जालना (रिपोर्टर): महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीचा सुपडा साफ करणार, असा इशारा दिला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. यानंतर महायुतीतील महत्त्वाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत दाखल होत आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा देखील झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेले मनोज जरांगे यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच आपला संताप व्यक्त केला. आता या निवडणुकीमध्ये निर्णायक मतदान हे मराठ्यांचे आहे. आता रणशिंग फुंकले आहे. लढाईला उतरायचं म्हणजे तलवार काढावी लागेल. सरकारने मराठा आरक्षणाबाबत सरकारने आमची आशा संपवली असल्याचे त्यांनी म्हटले होते.
विखे पाटील-मनोज जरांगेंमध्ये तासभर चर्चा
यानंतर काल मध्यरात्री भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटीत भेट घेतली. दोघांमध्ये अंतरवाली सराटीत तासभर चर्चा झाली. विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची आठ दिवसात दुसर्यांदा भेट घेतली. मध्यरात्री पावणे दोन वाजता विखे पाटील यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. या दोघांमध्ये एक तास चर्चा झाली. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगेंनी महायुतीवर तोफ डागली. यामुळे महायुतीकडून मनोज जरांगेंचा मनधरणीचा प्रयत्न सुरु आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.