‘पाडायचे की लढायचे’ चर्चा सुरू
बीडमधून ज्योतीताई मेटे, राजेसाहेब देशमुख, हिंगे, पोकळे, जाधवांची हजेरी
गेवराई (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बोलवलेल्या इच्छूक उमेदवारांच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत असून किमान आठ हजारापेक्षा अधिक लोक या बैठकीला उपस्थित असल्याचे पहावयास मिळते. उमेदवार पाडायचे की उभे करायचे ? या प्रश्नाला इतर पक्षांच्या दारात जाऊन आलेले इच्छूक उमेदवार उभे करण्यावर भर देत आहे तर अन्य सर्वसामान्य उमेदवार पाडण्यावर भर देत असल्याचे आजच्या बैठकीवरून दिसून आले. 20 तारखेला समाजासोबत होणार्या बैठकीनंतर त्यावर निर्णय घेतला जाणार आहे तर बीड जिल्ह्यातूनही अनेक इच्छूक जरांगे पाटलांच्या भेटीला गेले. त्यामध्ये शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे, काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख, रमेश पोकळे, बी.बी. जाधव, माजलगावातून प्रदीप सोळंके, संतोष डावकर यांच्यासह अन्य इच्छूक असल्याचे सांगण्यात येते.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीची घोषणा होताच इच्छुकांसोबत समाजासोबत घेतल्या जाणार्या बैठकांच्या तारखा घोषीत केल्या आणि या बैठकांमधून उमेदवार पाडायचे की उभे करायचे? यावर निर्णय होणार आहे. आज इच्छुकांची बैठक होत असून या बैठकीला आठ हजारापेक्षा अधिक लोक उपस्थित असल्याचे सांगण्यात येते. अनेक जण उमेदवार उभा करण्याबाबत सांगत आले आहेत. मात्र यामध्ये ज्यांना इतर पक्षांच्या दारामध्ये उमेदवारी मिळालेली नाही असे लोक उमेदवारी देण्याबाबत आग्रही असल्याचे सांगण्यात येते. बैठक अद्याप सुरु असून जरांगे पाटील इच्छुकांचे म्हणणे ऐकून घेत आहे तर समाजासोबतची बैठक ही 20 तारखेला होणार असून या बैठकीनंतरच उमेदवार उभे करायचे की पाडायचे? यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.