गेवराई (रिपोर्टर): गेवराई तालुक्यातल्या चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पौळ्याचीवाडी येथील एका शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर गांज्याच्या झाडांची लागवड असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर चकलांबा पोलिसांनी आज सकाळी संबंधित शेतात जावून छापा मारला असता तब्बल 120 गांज्याची झाडे तेथील शेतात आढळून आले. त्याची बाजारामध्ये अंदाजे किंमत 21 लाख असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी पोलिसांनी शेंडगे नावाच्या शेतकर्यावर गुन्हा दाखल केला आहे.
चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पौळ्याचीवाडी आहे. येथील शेतकरी कैलास शेषेराव शेंडगे यांच्या गट नं. 472 क्रमांकाच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर गांज्याच्या झाडांची लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना झाली. त्यांनी अगोदर खातरजमा केली, नंतर आज सकाळी नऊच्या सुमारास आपल्या टीमसह संदीप पाटील यांनी पौळ्याचीवाडी गाठली. तेथील गट नं. 472 मध्ये जात पाहणी केली असता कापूस, तूर सह अन्य पिकांमध्ये गांज्याची झाडे मिळून आली. अख्ख्या टीमने सदरील गांज्याची झाडे उपटले असता ते तब्बल 120 झाडे दिसून आले. ज्याची किंमत बाजारामध्ये 21 लाख रुपये एवढी आहे. या प्रकरणी शेतकरी कैलास शेंडगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करत गांजा जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.