देणारे कोण? फसवणारे कोण? याचा विचार मराठा समाजाने करावा
महायुतीची पत्रकार परिषद
मुंबई (रिपोर्टर): राज्यातल्या महायुती सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंमलात आणली. ही योजना प्रचंड पॉप्युलर ठरली असून या योजनेला कोणी हात घातला तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार, असं म्हणत गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडात महायुती सरकारने पन्नास ते साठ मंत्रिमंडळ बैठका घेतल्या आणि 900 पेक्षा जास्त निर्णय राज्यात घेतले. याचा पोटसुळ विरोधकांना उठलय. जरांगे यांनी महायुतीने आतापर्यंत काय काय दिले हे तपासून पहावं, देणारे कोण आणि फसवणारे कोण? हे मराठा समाजाने विचारात घ्यावं. असं म्हणत आमचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा तर इथे बसलाय, शरद पवारांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण? हे महाराष्ट्राला सांगावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रिपाइंचे खासदार आठवले यांच्यासह महायुतीची आज प्रदीर्घ पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातील कामकाजाचा रिपोर्ट कार्ड प्रकाशीत करण्यात आला. या वेळी अजित पवारांसह फडणवीस आणि शिंदे यांनी गेल्या वर्षभराच्या कालखंडातल्या कामकाजाचा आढावा सांगितला. अजित पवारांनी महायुती सरकारच्या योजनेचा जनतेतील प्रचंड प्रतिसाद आणि लोकप्रियता पाहता विरोधक घाबरले आहेत, असे म्हणणार नाही परंतु लाडली बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून विरोधक नक्कीच गडबडल्याचे त्यांनी म्हटले. महिला उद्योग, रोजगार अशा विविध क्षेत्रात महायुतीने यशस्वी काम केल्याचे सांगितले. लाडली बहीण योजनेसाठी आधी 10 हजार कोटी तर नंतर 35 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचे म्हटले. ही योजना तात्पुरती नसून हा पैसा तुमचा अधिकार आहे, लाडली बहीण योजनेच्या पैशात वाढ करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विरोधक फेक नेरेटिव्ह सेट करत असल्याचेही म्हटले. तर देवेंद्र फडणवीसांनी हे लोक आम्हाला कायदा व सुव्यवस्थेबाबत विचारतायत. त्यांच्या कार्यकाळामध्ये काय झाले, त्यांचा गृहमंत्री थेट जेलमध्ये गेला, मी एवढच सांगतो, आम्ही लोकांच्या हिताची कामे केलेली आहेत, येणार्या काळातही करणार आहोत, आमचे मुख्यमंत्री इथे बसले आहेत. शरद पवारांना माझे आव्हान आहे, तुमचा मुख्यमंत्री कोण असेल? असे फडणविसांनी म्हटले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकार-षटकार मारत महायुती सरकार लोकहिताचे काम करत आहे. गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडात साठ ते सत्तर मंत्रिमंडळ बैठका घेण्यात आल्या आहेत, नऊशेपेक्षा अधिक निर्णय आम्ही घेतलेले आहेत. पायाभूत सुविधेमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. इन्फ्रा प्रकल्पांमध्ये राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे. महायुतीने समाजाला काय काय दिले हे जरांगेंनी एकदा तपासावं. देणारे कोण आणि फसवणारे कोण? याचा मराठा समाजाने विचार करावा. यासह अनेक मुद्यांवर महायुतीतल्या नेत्यांनी भाष्य करत महायुतीमध्ये कसलीही नाराजी नसून येणारी निवडणूक मोठ्या ताकतीने लढण्यास आम्ही तयार आहोत आणि महाराष्ट्रातील जनताही आमच्या सोबत आहे.