघामध्ये कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचा? यासाठी शरद पवार सर्व्हेवर सर्व्हे करत असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतेच राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले गुट्टेंचे जावई फड यांच्याबाबत राष्ट्रवादीने सर्व्हे केला परंतु त्या सर्व्हेत राष्ट्रवादीला विजयाची दिशा मिळाली नसल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. त्यामुळे इथे मराठा उमेदवार द्यायचा की ओबीसी? यावर आजच्या मुलाखतीनंतर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी म्हणून सहा मतदारसंघातून अनेक इच्छूक गुलटेकडीवर गेलेले असले तरी मुलाखती न देणारे सहाही मतदारसंघातील अनेक नावे शरद पवारांच्या डायरीत असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे.