तीन महिलांसह 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ; 25 जणांची माघार
गेवराई (रिपोर्टर) निवडणूक अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत काल संपली असल्याने गेवराई विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सोमवारी 25 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने आता उर्वरित 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आसून गेवराई मतदार संघात पुन्हा एकदा पंडित-पवार-पंडित असा तिरंगी सामना होणार असल्याचे दिसून येत आहे.
सोमवारी या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले असून आता निवडणूक प्रचाराला वेग आला असून दरम्यान यावेळी प्रस्थापित असलेल्या पंडित-पवारांना विस्थापित पुजा मोरे, मयुरी मस्के-खेडकर, प्रियंका खेडकर या विस्थापित असलेल्या महिलांचे ही आवाहन असले तरी मुख्य लढत ही पंडित-पवार-पंडित अशीच होणार असल्याने या तिघांमध्ये कोण सरस ठरेल हे निकालानंतरच दिसून येईल. गेवराई विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी 46 जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत सोमवारी संपणार होती. त्यामुळे अखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज मागे घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार 46 उमेदवारांपैकी 25 उमेदवारांनी माघार घेतली असल्याने आता 21 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असून प्रमुख पक्षांसह अपक्षांना सायंकाळी पाच वाजता गेवराई निवडणूक निरीक्षक लालनपुई वाँगचाँग, निवडणूक निर्णय अधिकारी सतिश धुमाळ, तहसीलदार संदीप खोमणे, विक्रम मांडुरके यांनी निवडणूक चिन्हांचे वाटप केले. दरम्यान या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून प्रामुख्याने हि लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे बदामराव पंडित व अपक्ष उमेदवार लक्ष्मण पवार यांच्यात होईल तसेच या निवडणुकीत मनसेच्या मयुरी खेडकर, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पुजा मोरे, वंचितच्या प्रियंका खेडकर यांच्यासह अपक्ष निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार किती मते घेतील आणि हे कुणाला फायद्याचे अन कुणाला तोटा करतील हे निकालानंतर दिसून येईल. तसेच त्यांना मराठा आरक्षण चळवळीतील ऋषीकेश बेदरे यांनी जरांगे पाटलांनी आदेश दिल्यानंतरही आपली उमेदवारी मागे घेतली नसून त्यांचे देखील निर्णायक आव्हान हे प्रमुख उमेदवारांना असणार आहे. त्याचबरोबर ऍड.सुरेश हात्ते, ओबीसी बचाव आरक्षण चळवळीतील परमेश्वर वाघमोडे, पी.टी.चव्हाण यांनी देखील माघार न घेतल्याने त्यांची कोणाला डोकेदुखी ठरतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
9 पक्षाच्या उमेदवारांसह हे 12 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे बदामराव पंडित, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पुजाताई मोरे, मनसेच्या मयुरी मस्के-खेडकर, वंचितच्या प्रियंका खेडकर, संपूर्ण भारत क्रांती पार्टीचे दिलीप चांदणे, जनहित लोकशाही पार्टीचे परमेश्वर वाघमोडे, भारतीय युवा जन एकता पार्टी भीमा कानधरे, रासपा मतकर अण्णासाहेब या पक्षाच्या 9 उमेदवारांसह अपक्ष म्हणून माजी आ.लक्ष्मण पवार, ऋषीकेश बेदरे, अशोक खेडकर, अँड. अंबादास जाधव, संजय काळे, पि.टी. चव्हाण, पवार लक्ष्मण अंबादास, पवार लक्ष्मण विठोबा, बदाम गोर्डे, मनोहर चाळक, राजेंद्र डाके, सुरेश हात्ते हे एकुण 21 उमेदवार गेवराई विधानसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत.
चौकट –
——————–
लक्ष्मण पवारांना मिळाले अँटोरिक्षा चिन्ह
————–
उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदरांना तीन मुक्त चिन्ह पसंती प्राधान्यक्रमाने मागण्याचा अधिकार आहे. दरम्यान लक्ष्मण पवार यांच्यासह मनोहर चाळक व पी.टी.चव्हाण या तिघांना प्रथम पसंती म्हणून अँटोरिक्षा या चिन्हाची मागणी, केली होती त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या तिघांच्या नावाच्या चिठ्ठ्या एका बरणीत टाकुन त्यामधील एक चिठ्ठी लहान मुलाच्या हस्ते काढण्यात आली. हि चिठ्ठी लक्ष्मण माधवराव पवार यांची निघाल्याने त्यांना अँटोरिक्षा चिन्ह देण्यात आले.