केज (रिपोर्टर) सहा महिन्यांपुर्वी झालेल्या अपघातामुळे उपचारासाठी काढलेले कर्ज आणि त्यानंतर यावर्षी ओढावलेलं दुबार पेरणीचं संकट यामुळे कर्जबाजारी झालेल्या एका 40 वर्षीय शेतकर्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना केज तालुक्यातील राजेगाव येथे रात्री घडली.
सुग्रीव देवीदास जाधव (वय 40 वर्षे, रा. राजेगाव) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. या शेतकर्याचा गेल्या सहा महिन्यांपुर्वी अपघात झाला होता. त्यावेळी उपचारासाठी मोठा खर्च आला होता. हा खर्च त्या शेतकर्याने कर्ज काढून केला होता. शिवाय इतरही त्याच्याकडे काही कर्ज होते. यावर्षी अतिरिक्त पावसामुळे दुबार पेरणीचं संकट आलं. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या सुग्रीव जाधव यांनी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच नांदूरघाट पोलीस चौकीचे जमादार आनेराव भालेराव, शेख रशीद यांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयात पाठवला.